पुण्या-मुंबईच्या लोकांसमोर नागपूरचे नाव काढले तर सर्वप्रथम ते नाक मुरडतात नागपूरच्या उन्हाळ्याला! नागपूरकर मात्र हा उन्हाळा चांगलाच एन्जॉय करतात. पुणेकरांच्या भाषेत सांगायचे तर नागपूर हे अजूनही बैठे घरांचे शहर आहे. साठ-सत्तरच्या दशकात जेव्हां कुलर, एसी नव्हते तेव्हां घराच्या अंगणात किंवा टेरेसवर झोपण्याचे थ्रिल असायचे. मग आतापर्यंत अडगळीच्या खोलीत पडलेली खाट किंवा बाज होळी नंतर बाहेर निघायची. खाटेची नारळाची दोरी किंवा निवारीची वीण ढिली झालेली असेल तर ती कसून विणायला खाट विणणारे रस्त्यावरून आवाज द्यायचे. खाट विणणे एक कला होती. बऱ्याच घरांत एक लहान आकाराची आजीच्या काळातील खाट सुद्धा असे. तिची दोरी न टोचणारी! आणि विणही खास वेगळ्या थाटाची! थ्री डी वाटावी अशी. वेगवेगळ्या अँगलने पाहिल्यास तिचे डिझाईनही वेगवेगळे दिसे. फार थोड्यांना ती विण येत असे. खाटेच्या पायाला ठावा म्हणत. एखादा ठावा तुटला तर दुरुस्त करायला वाढी घरासमोर आवाज देत हिंडत.
संध्याकाळी अंगणात आणि गच्ची म्हणजे टेरेसवर पाईपने पाणी शिंपडायचे. व्ही आर सी ई, अंबाझरीकडे त्या काळी झाडांचे जंगल होते. संध्याकाळचं वारं लवकर थंड होई. वाऱ्याची थंड झुळुक अंगावर घेत, तारे न्याहाळत रात्री गादीवर पडण्यात अवर्णनीय मजा होती. आकाशात वाहनांच्या धुराचे प्रदूषण नव्हते, सोडियमव्हेपर लॅम्पस् चा झगमगाटही नव्हता. स्वछ काळ्याकुट्ट आकाशात मग आजी ध्रुवाचा तारा, शुक्र तारा, अरुंधती, सप्तर्षी वगैरे जुजबी खगोलशास्त्र शिकवी. खेड्यात ‘सप्तर्षी’ला ‘बुढीचं खाटलं’ म्हणत. मला वाटतं खाटेवर पडल्या पडल्या ही उपमा सुचली असावी. कधी कधी जोराचा वारा अंगावरची चादर उडवी. दोन घरांमध्ये साधे तारेचे कुंपण असे. चार घरांचे अंगण सहज नजरेच्या टप्प्यात असे. जेवणानंतर अंगणातच शतपावलीची सोय असे. मग श्यामला काकू, घाटे काका ढेकर देऊन आपुलकीने आजूबाजूच्या मुलाबाळांना आवाज देत. काय रे आज स्वयंपाकात काय केलं आईनी? पुण्याच्या मावशीचा किती दिवस मुक्काम आहे? रिझल्ट कधी आहे? वगैरे. तसेच नेनेंच्या शोभाला आज पहायला आले होते, लोक फार शिष्ठ होते, हे साऱ्या लाईनला तारेच्या कुंपणावरून सरक्युलेट होत असे. झोपण्यापूर्वी घराघरातील घरगुती संवाद किंवा वाद-विवाद एकमेकांना ऐकू येत. त्याचे काही वाटत नसे. तसेही प्रत्येकाच्या घरचे वातावरण सगळ्यांना माहीत असायचे. जसे शेवडेकाकू काकांना जास्तच डॉमिनेट करतात, त्रिवेदींच्या चिकूला नेहमी बाउन्डरीवर मार्क्स असतात, देसाईंचा गुंडू आईबापांच ऐकत नाही इ.
रात्री अकरापर्यंत आपसातल्या गप्पा चालत. मग एखाद्या घरची गृहिणी फटकारायची “झोपा आता”. मग सगळं सामसूम होत असे. सवयीने पलीकडून शिंक, ढेकर किंवा जांभईचा नुसता आवाज आला तरी आम्ही मुले ओळखत असू कोणत्या काकांनी दिली ते. सकाळी मात्र बाज उचलण्यात बाजी मारावी लागे, नाहीतर लगेच बाजूच्या गच्चीवरून सुधा वहिनी टोकत, “कुंभकर्णा सारखा झोपतो नुसता.” सुर्योदयासोबत बाजीवरच चहाबरोबर पेपरची लज्जत काय असते ते आमच्या सारख्या ‘बाजी’-प्रभुंनाच ठाउक. आताच्या एसी संस्कृतीला ते शब्दात सांगता येणार नाही.
सुट्टीत मावस/आत्ये भाऊ-बहिणी महिनाभर राहायला येत. दुपारी गाण्यांच्या भेंड्या, पत्ते, व्यापार, विविध भारती आणि नाश्त्याला कच्चा चिवडा! चेंज म्हणून घरपोच वाचनालयाची पुस्तके. साने गुरुजी ते बाबुराव अर्नाळकर! शिवाय चांदोबा, कुमार, फुलबाग इत्यादि मासिके! दुपारी विकतचा बर्फ टाकलेल्या गावरानी आंब्याच्या रसावर ताव मारायचा. बेगमपल्ली आंबे फारशे प्रचलित नव्हते.
