मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प मांडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर आता राजकीय नेत्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. शब्दांचे आणि आकड्यांचे फुलोरे अर्थसंकल्पात फुलविण्यात आले आहे. ज्या गोष्टी सत्यात उतरूच शकत नाहीत, अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्थसंकल्पात केलेला दिसतो, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी म्हटले आहे.
एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, यामुळे महाराष्ट्रातील जनता हैराण आहे. निवडणुकीतील भाषणात करावयाचे अनेक मुद्दे अर्थसंकल्पात आलेले आहेत. वास्तव आणि सत्याचे भान नसलेला, कधीही पूर्णत्वास न येऊ शकणाऱ्या घोषणांचा अर्थसंकल्पात पाऊस आहे, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली आहे.
सरकारचा मानस आहे, प्रस्तावित आहे, इच्छा आहे, भरीव तरतूद, आवश्यक निधी देण्यात येईल, अशा गोष्टी अर्थसंकल्पाचा भाग होऊ शकत नाही. लोकप्रिय घोषणा करायच्या, मात्र त्यासाठी तरतूद करायची नाही, जसे की सर्क्युलर इकॉनॉमिक पार्क उभारण्यात येईल, मराठी भाषा मंडळ स्थापन करण्यात येईल, संतांच्या स्मृती जतन करण्यात येतील, स्मारके उभारण्यात येतील हे निवडणुकीतील भाषणाचे मुद्दे असायला हवेत.
राज्याच्या अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्रातला शेतकरी, तरुण, महिला, मध्यमवर्गीय मोठ्या आशेने बघत होता. शेतकऱ्यांसाठी कोणतेही रचनात्मक पाऊल या अर्थसंकल्पात दिसत नाही. अस्मानी संकटाच्या जोडीने सरकारच्या रूपाने शेतकऱ्यांवर सुलतानी संकट चालून आल्याचेही या अर्थसंकल्पातून दिसते.
महागाईचा भस्मासुर झालेला असताना सर्वसामान्यांना कोणताही दिलासा या अर्थसंकल्पात देण्यात आला नाही. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढते आहे, महाराष्ट्रातील उद्योग केंद्राच्या आशीर्वादाने इतर राज्यांमध्ये पळवले जात आहे. त्या अनुषंगाने रोजगारनिर्मितीसाठी, उद्योग वाढ आणि विकासासाठी कोणतीही भरीव तरतूद अर्थसंकल्पात दिसली नाही. वास्तव आणि सत्याचे भान विसरलेला आणि निव्वळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या घोषणांच्या खैरातीचे वाटप असल्याचा घणाघात थोरात यांनी केला.
284 Total Likes and Views