शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. ‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार, भुमरे माझे भाऊ आहेत. पण, तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत,’ असं विधान शिरसाट यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, अंधारे यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. यावर आता शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शिरसाट म्हणाले, “मी काय चुकीचं बोललो आहे? सुषमा अंधारेंना ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी माझ्या घरी बोलवून बहीण म्हणून साडीचोळी दिली आहे. हे नातं जपणारे आम्ही लोक आहोत. मग, तुम्ही तुमच्या भाषणात ‘संज्या’, ‘घोडा’ म्हणणार हे तुमच्या संस्कृतीला चांगलं वाटतं? तुम्हाला तो अधिकार दिला आहे का?”
सभेत नेमकं काय म्हणाला होता? असं विचारला असता शिरसाटांनी सांगितलं, “संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना म्हणालो, तुम्ही काय लफडे केलीत. त्यामुळे अंधारे इकडे सभा घेत आहेत. यात चुकीचं काय आहे? आमच्यावर संस्कार आहेत. ज्यांना शिवसेना कळाली नाही, ते हिंदुत्वावर बोलतात. काही लोक संस्कारावर बोलून, त्या शब्दाचा अपमान करत आहेत.”
अंधारे यांना आव्हान देताना सिरसाट म्हणतात, तुमच्या पाठीमागे जे कर्तेधर्ते आहेत त्यांनाही सांगतो. संजय शिरसाट पोटासाठी राजकारण करणारा माणूस नाही. तुम्हाला जर लढायचं असेल तर समोरासमोर लढा. यापुढं लक्षात ठेवा. माझ्याविरोधात जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याला मी त्याच भाषेत उत्तर देईन. कुठेही मी मागं हटणार नाही. गेली उडत ती आमदारकी. हे जे सुरु आहे त्याकडं लोक डोळे उघडे ठेवून बघत आहेत. सगळ्याचं तुमच्याकडं लक्ष आहे. आम्हाला घेणं देणं नाही, जेवढं वाटोळ करायचं आहे तेवढं त्या पक्षाचंही करा. तुम्हाला एका ठिकाणी थांबायची सवय नाही. आत्तापर्यंतची जे काही तुमचं भ्रमण सुरु आहे, इथं तुमचा शेवट होणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही सर्व पक्ष फिरुन गोल चक्कर मारून एका काठावर आला आहात.
शिरसाट आपल्या वक्तव्यावर कायम असल्याने हा विषय काय वळण घेतो त्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
51 Total Likes and Views