रात्री ‘ब्लु बेल’ आईसक्रीमची हात-गाडी रस्त्यावर फिरत असे. घरात कुणाचा चांगला रिझल्ट लागला तर रात्री फेरफटका मारून आल्यावर ब्लु बेल आईसक्रीमचा फॅमिली पॅक घ्यायचा. कुणावर अन्याय होणार नाही अशा रितीने आई त्याची वाटणी करायची.
तशातच पाहुणी म्हणून आलेल्या एखाद्या ताईला एके दिवशी नागपुरातले स्थळ पहायला यायचे. ठेवणीतल्या कपबशा काढल्या जायच्या. ओल्या रुमालात जपून ठेवलेला वैद्यांच्या अंगणातला नाजूक इंग्लिश गुलाब वेणीत खोचला जायचा. येणाऱ्या पाहुण्यांसाठी शेजारच्या काकांकडून जास्तीचा उषा टेबल फॅन मागून आणला असायचा. ताईसारखा तो ही लाजून खालच्या मानेने वरपक्षाकडे निसटता कटाक्ष टाके.
पाहता पाहता सुट्टी संपत यायची. शाळेचे वेध लागत. सुट्टीतले पाहुणे निघून गेले कि घर सुनं सुनं वाटू लागे.
आता फ्लॅट संस्कृती आली, पण उन्हाळ्याचे थ्रिल काही कमी झाले नाहीे. फक्त स्वरूप बदलले. उन्हाळ्याची चाहूल लागली कि अडगळीतला कुलर काढून त्याला पेंट करणे, नव्याने खस/ वुड-वुल टाकून वायरिंग चेक करणे हा नागपूरकरांचा छंद आहे. मुंबईचा पाहुणा पहिल्यांदाच आला तर कुलरची मजा एसी त नाही म्हणून कबूल करतो. रात्री गाढ झोपतो आणि कडक उन्हामुळे नागपुरात ढेकणं नाहीत म्हणून सांगतो. बालकनीतून दूरवर नजर टाकली तर काँक्रीटच्या जंगलातही हिरवीगार झाडी डोकावताना दिसते. जागोजागी कबूतर, सुतारपक्षी, नीलकंठ, भारद्वाज अशा असंख्य जातीचे पक्षी आणि लव्ह बर्डस् यांचा किलबिलाट असतो. पहाटे पहाटे तर शेकडो पोपटांचा थवाच्या थवा पेरूच्या झाडाभोवती पिंगा घालत असतो. नागपुरात घरांभोवती रेंगाळणाऱ्या शेकडो जातींच्या पक्षांचे रहस्य या कुलरमध्ये दडले आहे. दुपारच्या नीरव शांततेत वेगवेगळे पक्षी आळीपाळीने कुलरच्या काठावर बसून आपली तहान भागवतांना दिसतील. सूर्य उतरणीला लागला कि आजही घरासमोरून गोठ्याकडे परतणाऱ्या गाई-म्हशींच्या लांबलचक रांगा दिसतात. उन्हाळ्यातही मोकळ्या जागेत त्यांना चरायला भरपूर कुरण उपलब्ध आहे. कधी-मधी पेरू, पपई, सीताफळ यांचा फडशा पाडायला माकडांचा कळपही येतो, तेव्हां मात्र मुंबईचा पाहुणा अचंभित होतो.
आताशी बदल म्हणून मुलांसाठी हॉबी क्लासेस, ज्युडो-कराटे, स्वीमिंग, स्केटिंग दिमतीला आहे. कंटाळा आला तर सिनेमॅक्स, पी व्ही आर आहेत. शिवाय बर्गर, पिझ्झा यांची होम डिलिव्हरी आहे. मुख्य म्हणजे आईसक्रीमचे शेकडो प्रकार चाखायला खिशात पैसाही आहे. पण पूर्वीसारखे महिना महिना जीवाचे नागपूर करायला आता कुणा जिवलग नातेवाईकाला वेळ नाही. घरात किचनपर्यंत हक्काने डोकावून विचारपूस करणारे शेजारी नाहीत. भेंड्या, व्यापार मागे पडले. पत्त्यांचाच पत्ता नाही. उन्हाळ्यातली गंमतच गेली.
रोज टीव्ही वर टेम्परेचरचे उच्चांक पहाता पहाता एक दिवस पावसाची चाहूल लागते. दहा दिवसानंतर गणपतीचा निरोप घेतांना मन जितके व्याकूळ होते, तितकेच हा कुलर डिसमँटल करतांना नागपूरकरांचे मन हळवे होते. या मैना-राघुंशी जवळीक साधायला कुलर हेच एक माध्यम होते.
पाखरे माणसाळली म्हणण्यापेक्षा आम्हीच पक्षाळलो होतो. आता या गोंडस पाखरांचा निरोप घ्यायची वेळ येणार म्हणून मन खट्टू होते. येणाऱ्या पावसाची त्यांनाही चाहूल लागली असते. पण ज्या अंगणात ‘होम’ली वाटले असते त्या अंगणाची ओढ त्यांनाही सोडवत नाही. मानवाचे सान्निध्य त्यांना ‘मानव’ले असते. याच कुलरची खस आणि वुडवुल वापरून घराच्या व्हेंटिलेटर मध्ये त्यांनी आपले नवीन घरटे बांधायला घेतले असते. !





1,085 Total Likes and Views