आपल्याकडचेच राजकारणी भानगडी करतात अशातला भाग नाही. साऱ्या जगातले राजकारणी एका माळेचे मणी असतात. काही पैसा खातात तर काही बाया खातात. आता ह्या डोनाल्ड ट्रम्पचेच घ्या. आज वयाच्या ७६ व्या वर्षी रिपब्लिकन पक्षाचा हा नेता भलत्याच आरोपांना समोर जातो आहे. भानगड आहे बाईची आणि तिने भांडाफोड करू नये म्हणून तिला गुपचूप दिलेल्या पैश्याची. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्यावरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना ज्युरीने आरोपी घोषित केले आहे. अमेरिकेच्या इतिहासात ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत, ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप झाले आहेत आणि त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे. ट्रम्प यांना लवकरच अटक झाल्यास अटक होणारे ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असतील.
मामला तसा जुना आहे. २०१६ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आरोपांपासून वाचण्यासाठी स्टॉर्मी डॅनियल्स या स्टारला गुप्तपणे पैसे दिल्याचा ठपका ठेवत मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर खटला चालवण्यास गुरुवारी मंजुरी दिली. आता पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सने या प्रकरणात तिला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल लोकांचे आभार मानले आहेत.
हे संपूर्ण प्रकरण २०१६ मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलला एक लाख तीस हजार डॉलर्स देण्याच्या चौकशीशी संबंधित आहे. २०१६ मध्ये पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलने मीडियासमोर सारे सांगून मोकळी झाली होती. तिने खुलासा केला होता की, तिचे २००६ मध्ये ट्रम्पसोबत संबंध होते. हे समजल्यानंतर, ट्रम्प टीमच्या वकिलाने स्टॉर्मीला शांत राहण्यासाठी पैसे दिले. ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांनी २०१९ मध्ये ग्रँड ज्युरीसमोर साक्ष दिली आहे. त्यांनीही सांगितले की, ट्रम्पच्या वतीने डॅनियल्सला पैसे दिले गेले होते, जे नंतर निवडणूक प्रचार खर्चात दाखवले गेले.
डॅनियल्सने २०१८ च्या ‘फुल डिस्क्लोजर’ या पुस्तकात ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीचा खुलासा केला होता. पुस्तकानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची भेट जुलै २००६ मध्ये एका गोल्फ स्पर्धेदरम्यान स्टार स्टॉर्मी डॅनियल्सशी झाली होती. त्यावेळी डॅनियल्स २७ वर्षांची होती आणि ट्रम्प ६० वर्षांचे होते. या भेटीच्या सुमारे चार महिने आधी ट्रम्प यांची तिसरी पत्नी मेलानिया यांनी मुलगा बॅरॉनला जन्म दिला होता. डॅनियल्स तिच्या पुस्तकात म्हणते की, या दरम्यान ती विचार करत होती की “कदाचित हा मी आतापर्यंत केलेला सर्वात कमी प्रभावी सेक्स असू शकतो.”
मात्र ट्रम्प यांनी त्यांच्यावरील आरोपांना राजकीय छळ आणि निवडणुकीत हस्तक्षेप असल्याचे म्हटले आहे. त्याचा परिणाम विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यावर होईल, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्पचे टेन्शन वेगळे आहे. तिथल्या येत्या निवडणुका त्यांना लढायच्या आहेत. पाहू या, ट्रम्प यांना अमेरिका कसे स्वीकारते ते.
165 Total Likes and Views