सावरकरांशी पुन्हा छेडछाड व्हिडियोने तापले राजकारण

Editorial
Spread the love

काँग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि प्रदेश युवक  काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्याने  नवे वादळ उठले आहे. “सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा”, असं शिवानी म्हणतानाचा व्हिडियो प्रचंड व्हायरल होत आहे.

     शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केलं आहे. “हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाही. ते सावरकर मोर्चा काढतात. मला आणि माझ्यासह इतर भगिनी महिलांना भीती वाटत असेल. सावरकर म्हणायचे बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. ते तुम्ही तुमच्या विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे. मग माझ्यासारख्या महिला-भगिनींना सुरक्षित कसं वाटेल? अशा लोकांच्या प्रचारासाठी हे लोक मोर्चा काढतात”, असं शिवानी  बोलताना या व्हिडीओत दिसत आहेत.

        रविवारी अर्थात १६ एप्रिल रोजी नागपूरमध्ये महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा होणार आहे. सावरकरांवर काही बोलणार नाही असे खुद्द राहुल गांधी यांनी मान्य केले असताना आलेल्या  ह्या व्हिडीओने महाआघाडीमध्ये अस्वस्थता  आहे. सावरकरप्रेमी उद्धव ठाकरे ह्यावर काय बोलतात ह्याचे  आघाडीच्या नेत्यांना टेन्शन आले आहे.

                विजय वडेट्टीवार मात्र बिनधास्त आहेत.  वडेट्टीवार म्हणाले, “हा विषय फार गंभीर आहे असं मला वाटत नाही. सावरकरांनी लिहिलेलं ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातला संदर्भ ती सांगत होती. ती पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल, तर त्यावर वाद होण्याचं काही कारण नाही. पण मला माहिती नाही की ती कोणत्या संदर्भात बोलली आहे.”

          उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता, फडणवीस यावर म्हणाले की, काही लोकांना इतिहास माहिती नाही आणि वर्तमानही माहिती नाही. हे लोक विचार न करता काहीही बोलतात. अशा लोकांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. कोणीही एखादा बुद्धीपूर्ण तर्क मांडला तर माझ्यासारख्या माणसाने त्यावर उत्तर द्यायला पाहिजे. जर बिना तर्काचं  किंवा बिना बुद्धीचं  बोललं जात असेल तर त्यावर आपण काय बोलणार?

                  प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. ते उत्तम लेखक आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी या गोष्टी लिहून ठेवल्या असतील आणि त्यातीलच एका वाक्य उचलून शिवानी वडेट्टीवारांनी मांडलं असेल तर त्याला विरोध करायचं कारण नाही. परंतु, समजा सावरकरांनी लिहिलं नसेल आणि शिवानी वडेट्टीवारांनी ते मांडलं असेल तर निश्चितपणे त्यांना माफी मागायला लावू.”

 सावरकरांचे नातू सात्यकी वेगळीच  स्टोरी सांगतात. सात्यकी म्हणाले, “शिवानी वडेट्टीवार यांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचं आहे. सावरकरांनी असं कुठलंही वाक्य ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात लिहिलेलं नाही. त्यांनी ते विधान मला दाखवावं. ते  पुस्तक मी वाचलेलं आहे.” सात्यकी सावरकर  पुढे म्हणाले की, “मुद्दाम टार्गेट केलं जात आहे. एकतर यांनी अभ्यास केलेला नाही. पूर्ण वाचलेलं नाही. यांचं सल्लागार मंडळ यांना सांगतं की सावरकरांनी एके ठिकाणी असं असं लिहिलेलं आहे, तेव्हा हे स्वतः पडताळूनही पाहत नाहीत.”

      एकूणच सावरकर हा विषय संपता संपेना झालेला दिसतो.  उद्धव ठाकरे याचा काय सोक्षमोक्ष लावतात त्याकडे महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे.              

 100 Total Likes and Views

0 Comments

No Comment.