प्रत्येकासाठी त्याची आई स्पेशल असते. मग तो सामान्य माणूस असो की सेलिब्रेटी. आई सबकुछ असते. ती आपल्या मुला-मुलीची आई असते, बाप असते , सारे काही असते. घरोघरी जाता येणार नाही म्हणून देवाने आईला जन्माला घातले. आईची ही थोरवी ती गेल्यावरच कळते. ‘स्वामी तिन्ही जगाचा , आईविना भिकारी’ असे कवीने म्हटले ते उगाच नव्हे. आईची महत्ता अर्थाने कळते, ती गेल्यावर. आज तोच प्रसंग एका मुलीवर म्हणजे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यावर आला आहे. माधुरीच्या आईचं काल निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी त्यांचा ९०वा वाढदिवस साजरा केला होता. त्या गेल्या काही काळापासून अंथरुणाला खिळल्या होत्या.
आईच्या निधनानंतर माधुरी प्रचंड खचून गेली आहे. व्याकूळ माधुरीने आईच्या आठवणीत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने आईबद्दलच्या आपल्या भावना लिहिल्या आहेत. दररोज खोलीत असणारी आई तिथे नव्हतीच त्यामुळे तिची रिकामी खोली पाहून माधुरीला गहिवरून आलं. माधुरीने आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ही पोस्ट करत तिने लिहिलं, ‘आज सकाळी उठले तीच आईची खोली रिकामी दिसली. हे वास्तव होतं, जे सहन करण्याच्या पलीकडे होतं. तिने आम्हाला आयुष्य जगायला आणि त्याचा आनंद घ्यायला शिकवलं. तिने माझ्यासह कित्येक लोकांना खूप काही दिलंय. आमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी आम्हाला तिची आठवण येईल. पण ती आमच्या आठवणीत कायम राहील. तिचं ज्ञान, सकारात्मकता आणि ऊर्जा प्रचंड होती. आम्ही आमच्या आठवणीत तिचं आयुष्य साजरं करत राहू. ओम शांती ओम.’
आपल्या आईचे नेमके वर्णन माधुरीने इथे केले. ते वाचताना अनेकांना गहिवरून आले, अनेकांना रडू कोसळले. आई ह्या शब्दात ही जादू आहे…मग ती कोणाचीही असो. ती आपली असते. आईला कॉपीराईट करता येत नाही, हेच खरे.
286 Total Likes and Views