बाळासाहेब…

Analysis
Spread the love

२३ मार्च २०२३ हा दिवस बाळासाहेब देसाई यांचा ४० वा स्मृतिदिन आहे. बाळासाहेब गेले त्याला  बघता-बघता ४० वर्षे झाली. काळ कोणाकरिता थांबत नाही. पण महाराष्ट्राच्या बांधणीमध्ये गेल्या ५०-६० वर्षांत जी मोठी माणसं होती… ज्यांनी महाराष्ट्राच्या बांधणीमध्ये खूप काही दिले…. त्यात बाळासाहेब हे नाव मोठे होते. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून याची सुरुवात झाली. त्यामध्ये वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, शंकरराव चव्हाण, राजारामबापू, यशवंतराव मोहिते, विदर्भातील बॅ. वानखेडे, मधुकरराव चौधरी, प्रतिभाताई पाटील सगळी टीम अशी काही भारी होती…. भारदेसाहेब… पागेसाहेब…  जयंतराव टिळकसाहेब… गवईसाहेब… असे अनेक वर्ष प्रभावी काम केलेले अध्यक्ष आणि सभापतीही आता होणे नाही. असे मंत्रिमंडळ पुन्हा होणे नाही…  तसे निर्णय पुन्हा होणे नाही…. तशी बांधणी आता होणार नाही…  याचा अर्थ विकास थांबेल असे नाही… विकास कदाचित अधिक झपाट्याने होईल… मुंबई- पुण्याप्रमाणे गावागावात विमानसुद्दा येईल… पण, राजकारणातले ‘इमान’ राहिलेले नाही. हाच मोठा फरक झाला आहे. 
बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मरळी येथे त्यांच्या गावी जात आहे. बाळासाहेबांचे नातू शंभुराज यांनी अगत्याने आमंत्रित केले आहे. गेल्या ५०-६० वर्षांचा सगळा काळ अशावेळी डोळ्यांसमोरून जातो. देशामध्ये महाराष्ट्राचे मोठेपण का मानले गेले, त्या प्रश्नांच्या उत्तराचे, ही सगळी मोठी माणसं प्रतिनिधी आहेत. त्यांच्यात वाद झाले नाहीत, असे नाही. मतभेद हे जिवंतपणाचे लक्षण आहे… पण, त्या वादाला कुठे थांबवायचे… हे या नेत्यांना माहिती होते…. यशवंतराव  आणि वसंतदादादा यांचेही वाद झाले…. दादांचे आणि राजारामबापू यांचेही वाद झाले…. वसंतराव नाईक आणि बाळासाहेब देसाई यांच्यातही थोडेसे अंतर आले होते.  पण हे वाद महाराष्ट्राच्या बांधणीच्या आड कधीच आले नाहीत. शिवाय ही माणसं एवढी मोठी होती की, यांच्या वादाची चर्चा आपल्यासारख्या छोट्या माणसांनी करणे हे चुकीचे आहे. आकाशातील ताऱ्यांचीही भांडणे आहेत, असे मी समजतो. त्यांनी उभे केलेले काम महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राची अशी बांधणी पुन्हा होणार नाही. अगदी मुंबई राज्यापासून एक- एक िनर्णय बघितला तर… या मंडळींचे मोठेपण आता तर प्रकर्षाने जाणवते… कारण शरद पवारसाहेब सोडले तर त्यांच्या तोडीचा जवळपास तसा एकही नेता आज नाही. निर्णय घेण्याची ती क्षमताही नाही… बांधणी हा विषय दूरच राहिला.
बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज हे सगळे आठवत आहे. मी गेली ६३ वर्षे राज्यशास्त्राचाच विद्यार्थी आहे. विधानमंडळाचे ग्रंथालय हेच माझे महाविद्यालय आहे… या ग्रंथालयात खूप काही शिकायला मिळते… वाचायला मिळते… १९३५  च्या कायद्याच्या आधारे ब्रिटीश सरकारने १७५ सदस्यांची विधानसभा स्थापन केली. आणि विधानसभेची पहिली निवडणूक झाली. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने ८८ जागा जिंकल्या. मुंबई प्रांताचे पहिले मंत्रिमंडळ १९ जुलै १९३७ ला स्थापन झाले. बाळासाहेब खेर हे पहिले मुख्यमंत्री. या पहिल्या विधानसभेचे चित्रिकरण व्ही शांताराम बापंूंच्या प्रभात फिल्म कंपनीने केले. आणि त्यानंतर ‘काँग्रेस पार्टी का अधिकार स्वीकार’ या नावाचा चित्रपट पुण्यात दाखवला गेला. १९५२ साली लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळणकर होते. मुंबई राज्याच्या पहिल्या विधानसभेचे अध्यक्षही दादासाहेबच होेते आणि ते बिनविरोध निवडले गेले होते. विधानसभेच्या पहिल्या दिवशी कामकाजाची सुरुवात देश परतंत्र असताना ‘वंदेमातरम’ या गीताने झाली. तोच दाखला देवून ३० वर्षांपूर्वी आमदार राम नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात पहिल्या दिवशी ‘वंदेमातरम’ आणि शेवटच्या दिवशी ‘राष्ट्रगीत’ हा प्रस्ताव आणला होता आणि तो मंजूरही झाला. आजची आपली जी घटना आहे ती घटना समिती स्थापन करण्याचा पहिला ठराव मुंबई राज्य विधानसभेने केला होता. त्यावेळच्या मंत्र्यांचा पगार महिन्याला ५०० रुपये इतका होता. त्यांना सरकारी बंगला नव्हता. घरभाडे १०० रुपये होते. विधानसभा आमदारांना विविध समित्यांच्या बैठकीचा भत्ता तीन रुपये होता.
