कसबा…२७ वर्षानंतर भाजप पराभूत, ब्राह्मणांनी दिला हिसका

Editorial
Spread the love

भाजप हरू शकत नाही अशा देशातल्या काही मतदारसंघांमध्ये  पुण्यातील कसबा  विधानसभा मतदारसंघ एक आहे. पण इथे भाजप हरला. २७ वर्षानंतर  भाजप हरला. कसबा पोटनिवडणुकीच्या ह्या निकालाने भाजपच्या तंबूत सन्नाटा आहे. काय झाले? कसे झाले?  अमित शाह, देवेंद्र फडणवीस फिरूनही  जिंकत नसेल तर २०२४ मध्ये भाजपचे अवघड आहे.   मतदारांचा  मूड बदलत चालला आहे का?  मोदी-शाह जोडीची लोकप्रियता  कमी होत चालली आहे का? हे प्रश्न ह्या निमित्ताने ऐरणीवर आले आहेत.                 

              भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा १० हजार मतांनी दणदणीत विजय हा भाजपला मोठा धक्का  आहे. धंगेकरांना ७२ हजार ५९९ तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळाली आहेत.

         थेट लढत झालेल्या ह्या निवडणुकीत महाआघाडीने ‘मोदी इफेक्ट’  येऊ दिला नाही. स्थानिक उमेदवार आणि स्थानिक मुद्दे घेऊन कसब्याची निवडणूक झाली. शिवाय रवींद्र धंगेकर यांचं ग्राऊंड लेव्हलवरील काम, त्यांचा साधेपणा हे मुद्दे काँग्रेसच्या कामी आले. धंगेकर हे  सुरुवातीला  शिवसेनेत होते. पुढे मनसेमध्ये  गेले होते.   २०१७ मध्ये ते कॉंग्रेसमध्ये आले.  मनसेच्या कार्यकर्त्यांनी धंगेकर यांचे काम केले ह्याकडे खुद्द  अजितदादांनी लक्ष वेधले.  धंगेकर ४ वेळा नगरसेवक होते. अर्ध्या रात्री  मदतीला धावणारा हक्काचा माणूस अशी त्यांची प्रतिमा यावेळी कामी आली.

            इथेच भाजपने मार खाल्ला.मुक्ता  टिळक यांच्या मृत्यूमुळे झालेल्या ह्या पोटनिवडणुकीत भाजपने टिळक कुटुंबाला उमेदवारी नाकारल्याने मतदार नाराज होते.     भाजपने ब्राह्मण समाजाला डावलून ओबीसी असलेल्या हेमंत रासनेंना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसनेही ओबीसी उमेदवार रिंगणात उतरवला. आधीच टिळकांमुळे नाराज झालेली ब्राह्मण मतं  आणखीच दुरावली.  इतकी वर्षे  गिरीश बापट कसबा तारून  न्यायचे. यावेळ ते आजारी आहेत.  तोंडाला नळी असतानाही भाजपने त्यांना  सभेला बाहेर नेले खरे. पण उपयोग झाला नाही.  भाजपला आत्मचिंतनासाठी वर्षभर वेळ देणारा हा निकाल आहे.

 104 Total Likes and Views

0 Comments

No Comment.