आणखी एका फ्रीज कांड, पती व सासूला मारून टाकले फ्रीजमध्ये

Analysis
Spread the love

         गुन्हेगारीचा एक नवा ट्रेंड अलीकडे पाहायला मिळतो आहे. पूर्वी खून करून मृतदेह  नदी किंवा जंगलात फेकून  देत. अलीकडे  मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्याचा प्रकार सारखा पाहायला मिळतो आहे.  दिल्लीतलं श्रद्धा वालकर आणि निक्की यादव हत्याकांड प्रकरण ताजं असताना आसाममध्ये आणखी एक फ्रिज कांड समोर आलं आहे. आसाममधल्या गुवाहाटीमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडसारखीच एक घटना घडली आहे. येथील एका महिलेने तिच्या प्रियकराच्या आणि त्याच्या मित्राच्या साथीने पती आणि सासूची हत्या केली. त्यानंतर या दोघांना हाताशी धरून दोन्ही मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांचे तुकडे केले. हे तुकडे पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून घरातल्या फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर तीन दिवसांनी हे तुकडे आसामच्या शेजारचं राज्य मेघालयमधील टेकड्यांवर फेकून दिले.  ही घटना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातली आहे. पोलिसांनी सांगितले की,  याप्रकरणी आम्ही तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे.

                पोलिसांनी सांगितलं की, या महिलेने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिचा पती अमरेंद्र डे आणि सासू शंकरी डे हे दोघेजण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अमरेंद्र आणि शंकरी यांचा तपास सुरू केला. त्यानंतर काही दिवसांनी अमरेंद्र याच्या काकांनी पोलिसात तक्रार दाखल केली.  अमरेंद्र याच्या पत्नीवर संशय असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. या तक्रारीनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा पहिल्यापासून घटनेचा तपास सुरू केला तेव्हा तेही चक्रावले. त्यांनी दावा केला आहे की, अमरेंद्र याच्या पत्नीने तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने हे दोन खून केले आणि मृतदेहांची विल्हेवाट लावली. हे दोन्ही खून वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहेत. खून करून अमरेंद्र आणि शंकरी यांच्या मृतदेहांचे तुकडे करण्यात आले. हे तुकडे पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून त्यांनी मेघालयमधल्या डोंगरदऱ्यांमध्ये फेकून दिले. म्हणजे हत्या करून  मृतदेहाची विल्हेवाट लावायची पद्धत श्रद्धाच्या केससारखी आहे. श्रद्धाच्या खुनाला  टीव्ही वाहिन्यांवर प्रचंड  कव्हरेज मिळाले होते. ते पाहूनच गुन्हेगारांना  फ्रीजचा आसरा घ्यावा असे तर वाटले  असेल का?

 422 Total Likes and Views

0 Comments

No Comment.