कर्नाटकी धमाका… आमदारपुत्र, ४० लाखाची लाच आणि घरी ६ कोटी रुपये

Editorial
Spread the love

राजकारणात एन्ट्री मारल्यानन्तर  नेते गब्बर होतात की मुळातच  सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांकडे  नेतृत्व धावत येते, हे कोडे आहे.  कारण शोधूनही कोणी गरीब नेता सापडत नाही.  गब्बर नेत्यांचा आपला गरीब देश आहे.  हे पुढारी असा कोणता व्यवसाय करतात, की  ज्यात नफाच नफा आहे?  ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा विचार करताना  आज कर्नाटकात  धमाका झाला.  कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या एका  आमदाराचा पुत्र ४० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला आहे. विशेष म्हणजे आमदाराच्या ऑफिसमध्येच हा प्रकार सुरू होता. प्रशांत मदल नावाचा हा दिवटा बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचा  मुख्य लेखाकार आहे.  कर्नाटक लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी ४० लाखांची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडले.  नंतर त्याच्या घरून   ६ कोटीहून अधिक रोकड जप्त करण्यात आली.

           कर्नाटक साबण आणि डिटर्जंट लिमिटेडला  कच्चा माल उपलब्ध करण्यासाठी निविदा मंजुरीचा हा मामला  आहे.  निविदा  मंजुरीसाठी  प्रशांतने समोरच्या व्यक्तीकडे ८१ लाख रुपयाची लाच मागितली होती. त्याचे वडील म्हणजे आमदार के. मदल विरुपक्षप्पा हे केएसडीएलचे अध्यक्ष आहेत. यामुळे लोकायुक्त अधिकारी त्यांचीही चौकशी करतील. कारण वडिलांच्या वतीनेच  लाच घेताना मुलगा  पकडला गेल्याचा आरोप आहे.  

             मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, आम्ही लोकायुक्त यासाठीच आणला आहे.  लोकायुक्त नसल्याने काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आली आणि  बंद केली गेली.  दोषींना शिक्षा करण्याचं आमचं लक्ष्य आहे. लोकायुक्ताकडे सर्व माहिती आहे. तो कोणाचा पैसा आहे आणि तो कुठून आला आहे. सर्व काही तपासानंतर बाहेर येईल असे बोम्मई म्हणतात. त्यांच्यावर विश्वास  ठेवण्यापलीकडे   सामान्य माणूस काय करू शकतो?  

 129 Total Likes and Views

0 Comments

No Comment.