उत्तर भारतात कबिरांपासून तर रविदास ते थेट वऱ्हाडातील गाडगेबाबा या सगळ्या संतांनी समाजाला खरा कर्मवाद समजावून सांगत जागृत केले आहे. वैदिक परंपरेत चार वर्णाच्या आधारावर माणसा माणसात निर्माण झालेला भेद दूर करण्याचे काम सगळ्या संतांनी जाणीवपूर्वक केल्याचे दिसते. कबीरांना तर विषमतेचे दाहक चटके सहन करावे लागले होते, त्याची आपल्या दोह्यातून अतिशय प्रभावी मांडणी करीत त्यांनी धर्म आणि धर्मग्रंथांची प्रभावीपणे चिकित्सा केली आहे. सामान्य लोकांना देवाच्या नावावर कसे लुबाडले जाते याचा अनुभव त्यांनी सगळ्या तीर्थक्षेत्रांवर जाऊन घेतला आणि त्यांच्या लक्षात आले की देव आणि सामान्य भक्त यांच्या मध्ये एक शोषणाची मजबूत यंत्रणा पुजारी,पुरोहितांनी उभारली आहे. आपण सगळी देवाची लेकरे आहोत असे मानले जात असेल तर आपल्या पित्याला भेटायला कोणत्या मुलांना दलालांची गरज असते ? असा खडा सवाल कबीरांच्या मनात उभा राहतो.
हाच विचारांचा धागा घेऊन महाराष्ट्रात सुद्धा वारकरी संप्रदायाने भक्तीची चळवळ उभी करून देव आणि सामान्य भक्त यांच्या मध्ये येणाऱ्या दलाल व्यवस्थेला कडाडून विरोध केला आहे. संत भक्ताला थेट देवाशी नाते जोडण्याचा संस्कार देतात ,त्याची प्राप्ती करून देण्यासाठी कोणताही मेहनताना भक्ताकडून घेताना दिसत नाहीत. उलट मनुष्याला परोपकार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी संतांनी पदरमोड केल्याचा आपला इतिहास सांगतो. लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे संत वारकरी परंपरेत निर्माण झाले आहेत. जाती धर्माचे आणि प्रसंगी देशाच्याही सीमा ओलांडून साऱ्या विश्वाच्या मंगलाची ,कल्याणाची कामना संतांच्या अभंगातून येते याचा अर्थ संतांचा विचार मानवतेला साजेसा आणि जगाचे कल्याण साधणारा होता हे दिसून येते. जो कुणाही कडून अपेक्षा ठेवत असेल तो संतत्वाच्या रांगेत बसण्यास पात्र असूच शकत नाही अशी शिकवण वारकरी संप्रदाय देतो.
ही बुवाबाजी भुलवी जना,भ्रष्ट करी ग्रामजीवना !
फासवोनि भोळ्या बापड्याना ,भलत्या छंदा लाविती !
या शब्दात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कथित संतांवर आसूड ओढताना दिसतात. लोकांचा स्वभाव ओळखून अनेक भोंदू संत गावागावात जाऊन कार्यक्रम करतात त्याचे आयोजन आपल्याच कुण्यातरी भक्ताकडून घडवून आणतात आणि आपले हस्तलाघव आणि वाणीचे सामर्थ्य दाखवून लोकांना भुरळ पाडतात अश्या पोटभरू लोकांपासून सावध राहण्याचा इशारा तुकडोजी महाराजांनी सतत दिला आहे. वास्तविक तुकडोजी महाराज सुद्धा देवाला मानणारे होते,त्यांनाही खऱ्या संतांच्या ठायी काहीतरी सामर्थ्य असावे असे वाटत होते मात्र आजच्या काळात असा कुणी संत अस्तित्वात आहे याचा ते इन्कार करीत होते. सतत समाजात फिरून लोकांची देवभोळी मानसिकता आणि साधेपणाचा कसा गैरफायदा घेतला जातो याची त्यांना माहिती होती. याच काळजीपोटी त्यांनी प्रबोधन केल्याचे दिसते.
देवाचे नाव घेऊन आपल्या देशात कुणालाही मूर्ख बनविता येते हे ज्यांना चांगले माहित आहे अश्या अनेक लोकांनी भारतीय लोकांच्या मानसिकतेचा काळजीपूर्वक अभ्यास करून स्वतःचे दुकान थाटले आहे अशी हजारो उदाहरणे आपल्या सभोवताली बघायला मिळतात. बुवाबाजी हा बिन भांडवली धंदा असल्याने हरघडी देवाचे नामस्मरण करीत लोकांना समजणार नाही अश्या अध्यात्मिक भाषेचा वापर करीत असंख्य लोकांची धार्मिक दुकाने विविध पंथांच्या नावाखाली सुरु आहेत. भारतीय वंशाचे श्रीलंकन सामाजिक नेते डॉ. अब्राहाम कोवूर नेहमी म्हणत असत की ” जो जो चमत्कार करतो तो तो बदमाश असतो आणि जो न तपासताच चमत्कारांवर विश्वास ठेवतो तो बावळट असतो. ” यावरून एक सूत्र लक्षात येते की लोकहिताची कळकळ असणारा कोणताही संत चमत्कार करण्याच्या भानगडीत पडत नाही कारण त्याने केलेले महान कार्य हाच एक चमत्कार असतो.
लोक चमत्कारावरी भुलती,मागाहूनि पच्छाताप करिती !
काही भुरळ पाडली म्हणती,आम्हावरी !
चमत्काराला नमस्कार करण्याची समाजाची मानसिकता लक्षात घेऊन जे लोक गारुड्यांचा व्यवहार करतात ते संत नाहीत ,लोक एकदा अश्या चमत्काराला बळी पडतात आणि नंतर पच्छाताप व्यक्त करतात ,आपण फसवले गेलो आहोत याची त्यांना जाणीव होते मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. स्वतःचा अपमान किंवा फसवणूक आपण जगाला कधीच सांगत नसतो यामुळे प्रत्येक चार कोसांवर शेकडो लोकांना विविध प्रकारे असे बुवा,बाबा फसवत देशाचे भ्रमण करीत असतात. आपल्या देशात लोकसंख्या आणि सहज बळी पडायला तयार असणारे लोक एवढे झाले आहेत की एकाला शोधायचे म्हटले तरी हजार लोक तुमच्या जाळ्यात सहज अडकायला तयार होतात हे आजचे वास्तव आहे. विज्ञानाचे शिक्षण घेणारे दाम्पत्य अंगठा बहाद्दर असणाऱ्या बाबांजवळ आपल्याला मूल कधी होणार हे बघण्यासाठी आजच्या काळातही जात असतील तर आपल्या पदव्याना आग लावण्याची वेळ आली आहे.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
172 Total Likes and Views