नवी मुंबईत खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण समारंभात जो अपघात झाला त्यात नेमके किती भाविक दगावले याची खरी माहिती अजूनही समोर येत नाही. उष्माघाताने आजवर १३ भाविक दगावले असल्याचे सांगण्यात येत असले तरी लाखो लोकांच्या गर्दीत यापेक्षा जास्त लोक गेले असल्याची जी चर्चा सुरु आहे त्यावर सरकार किंवा आयोजकांच्या वतीने अद्यापही कुणी का बोलायला तयार नाही ? गेल्या दोन दिवसांपासून या गर्दीतील चेंगराचेंगरी दाखविणाऱ्या काही चित्रफिती सोशल मीडियावर फिरवल्या जात आहेत त्यातून तर वास्तव फारच भयंकर जाणवत आहे. सरकारच्या कोणत्याही खात्याला त्याची दखल घ्यावीशी का वाटत नाही ? दुसरीकडे धर्माधिकारी यांच्या श्री संप्रदायातील लोकांना त्यावर काहीही बोलण्याची मनाई करण्यात आली असून लाखो लोकांमधून शंभर दोनशे लोक मेलेत तर बिघडले कुठे ? अशी चीड आणणारी वक्तव्ये केली जात आहेत ,हा असंवेदनशीलतेचा नमुना म्हणावा लागेल. या अपघाताचे कवित्व अजूनही संपले नाही जसा जसा काळ पुढे जात आहे तशी काही दृश्ये आणि पुरावे समोर येताना दिसत आहेत. या अपघातात प्राण गमावलेल्या लोकांचा आकडा शंभरपेक्षा जास्त असावा अशी शंका अनेकांकडून व्यक्त होत आहे. खुद्द विरोधी पक्षनेते द्वय अजित पवार आणि अंबादास दानवे यांनी झालेल्या प्रकारची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करून आता चार दिवस उलटले तरी त्यावर सरकारची किंवा गृहमंत्र्यांची कोणतीही भूमिका का जाहीर होत नाही. नवी मुंबई परिसरातील अनेक रुग्णालयात अजूनही असंख्य लोक भरती झाल्याचे सांगितले जाते मग त्यांचा नेमका आकडा का सांगितला जात नाही? सरकारचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस याना या प्रकरणात नेमके काय लपवायचे आहे ? असाही प्रश्न विचारला जात आहे. सरकारने एकदा यावर सविस्तर माहिती घेऊन भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मुळात सरकारी पुरस्कार सोहळे सरकारने ठरवलेल्या जागेत व्हायला हवेत असे असताना ज्यांना हा पुरस्कार दिला गेला त्यांच्या मर्जीने हे सरकार वागायला तयार का झाले त्याचे कारण सरकार चालविणारे प्रमुख घटक या बुवांचे भक्त आहेत हे आता उघड झाले आहे. अपघात झाल्यानंतर प्रशासन पातळीवर नेमके काय रामायण घडले त्याचे दर्शन आता व्हायला लागले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याची जबाबदारी मुळात ज्या सांस्कृतिक खात्याकडे असते त्या खात्याने खारघरला सोहळा घेण्यास संमती नाकारली होती. मुख्यमंत्री शिंदे याना मात्र अप्पा धर्माधिकारी आणि त्यांच्या मागे असणाऱ्या लाखो मतांची मर्जी सांभाळायची होती त्यामुळे जशी अप्पांची मर्जी तसे शिंदे वागायला लागले. पुरस्कार वितरण कार्यक्रमाची तयारी कशी सुरु आहे याचा आजवर मुख्यमंत्री कधीच आढावा घेत नसतात मात्र इथे शिंदे तो घेताना दिसले याचा अर्थ आपले मुख्यमंत्री सुद्धा भक्ताच्या भूमिकेत शिरले होते हे लक्षात येते. राष्ट्रे पातळीवर या पुरस्काराच्या निमित्याने राज्याची मोठी नामुष्की गेल्या काही दिवसात होत आहे ती यापूर्वी कधी झाली नाही. पुरस्कार वाटपाचे निकष गर्दी खेचणे हे कधीपासून झाले ? याचा मोठे नवल लोकांना वाटत आहे. केंद्रात भारत रत्न हा देशाचा सर्वात मोठा सन्मान असतो मात्र तो सुद्धा कधीच दिल्लीच्या बोट क्लबवर विराट सोहळा घेऊन वितरित केला जात नाही. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जात नाही. कितीही मोठा पुरस्कार असला तरी तो राष्ट्रपती भवनात वितरित केला जातो. आपल्याकडेही विशाल आणि ऐसपैस असे राजभवन असताना सोहळा इतरत्र का हलविला गेला आणि लाभार्थी म्हणेल तेवढी संख्या आणून शक्ती प्रदर्शन का केले गेले ? याचे उत्तर कुणी द्यायला तयार नाही. प्रश्न असंख्य आहेत ,त्याची उत्तरे कुणी द्यावीत असा या सरकार आणि प्रशासनात संभ्रम आहे. जो तो हात वर करताना दिसत आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न जो प्रत्येक नागरिक विचारत आहे तो म्हणजे या सोहळ्यासाठी १४ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले होते. एवढा पैसा नेमका कशावर खर्च करण्यात आला ? त्याचे उत्तरही अर्थ खाते,पालकमंत्री किंवा सांस्कृतिक खातेही द्यायला तयार नाही. मोठा समारंभ होता,राज्यभरातल्या वृत्तपत्रात पानभर जाहिराती आणि वेगळा तामझाम सरकारने केला होता त्याला खर्चही मोठा येणारच आहे मग खर्चाचा तपशील देताना जबाबदार खात्याचे हात का थरथर कापत आहेत ? जो काही हिशेब असेल तो एकदा जनतेसाठी खुला करण्याचीहिम्मत सरकारने दाखवली पाहिजे. शेवटी खर्च होणारा पैसा जनतेचा असतो त्यामुळे त्याचा हिशेबही जनतेला कळायला हवा. सरकार गतिमान असेल तर त्याला पारदर्शी हे आणखी ब्रूड लावायला सत्ताधारी का घाबरत आहेत ? सरकार या प्रकरणी काहीतरी लपवत आहे असा समज होणे धोक्याचे आहे. -पुरुषोत्तम आवारे पाटीलसंवाद -9892162248
83 Total Likes and Views