गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाने सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवलं असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे.
गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. गेल्या आठवड्यात याप्रकरणी सुनावणी पार पडली होती. आज याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली.
सुरत न्यायालयात राहुल गांधीही पोहचले होते. तेव्हा न्यायालयाने राहुल गांधींना तुम्हाला काही मत मांडायचं आहे का? असं विचारलं. त्यावर ‘मी सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात बोललो आहे. कोणाच्या विरोधात जाणूनबुजून बोललो नाही. त्याने कोणाचंही नुकसान झालं नाही,’ असं राहुल गांधींनी म्हटलं.
प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मात्र भावाच्या शिक्षेवर ट्वीट करत केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. “घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण, माझा भाऊ कधी घाबरला आणि घाबरणारही नाही… सत्य बोलत आलो आणि सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू… करोडो देशवासीयांचं प्रेम राहुल गांधींच्या पाठीशी आहे,” असं प्रियंका गांधींनी म्हटलं.
446 Total Likes and Views