नितीन गडकरी का हवेत?

Editorial
Spread the love

देशाचे लोकप्रिय नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्राला पडलेले गुलाबी स्वप्न आहे. कालिदास असता तर डोक्यावर घेऊन  नाचला असता. आपण कुठे आहोत? गडकरी  बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एकेकाळी ‘ठाकरी भाषा’ होती.  गडकरींची स्वतःची ‘गडकरी भाषा’ आहे. त्यांच्या ह्या भिडणाऱ्या भाषेवर पब्लिक बेहद्द खुश असते. पण परवा  गडकरी जे बोलले ते ऐकून नागपूरकरांच्या हृदयाचा ठोका चुकला. “मतांसाठी आता मी फार लोणी लावणार नाही. पटले तर मतं द्या.  मी नाही तर कुणी नवीन येईल” अशी बेधडक भूमिका  त्यांनी मांडली.  “आपल्याला समाजकारणाच्या कामात  अधिक वेळ द्यायचा  आहे” असे गडकरी म्हणाले.   सनसनाटी बातमी  देण्याच्या मोहाने मिडीयाने  त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ शोधला. गडकरी रिटायर होऊ पाहताहेत   अशी हवा पसरली आणि नागपूर सुन्न झाले. गडकरी अर्ध्यावरती डाव मोडणार की काय?  ‘वनराई’ च्या वतीने  गडकरी यांना ‘मोहन धारिया  राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या समारंभात  गडकरी बोलत होते. असं भयंकर बोलण्याची गडकरींची ही पहिली वेळ नाही. ह्या अगोदरही   दोनतीनदा गडकरी हे बोलले आहेत. जुलैमध्ये तर ते स्पष्टच बोलले होते. “कधी कधी तर वाटते की राजकारण सोडून दिले पाहिजे” अशा शब्दात त्यांनी त्यांच्या मनातील वादळांना  वाट करून दिली होती.  त्यामुळे  गडकरींच्या मनात नेमके चाललंय तरी काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असणार. गडकरींचे पोट केवळ राजकारणावर नाही. शेती, पर्यायी इंधन, पर्यावरण …अशा अनेक क्षेत्रात गडकरींचे  नवनवे प्रयोग सुरु असतात. ते ठीक आहे. पण लोकसभा निवडणूक वर्षावर आली आहे. सारे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते  मतदारांच्या दाढ्या गोंजारत असताना गडकरी मात्र बिनलोण्याच्या गोष्टी करताहेत.  हंगामा तर होणारच.  पण एक सांगतो. एवढी हिंमत गडकरीच करू शकतात.   दुसऱ्या कुण्या नेत्याने  गडकरींची कॉपी केली तर मस्तावला  म्हणत लोक त्याचे डीपोझीट जप्त करतील. गडकरींच्या अशा अनेक वक्तव्यांनी मागेही धमाल केली आहे.  मंत्र्यांच्या पी.ए.बद्दल बोलताना ‘चहापेक्षा किटली गरम’ हे त्यांचे वक्तव्य गाजले.   ‘अच्छे दिन आयेंगे’ हे स्लोगन  आमच्या सरकारच्या गळ्यातील हाडूक बनले   ह्या त्यांच्या वक्तव्यालाही   मोठा टीआरपी मिळाला होता. विचार आणि व्हिजन स्पष्ट असेल तोच  एवढे  बोलू शकतो. गडकरींची ही ‘कमाई’ इतरांना जमलेली नाही.  गडकरी गेली ८ वर्षे  लोकसभा गाजवत आहेत. मात्र त्या आधी  ते तब्बल २५ वर्षे विधान परिषदेवर  निवडून येत. ‘मागच्या दराने येणारा नेता’ म्हणून  त्यांनी टोमणेही खाल्ले आहेत.  २०१४ मध्ये पहिल्यांदा  गडकरी नागपुरातून लोकसभा लढले. सात टर्म खासदार राहिलेल्या कॉंग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांना  हरवून  त्यांनी लोकसभेत  दणदणीत एन्ट्री मारली. बहुजन समाजाचे प्राबल्य असलेल्या नागपुरात ब्राम्हण समाजाच्या उमेदवाराने निवडून येणे  सोपे नव्हते.  गडकरींनी तो चमत्कार केला.  सर्वसमावेशक  चेहऱ्याच्या जोरावर ते हा इतिहास घडवू शकले. गेल्या निवडणुकीत तर राहुल गांधींनी नाना पटोले यांना नागपूरच्या शिकारीवर पाठवले होते.  दोन्ही निवडणुकीत दोन-दोन लाखापेक्षा अधिक मतांनी गडकरींनी  मैदान मारले आहे.  ह्या वेळेला लढले तर चार लाखाचा लीड घेतील एवढे त्यांचे काम आहे. मुस्लीम  समाजातही गडकरींची स्वतःची व्होट बँक आहे. गडकरी हे जमवतात कसे? हे आजही अनेकांना कोडे आहे.

