‘पहाटे पहाटे’ शरद पवारांची झोप उडाली

Editorial
Spread the love

तीन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या पहाटेच्या शपथविधीचे बंद बाटलीतले भूत बाहेर येण्यासाठी धडपडत  आहे.  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे ८० तासांचे सरकार आले कसे आणि गेले कसे ? त्याने काय साधलं? महत्वाचे म्हणजे  ह्या सरकारमध्ये अजितदादांना कोणी पाठवलं होतं? ही  कोडी उलगडू लागली आहेत.  पहाटेचं हे सरकार आलं कसं? हा प्रश्न  हजार वेळा विचारला गेला. पण नीटसे उत्तर मिळाले नाही. अजितदादा तर हा प्रश्न झटकून टाकायचे. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणविसांनी प्रथमच मोकळे उत्तर दिले आणि विशेष म्हणजे ह्या विषयात प्रथमच  शरद पवारांचे नाव घेतले.  ‘हे सारे शरद पवार यांच्या पुढाकारानेच घडले’ असे   देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले  आणि भूकंप झाला. ‘देवेंद्र फडणवीस असत्यावर आधारित असे काही बोलतील अशी आपली अपेक्षा नव्हती’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सुप्रीमो  शरद पवार यांनी दिली. अजितदादा अजून बोलले नाहीत. बोलणारही नाहीत. बोलले तर राष्ट्रवादीच जागेवर राहणार नाही.  सध्या ह्या विषयावर राजकारण तापलं आहे.

          ‘एक अकेला’ पण सर्वांना  भारी असे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल म्हटले जाते. फडणविसांनी यावेळीही ते दाखवून दिले. त्यांनी एक नाव काय घेतले सर्वांची पंढरी घाबरली आहे. विशेष म्हणजे  शरद पवार   उघडे पडले. पवार कोणाच्याही भरवश्याचे  नाहीत  हे उघड गुपित आहे. मात्र कोणी बोलत नव्हते. फडणविसांनी प्रथमच  थेट बोट दाखवले.  त्यामुळे पवार चिडणे  स्वाभाविक होते. पवार सहसा चिडत नाहीत.  खोचक काहीतरी बोलून  प्रश्न टोलवतात. पण नेमक्या दुखऱ्या नसीवर बोट लागल्याने  अस्वस्थ झाले असावेत. आता बाहेर आलेली माहिती भयंकर आहे.  ते दिवस तुम्ही आठवा. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले होते. युतीचे बहुमत असूनही   युतीचे सरकार बनत नव्हते. उद्धव ठाकरे  हे फडणवीस यांचा फोनच घेत नव्हते. उद्धव  यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. शरद पवारांनी ते हेरले, पवारांनी फेकलेल्या जाळ्यात  उद्धव अलगद   अडकत गेले.  ह्या हवेत पवारांनी डबल गेम खेळला. एका बाजूला महाआघाडीची बोलणी चालू ठेवली आणि दुसरीकडे भाजपकडे ऑफर दिली. सत्तेसाठी पवारांना कोणाचा विटाळ नसतो हे ह्या आधीही  महाराष्ट्राने २०१४ मध्ये पाहिले.  भाजपने पाठिंबा मागितला नसताना पवारांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. फडणविसांनी त्यावेळी त्यांना भाव दिला नाही तो भाग वेगळा.  २०१९ मध्ये त्यांनी वेगळे पत्ते खेळले. स्थिर सरकारच्या नावाने  चक्क दिल्लीतून  ‘एनओसी’ आणली आणि पहाटेचा शपथविधी करून घेतला. त्यांना फडणवीस यांचा गेम करायचाच होता. तो त्यांनी केला. त्या जोडीला चक्क आपल्या पुतण्याचीही ‘शिकार’ केली. ह्या साऱ्या  आतल्या गोष्टी होत्या. बाहेर अजितदादांनी बंड केले  असेच चित्र होते. शरद पवारांना तेच पाहिजे होते. फडणवीस सरकारमध्ये  अजितदादांना पाठवले कोणी ? हा इथे कळीचा मुद्दा आहे. शरद पवारांसाठी अजितदादा म्हणजे ‘सहनही होत नाही आणि सांगता येत नाही’ अशी केस आहे.   महाआघाडी सरकारमध्ये दादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. पण व्हायची ती बदनामी होऊन गेली होती.  राष्ट्रवादी   पक्षातच त्यांच्याकडे संशयाने पाहणे सुरु झाले, ते आजही सुरु  आहे. दादांचा दरारा आहे, सारे आमदार त्यांना टरकून असतात. पण त्यांना  काकाचा आशीर्वाद नाही   हे सारे आमदार आता ओळखून  आहेत.  ह्या वयातही पवार काय काय करू शकतात त्याचा हा नमुना आहे. ‘शरद पवारांना विचारून  झाले असते तर सरकार पडलेच नसते’ असे  बाळासाहेब थोरात म्हणाले. पण  विचारायची गरजच नव्हती. पवारांनाच सरकार पाडायचे होते.  ठरलेल्या  योजनेप्रमाणे अजितदादा बाहेर पडले आणि सरकार पडले.

