बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हैदराबादमध्ये गंभीर जखमी झाले. खुद्द त्यांनीच ही माहिती दिली. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर त्याचे हेल्थ अपडेट शेअर केले आणि सांगितले, की ते सध्या त्यांच्या मुंबईतील घरी विश्रांती घेत आहेत.
एका अॅक्शन सीनचे शुटींग करताना अमिताभ जखमी झाले असून त्यांच्या उजव्या बरगडीचे स्नायू फाटले आहेत. दुखापत झाल्यामुळे त्यांना शूट रद्द करावे लागले. आता दुखापतीतून बरे होण्यासाठी त्यांना काही आठवडे लागणार आहेत.
अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या मुंबईतील ‘जलसा’ बंगल्यात आराम करत आहेत. तेथूनच त्यांनी ब्लॉग लिहत झालेल्या जखमेची माहिती दिली. बिग बींनी लिहिले की, ‘हैदराबादमध्ये प्रोजेक्ट केच्या शूटिंगदरम्यान ॲक्शन सीन शूट करताना मी जखमी झालो. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली. त्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. हैदराबादमधील डॉक्टरांचा सल्ला घेतला असून सीटी स्कॅनही केले. आता घरी परतलो आहे. मलमपट्टी करण्यात आली असून सध्या मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. हे वेदनादायक आहे. हालचाल करण्यासाठी आणि श्वास घ्यायला त्रास होतोय.’
अमिताभची ही बातमी ऐकून धक्का बसला. ३६ वर्षापूर्वी अमिताभ ‘कुली’ सिनेमाचे शुटींग करतांना असाच मरता मरता वाचला होता. खलनायकाने पोटात मारलेला ठोसा जोरात लागला होता. अमिताभ हा खरोखरच एक चमत्कार आहे. ते ८० वर्ष वयाचे आहेत. खूप सारे त्यांना आजार आहेत. ह्या अवस्थेतही अमिताभ २४ तास बिझी असतात. कुठला सिनेमा किंवा कुठली जाहिरात …विश्रांतीचे नाव नाही. त्यात हा अपघात आल्याने त्यांचे चाहते चिंतेत आहेत. जरा आठवा. ‘कुली’च्या वेळेला तो बरा व्हायला वेळ लागला तेव्हा लाखो चाहते देव पाण्यात बुडवून बसले होते. आजही अमिताभभक्तांची स्थिती वेगळी नाही. देव करो आणि अमिताभ बरे होवोत.
94 Total Likes and Views