             हा नेता  सकारात्मक विचार करतो, रिझल्ट देतो,  जातीभेद पाळत नाही. विकास हीच गडकरींची व्हिजन आहे. विकासासाठीच गडकरी देशभर ओळखले जातात. सार्वजनिक बांधकाम खाते नावाचे कुठले खाते असते हे एकेकाळी  लोकांना ठाऊक नव्हते. गडकरींनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असताना  ह्या खात्याला चेहरा दिला.  राज्याचे बांधकाम मंत्री ह्या नात्याने त्यांनी बांधलेले  मुंबई-पुणे  सुपर एक्स्प्रेस वे आणि मुंबईतले   ५५ उड्डाणपूल  गडकरींच्या  दूरदृष्टीचे ट्रेलर आहेत.  हे नसते तर मुंबईच्या रस्त्यावर आज अराजक  दिसले असते.  पुढे   केंद्र सरकारमध्ये  रस्ते वाहतूक मंत्री म्हणून   आपल्या धडाकेबाज  कार्यशैलीतून  त्यांनी रस्ते बांधणीचा सपाटा लावला.  रस्त्यांच्या त्यांच्या कामामुळे  आपला देश मुठीत आला आहे.  अवघ्या काही तासांमध्ये  माणूस कुठच्या कुठे पोचतो.  भारताची श्रीमंती वाढवण्यात गडकरींचा मोठा वाटा  आहे हे कबूल  करावेच लागेल.    खुद्द सोनिया गांधी  ह्या प्रश्नावर त्यांच्या  चाहत्या आहेत.  आता बोला. पक्षाशी एकनिष्ठ राहूनही माणूस  सर्वांना न्याय देऊ शकतो याचे दर्शन  गडकरींनी कोरोनाकाळात घडवले. त्यांनी केलेल्या धडपडीमुळे हजारो   रुग्णांना  वेळीच  ऑक्सिजन आणि औषधं मिळाली. तब्येत गंभीर झालेल्या स्वतःच्या पी.ए.ला  ‘एअर अन्ब्युलंस’  करून  हैद्राबादला पाठवले. कोण्या मंत्र्याने आपल्या कर्मचाऱ्याचा एवढा विचार केला असेल?  गडकरी हे असे रसायन आहे. तब्येतीच्या समस्या असतानाही गडकरी १८-१८ तास  काम करीत आहेत.

           कॉन्ग्रेसचे  विद्वान नेते  डॉ. श्रीकांत जिचकार हे गडकरींचे मित्र.  जिचकार एकदा गडकरींना म्हणाले, ‘तुम्ही चुकीच्या पक्षात आहात. आमच्याकडे या.’ कॉंग्रेसच्या नावावर दगडही निवडून यायचा त्या काळातली ही ऑफर होती.  गडकरींनी  ती स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता.  हल्ली कपडे बदलावे  तसे  नेते पक्ष बदलतात. निष्ठा विष्टा झाल्या आहेत.  संघाच्या मुशीत तापलेले गडकरी हे बावनकशी सोने आहे. विकासाची दृष्टी नसलेला चुकीचा उमेदवार निवडून आणला तर शिक्षा  शेवटी जनतेलाच होते. डॉ. जिचकार यांना भंडारा आणि नंतर रामटेकमध्ये लोकांनी पाडले. जिचकारांचे   फारसे काही बिघडले नसेल. पण विकासाच्या शर्यतीत ते मतदारसंघ मागे पडले.  त्यामुळे चांगला  खासदार, आमदार मिळणे  ही देखील  भाग्याची आणि नशिबाचीही गोष्ट म्हटली पाहिजे.  नागपूर उशिरा का होईना, त्या मानाने  नशीबवान म्हटले  पाहिजे. एकेकाळी एकेका पैशाला नागपूर महाग होता. सारा निधी पश्चिम महाराष्ट्रात पळवला जाई.  गडकरी-देवेंद्र फडणवीस जोडीने  प्रचंड पैसा  खेचून आणला. पूर्वी हिवाळी अधिवेशनातच नागपूर जागे असे. बाकी ११ महिने नागपुरात काही घडतच नसे. आज  विकास कामांचा धडाका  सुरु आहे. रस्ते चिकणे झाले आहेत. एम्सपासून ट्रिपल आयटीपर्यंत राष्ट्रीय कीर्तीच्या  संस्था नागपुरात आल्या आहेत. ज्या मोहाने लोक मुंबई, पुण्याकडे धावायचे ते सारे आज नागपुरात आहे. नागपूरचे पोस्टिंग आता काळ्या पाण्याची शिक्षा राहिलेली नाही.  नागपूर आता ओळखू येत नाही इतके बदलले आहे. आणखी बदलणार आहे. अशा वेळी  गडकरी  निरोपाची भाषा करीत असतील तर  जनसामान्यांच्या पोटात गोळा उठणे   स्वाभाविक आहे.

                तुम्हाला एक सांगू का?   गडकरींना वजा करून नागपूरची कल्पनाच करवत नाही. गडकरी नाहीत तर कोण? ‘नेहरूनन्तर कोण?’ हा प्रश्न  नेहरूंच्या हयातीतच  विचारला गेला.  नेहरूंच्या जागेवर अनेक टपून होते.  मात्र सद्यस्थितीत  नागपुरात  गडकरींचा पर्याय गडकरीच.  राहुल गांधींनी गेल्या वेळेला  नाना पटोले यांना बळीचा बकरा बनवले. ह्या वेळी तर तसा बकराही मिळणे अवघड आहे. ‘मी नाही तर कुणीतरी येईन’ असे गडकरी म्हणाले आहेत.  खरे आहे. इथे कोण अमरपट्टा  घेऊन आले आहे? पण जो येईल तो गडकरी नसेल, अशी शिक्षा  आतापासून  नागपूरला का? तब्येतीमुळे किंवा इतर कारणाने गडकरींनी वेगळा विचार चालवला असेल तर विकासाची काळजी करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी येते.  शेवटी नागपूर आणि नागपूरचा आत्मा महत्वाचा आहे.

 ( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

 126 Total Likes and Views

0 Comments

No Comment.