स्वतःला देवाचा दर्जा देणारा आणि भारताने अनेक गुन्ह्यांमध्ये फरारी घोषित केलेल्या नित्यानंदने त्याचा स्वयंघोषित देश ‘कैलासा’ने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभाग घेतल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर नित्यानंदचा भारतात छळ केल्याचा आरोपही ‘कैलासा’च्या प्रतिनिधीने ह्या बैठकीत केला आहे.
नित्यानंदवर बलात्कारासह अनेक गंभीर आरोप आहेत. त्याला फरारी घोषित केलेले आहे. विजयाप्रिया नित्यानंद असे नाव सांगणाऱ्या ह्या महिलेने जिनिव्हामध्ये झालेल्या बैठकीत ‘कैलासा’च्या प्रतिनिधित्व केल्याचा दावा केला जातो. भारतात नित्यानंदचा भारतात छळ झाल्याचा आरोप तिने केला. बैठकीत बोलताना ती म्हणाली, ‘‘कैलासा हा हिंदूंचा पहिला सार्वभौम देश आहे. हिंदू धर्माचे सर्वोच्च पुजारी नित्यानंद परमशिवम याने या देशाची स्थापना केली आहे. हिंदू सभ्यता आणि हिंदू धर्माच्या दहा हजार स्वदेशी परंपरांचे पुनर्ज्जीवन नित्यानंद करीत आहे.”
भारतातील अनेक गंभीर गुन्ह्यांत नित्यानंद मुख्य आरोपी आहे. यामध्ये मुलांवर बलात्कार, शोषण, अपहरण, बळजबरीने कैदेत ठेवणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. तो भारतातून २०१९मध्ये पळून गेला होता. जानेवारी २०२० मध्ये इंटरपोलने त्याच्याविरोधात ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी केली होती. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये बंगळूरजवळील रामनगरमधील स्थानिक न्यायालयाने २०१० मधील बलात्काराच्या घटनेत नित्यानंदविरोधात अजामीनपात्र वॉरंट दाखल केले होते. चार लाख डॉलरच्या गैरव्यवहारप्रकरणी फ्रान्स प्रशासनही त्याची चौकशी करीत आहे.
नित्यानंदचा स्वयंघोषित कैलासा हा देश इक्वेडोरच्या किनाऱ्याजवळ असल्याचा दावा केला जातो. या देशाला स्वतःचा झेंडा आहे. पासपोर्टचा नियमही लागू असून ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलासा’ही अस्तित्वात आहे. त्याने डिसेंबर २०२०मध्ये विमानसेवेची घोषणाही केली होती. ‘कैलासा’च्या संकेतस्थळावर ‘पृथ्वीवरील सर्वांत मोठा हिंदू देश’ असा याचा उल्लेख केला आहे. ज्यांना स्वतःच्या देशात हिंदू धर्माचे प्रामाणिकपणे पालन करण्याचा अधिकार गमवावा लागला, अशा निर्वासित झालेल्या हिंदूंनी निर्माण केलेला हा सीमाविरहित देश आहे,’ असेही त्यावर म्हटले आहे.
49 Total Likes and Views