            फडणवीस खोटे बोलत आहेत असे पवार म्हणाले. मग खरे काय? आणि ते कोण सांगणार?  अजितदादाच ह्यातले वास्तव सांगू शकतात. देवेंद्र यांना खोटं ठरवण्यापेक्षा  शरद पवार आपल्या पुतण्याला ‘तू बोल’ म्हणून सांगू शकतात. पवार का सांगत नाहीत? इथेच खरी गंमत आहे.  पुतण्या आपली अंडीपिल्ली  बाहेर काढील अशी  काकाला भीती आहे. फडणविसांनी नाव घेतल्यावर पवार  चिडलेले दिसले ते त्यामुळे. अजितदादा हे पूर्वीचे  दादा राहिलेले नाहीत.  काकाशी पंगा घेण्याच्या मूडमध्ये आहेत. सध्या पवार कुटुंबात प्रचंड धुसफूस सुरु आहे. नेहरूनंतर कोण?’ हा प्रश्न  नेहरूंच्या हयातीतच विचारला जायचा. त्या प्रमाणे ‘पवार यांचा वारस कोण?’ ह्या प्रश्नाची  जोरदार चर्चा रंगते आहे. कोण आहे वारस? उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पवारांनी पावसात सभा केली नाही.  त्यांना आपली सुकन्या  खासदार सुप्रिया सुळे यांना   ह्या राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री झालेली पहायचे आहे.  त्यासाठीच  २००४ मध्ये राष्ट्रवादीला जास्त जागा मिळूनही त्यांनी  मुख्यमंत्रीपद कॉन्ग्रेसला दिले.  त्या वेळी त्यांना अजितदादांना मुख्यमंत्रीपदी बसवता आले असते. त्या नंतरच्या निवडणुकांमध्ये पत्ते उलटे पडत गेले. इकडे वारसा हक्क सांगणाऱ्याची  संख्या वाढत आहे.  आता तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या पाट्या ‘भावी मुख्यमंत्री’  नावाने झळकल्या. भावाचे नातू कर्जत-जामखेडचे रोहित पवार याचे  वाढते राजकीय महत्व भुवया उंचावणारे आहे.  पाहता पाहता  रोहित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशणचा  अध्यक्ष झाला. पुणे विद्यापिठाच्या  सिनेटवर गेला. इकडे अजितदादा यांचे इंजिन   उपमुख्यमंत्रीपदापलीकडे  सरकत नाही. तुम्ही लिहून ठेवा.  ज्या  दिवशी ते पुढे सरकेल त्या दिवशी राष्ट्रवादी फुटेल.

                 २०१४ मध्ये युतीचे  व्यवस्थित सुरु होते.   उद्धव ठाकरेंनी फाजील महत्त्वाकांक्षेने घरातच आग लावली. पण काय साधलं? अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद मिळाले. मात्र कोरोनाने निट  भोगू दिले नाही.  त्या बदल्यात काय मिळालं? सरकार गेलं. शिवसेना फुटली. मात्र एवढी तोडफोड होऊनही उद्धव शरद पवारांना सोडायला तयार नाहीत. संजय राऊत सांगतात तसे ते वागतात.  कॉंग्रेसवाले  वंचित आघाडीला जवळ  घ्यायला तयार नसताना  उद्धव यांनी  प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केली. ह्या युतीचे काय होते ते सावकाश कळेल. मात्र महाआघाडीने महाबिघाडीकडे वाटचाल सुरु केली आहे हे नक्की. २०२४ च्या निवडणुकीपूर्वी महाआघाडीचे तुकडे  मोजायचे आहेत.  तरीही उद्धव यांना विश्वास आहे. पवार आपल्याला वाचवतील.  पण कसे वाचवतील?  पवारांनी गेल्या ६० वर्षात कोणाला वाचवले आहे? राजकारणाचा दर्जा घसरला अशी ओरड आपण सातत्याने ऐकतो.   पण ह्या अडीच वर्षात  सत्तेचा  जो घाणेरडा खेळ काही राजकारणी खेळले  ते भयंकर आहे.

-मोरेश्वर बडगे

 78 Total Likes and Views

1 Comments
Make Up To $1,000 Every Day with GPTOK - https://bit.ly/3XKeRzB