महाराष्ट्राची बांधणी ज्याला म्हणता येईल, असा पहिला पुरोगामी कायदा…. म्हणजे द्विभार्या प्रतिबंधक कायदा…. याच मुंबई विधानसभेत मंजूर झाला. लिलावती मुन्शी यांनीच तो प्रस्ताव मांडला होता. औद्योगिक संबंध कायदा (Industrial Relations Act) याच विधानसभेत मंजूर झाला. काॅम्रेड डांगे यांचे सात तासांचे भाषण याच विधेयकावर झाले होते. ‘हरिजनांना मंदिर प्रवेश मिळालाच पाहिजे’ यासाठी साने गुरुजी यांनी पंढरपूरला बेमुदत उपोषण केले होते. तो कायदा याच विधानसभेने मंजूर केला. पुढे घटनेमध्ये बाबासाहेबांनी कायद्यानेच अस्पृश्यता नष्ट करून टाकली. पण, त्याचा पहिला कायदा मुंबई विधानसभेत मंजूर झाला होता. 
शैक्षणिक क्रांतीत महाराष्ट्र खूप पुढे आहे. बाळासाहेब देसाई हे यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री होते. त्याच बाळासाहेबांनी १२०० रुपये उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांचे शिक्षण मोफत केले होेते. कोल्हापुरचे शिवाजी कृषी विद्यापीठ बाळासाहेब शिक्षण मंत्री असतानाच कॅबिनेटसमोर प्रस्ताव येवून हे विद्यापीठ मंजूर झाले होते. पण यालाही फार मोठी परंपरा आहे. या शैक्षणिक क्रांतीची सुरुवात मुंबई राज्यानेच केली. १९४८ साली पुणे विद्यापीठाची स्थापना करण्याचा कायदा मुंबई विधानसभेत मंजूर झाला. १९४९ साली नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई विधानसभेनेच प्रस्ताव मंजूर केला. माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ स्थापना ही मुंबई राज्यानेच केली. त्यावेळी ‘मॅट्रीक’ ही  ती परीक्षा होती. पुढे त्याचे एस. एस. सी. परीक्षा मंडळ झाले.
‘कसेल त्याची जमीन’ हा अत्यंत पुरोगामी कायदा याच विधानसभेने मंजूर केला. या कायद्यापूर्वी आणलेल्या विधेयकावर आमदार दत्ता देशमुख (संगमनेर) यांचे पाच तासांचे भाषण ३५० पानांचे आहे. खासगी गाड्यांचे राष्ट्रीयकरन करून एस. टी. महामंडळाची स्थापना याच विधानसभेने केली आणि १५ अॅागस्ट १९४८ ला पुणे- अहमदनगर ही एस. टी. धावली. त्याचे पहिले प्रवासी बाळासाहेब भारदे हे होते.
अशा या पुरोगामी कायद्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राने, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली हीच परंपरा कायम राखली. बाळासाहेब त्याच परंपरेचे प्रतिनधी. आज देशामध्ये ७ कायदे असे आहेत जे महाराष्ट्र विधानसभेने प्रथम मंजूर केले. ‘डोक्यावरून मैला वाहून न्यायला बंदी’ करणारे हे पहिले राज्य. माणसांची घाण माणसांनी वाहून न्यायची नाही. हे ठामपणे सांगणारे यशवंतराव… त्यासाठी पर्यायी व्यवस्था करताना पहिल्या वर्षी ३८ कोटी रुपयांची तरतूद करणारे हे राज्य. त्यावेळचे हे ३८ कोटी…. एम. आय. डी. सी. ची स्थापना हा याच राज्याचा पहिला निर्णय. आज मुंबईपेक्षा अधिक रोजगार राज्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये आहेत. त्याचे श्रेय या पुरोगामी िनर्णयालाच आहे. त्यानंतर वसंतराव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली रोजगार हमी कायदा, एकाधिकार कापूस खरेदी,  भाड्याच्या घरांची निर्मिती एक नव्हे असे अनेक लोकहिताचे कायदे करणारा महाराष्ट्र….
