अमृता फडणवीस यांना लाच देऊ पाहणाऱ्या मुलीच्या बापालाही अटक, ७ वर्षे होता फरार

Editorial
Spread the love

‘कानून के हाथ बडे लंबे होते ही’ असे म्हणतात. ते खरे आहे.  अमृता फडणवीस यांना  एक कोटी रुपयांची लाच देऊ पाहणाऱ्या आणि नंतर धमकावणाऱ्या मुलीच्या म्हणजे  अनिश्का जयसिंघानी हिच्या बापाला म्हणजे अनिल जयसिंघानी याला पोलिसांनी अटक केली आहे. सात वर्षापासून फरार असलेला क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी  गुजरातमधून अटक केली. बाप-लेक दोघेही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे  ह्या भानगडीचा नेमका उलगडा व्हायला मदत होणार आहे.

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नीचा मामला होता म्हणून पोलिसांनी  हालचाल केली असे म्हणायचे का? असा प्रश्न आता लोकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. याप्रकरणाची एफआयआरची तारीख २०  फेब्रुवारी आहे. त्यानंतर १६ मार्चला यासंदर्भातील बातमी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. ७२ तासांच्या सलग सर्चनंतर अटक झाल्याचं पोलीस सांगत आहेत. इतकी वर्षे फरार असलेला आरोपी ५  दिवसांतच पकडला गेला. मग  इतके दिवस मुंबई पोलिस काय करत होते? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित होत आहे. पाच राज्यांचे पोलीस  अनिल जयसिंघानी ह्याच्या मागावर होते. तरीही तो सापडत नव्हता. आत्ताच कसा सापडला?

           सारेच प्रकरण म्हणजे  एक सस्पेन्स स्टोरी आहे. कोणाच्या ध्यानी मनी नसताना अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केल्याची बातमी आली आणि एकच खळबळ उडाली.  डिझायनर असल्याचे सांगून अनिश्काने अमृताचा विश्वास  संपादन केला.  तब्बल १६ महिने ती अमृताच्या संपर्कात होती. सुरुवातीला लाच देण्याची तयार दाखवली. ते जमले नाही तेव्हा तिने धमकावणे सुरु केले. तिला आपल्या वडिलाला गुन्ह्यातून  सोडवायचे होते.   त्या कामात अमृता मदत करील असा तिचा होरा होता. पण फसली.

       बापाला सोडवणे तर दूर राहिले, बाप-लेक दोघेही  आत गेले आहेत. कुख्यात सट्टेबाज अनिल जयसिंघानी विरोधात १४ ते १५ गुन्हे दाखल असून तो गेल्या ७ ते ८ वर्षांपासून फरार होता. तो एकप्रकारे टोळी चालवत असल्याचीही माहिती समोर येत आहे. तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची माहितीही पोलिसांना देत त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडत असल्याची माहितीही मिळते आहे. २०१५ मध्ये जयसिंघानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या उल्हासनगर येथील घरात छापा कारवाई केली होती. यावेळी मोठे नेटवर्क ईडीच्या हाती लागले. याप्रकरणात तब्येतीचे कारण पुढे त्याने उच्च न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबईत साकीनाका आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत, अहमदाबाद कोर्टानेही त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वारंट जारी केले होते. यावेळी देखील त्याने आजारी पडण्याचे नाटक केले होते. त्यानंतर, बायकोच्या शस्त्रक्रियेसंबंधित बनावट कागदपत्रेही सादर केले होते. ईडीसह  मुंबई, ठाणे, गोवा, आसाम, गुजरात आणि मध्यप्रदेश पोलीस त्याचा शोध घेत होते.

                 इतक्या वर्षानंतर आता  अनिल पोलिसांना  कसा हाती लागला? पोलिसांनी सांगितले की,  तांत्रिक बाबींची मदत घेऊन तो स्वतःची ओळख लपवत असे. तांत्रिक विश्लेषणात अनिल जयसिंघानी  महाराष्ट्रातील शिर्डीतून गुजरातमधील बार्डोली येथे गेल्याचे आढळून आले.  गुजरातेत मुंबई पोलिसांच्या  गुन्हे शाखेची तीन पथके पाठवण्यात आले होती. या पथकांनी  सुरत पोलिस तसेच बडोदरा येथील पोलिसांशी समन्वय करत गुजरातमध्ये मोहिम राबवली.  अनिल जयसंघानी हा लोकेशन लपवणे आणि पोलिसांना गुंगारा देण्यात तरबेज दिसतो. तब्बल ७२ तास पोलिसांना चकवा देत होता. बारडोली येथे पोलिसांनी सापळा रचला.  तेथून तो निसटला. सुरतमध्येदेखील तो सापडला नाही. बोर्डोलीहून सुरत, बडोदा मार्गे गोधरा येथे पळून जात असताना ७२ तासांच्या पाठलागानंतर त्याला नाकाबंदी करून रात्री पावणेबाराच्या सुमारास कलोल या गोधराजवळच्या ठिकाणी पकडण्यात आलं. त्याला  मदत करणाऱ्या लोकांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

 98 Total Likes and Views

0 Comments

No Comment.