ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. एकाच कुटुंबात दोन व्यक्तींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आप्पासाहेबांच्या समाजसेवेच्या कामाला सलाम करण्यासाठी ह्या वेळी कडक उन्हातही लाखो लोक आले होते हे विशेष.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते खारघर येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रामुख्याने उपस्थित होते. अमित शाह म्हणाले, “कोणत्याही प्रसिद्धीशिवाय आणि आकांक्षाविना सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला जनसागर मी प्रथमच पाहिला आहे. ४२ अंशाच्या तापमानात सुद्धा लोकांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल मान, सन्मान आणि भक्तीभाव आहे. असा मान, सन्मान आणि भक्तीभाव केवळ त्याग, सेवा आणि समर्पणानेच मिळतो. लक्ष्मीची कृपा एका कुटुंबावर अनेक वर्षे राहते. एकाच कुटुंबात अनेक वीर एकानंतर एक जन्म घेतात. आणि वीर कुटुंब तयार होते. पण, समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यांपर्यंत राहतो, हे पहिल्यांदाच पाहिले आहे.
आप्पासाहेब ह्या वेळी बोलताना म्हणाले, “कोणत्याही प्रकारची जाहिरात नाही, गवगवा नाही. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. प्रसिद्धीमधून काहीही साध्य होत नसतं. महत्त्वाच्या गोष्टीची जाहिरात करायची गरज काय? पण जाहिरात करणाऱ्यांसंदर्भात माझा राग नाही. मानवता धर्म श्रेष्ठ आहे. तो प्रत्येकाच्या मनात रुजू व्हायला हवा. त्यासाठीच आमचा हा खटाटोप आहे. नानासाहेबांनी ८७ वर्षांपर्यंत काम केलं आहे. आता जिवात जीव असेपर्यंत, श्वास चालेपर्यंत हे काम मी चालू ठेवणार आहे. माझ्यानंतर उत्तराधिकारी म्हणून सचिनदा धर्माधिकारी तुम्हाला परिचित आहेत. तोही हे कार्य अखंडपणे करणार आहे. कार्य चालू राहातं. कार्य श्रेष्ठ आहे. कार्य उत्तम असेल, तर देहाला सन्मान मिळत असतो.”
यावेळी फडणवीसांनी बोलताना धर्माधिकारी नावाचा इतिहास आपल्या वाचनात आल्याचं सांगितलं. फडणवीस म्हणाले, “आप्पास्वारी, माझ्या एक गोष्ट वाचण्यात आली की मुळात आपल्या घराण्याचा इतिहास साडेचारशे वर्षांचा आहे. आपल्या आठ पिढ्यांपूर्वी गोविंद चिंतामण शांडिल्य हे महाराजांच्या काळात धर्मजागृतीचं काम करत होते. त्या कामाचं स्वरूप पाहिल्यानंतर महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी सांगितलं की, आपण केवळ शांडिल्य नाही आहात तर आपण धर्माधिकारी आहात. तेव्हापासून महाराजांच्या प्रेरणेनं हे ‘धर्माधिकारी’ नामाबिरूद लागलं. तिथपासून पिढ्यान् पिढ्या हे धर्मजागरणाचं कार्य आपल्या माध्यमातून होतंय”, असं फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी, ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या कुटुंबांचं मोठं योगदान आहे. उद्ध्वस्त होणारी लाखो कुटुंब, भरकटणाऱ्या कुटुंबांना दिशा देण्याचं काम आप्पासाहेबांनी, नानासाहेबांनी केलं. आता सचिनदादा त्यांचं कार्य पुढे नेत आहेत. या लाखो कुटुंबामध्ये माझंही एक कुटुंब होतं. माझ्या कुटुंबावर जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला, तेव्हा मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी आधार दिला. तर, आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला या समाजाची सेवा करण्यासाठी मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली. म्हणूनच मी आज तुमच्यासमोर एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर श्री सदस्य म्हणून उभा आहे.”
391 Total Likes and Views