आज हाच महाराष्ट्र असा डोळ्यांसमोर येतो… यशवंतराव, वसंतराव नाईक, बाळासाहेब सगळे असे डोळयासमोर येत आहेत… या सगळ्या मंडळींमध्ये काही अपवाद सोडले तर यशवंतराव, दादा, बाळासाहेब सगळ्यांचे लहानपण कठीण परिस्थितीत गेले… दारिद्र्यात गेले… पण, कोणाच्या मातेने, कोणाच्या मावशीने, कोणाच्या काका-मामाने संस्कार करून या नेत्यांना घडवले. आज या नेत्यांची नाव सगळ्यांना माहिती आहेत… पण त्यांना घडवणाऱ्या त्या माऊली आणि ते काका-मामा काळाच्या विस्मृतीत गेले आहेत… मग त्या यशवंतरावांच्या विठामाई असतील… दादांची मावशी असेल… बाळासाहेबांचे मामा असतील… किती कष्टात या माणसांनी दिवस काढलेत…. बाळासाहेब दहा वर्षांचे असताना कोल्हापुरात आले… शाहू महाराजांच्या बोर्डींगमध्ये प्रवेश मिळाला. सकाळी एका दवाखान्याची साफसफाई करून महिना  दहा रुपये मिळवले… त्यातून बी.ए.एल.एल.बी शिक्षण पूर्ण केले.  १९४१ साली ते सातारा लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले आणि रयत शिक्षण संस्थेला पाच हजार रुपयांचे अनुदान जाहीर करून टाकले. ब्रिटीश सरकारने त्याची चौकशी केली. पण,  कर्मवीर भाऊराव आण्णांचे काम इतके उच्च दर्जाचे होते की, अशी संस्था मोठी झाली पाहिजे, या निर्णयावरच सरकार आले. खरोखरच या महाराष्ट्राची काय कमाल आहे…. कर्मवीर अण्णांसारखा माणूस कोणत्याही पदावर नाही… पण, ग्रामीण भागातील मुले शिकली पाहिजेत, यासाठी रुपया-दोन रुपये वर्गणी जमा करून या महान शिक्षणशास्त्रींनी ‘रयत’ उभी केली. आज या संस्थेत सहा लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १५०० प्राध्यापक आहेत… त्या संस्थेला पहिले  त्या काळातील पाच हजारांचे अनुदान बाळासाहेब देसाई यांनी दिले. आज त्याच संस्थेला रामशेठ ठाकूर यांच्यासारखे पाच-पाच, दहा-दहा कोटी रुपये देणगी देवून संस्था प्रचंड मोठी झाली आहे. कर्मवीर आण्णांना स्वर्गात केवढे समाधान असेल… यशवंतराव चव्हाण जेव्हा रयत शिक्षण संस्थेचे आण्णांच्या नंतर  अध्यक्ष झाले तेव्हा ते म्हणाले होते की…. ‘मी, मुख्यमंत्री झालो त्या दिवशी मला जेवढा आनंद झाला नाही…. त्याच्यापेक्षा जास्त आनंद रयतचा अध्यक्ष झाल्यावर झाला आहे…’
बाळासाहेबांनी १९४१ साली सातारा जिल्ह्यात ३०० शाळा सुरू केल्या. पण, जेव्हा ते शिक्षण मंत्री झाले, हातात अधिकार आला आणि शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचा विषय आला तेव्हा बाळासाहेब म्हणाले की, ‘हे विद्यापीठ शाहूमहाराजांच्या नगरीतच झाले पाहिजे’ आणि तसे ते झालेही.
या सगळ्या माणसांचे मोठेपण म्हणजे एकेकाच्या कतृत्त्वासाठी स्वतंत्र प्रबंधाचे विषय आहेत. १९६० ते १९८० या काळात या महाराष्ट्रात ३१ मोठी धरणे उभी राहिली. ७०० मध्यम धरणे उभी राहिली. १५००० मॅगावॅट औष्णिक वीजनिर्मिती झाली. चार कृषी विद्यापीठे झाली. अन्यधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला. ते दिवस आठवा….. जेव्हा रेशनसाठी रांगा लावाव्या लागत होत्या. अन्न-धान्याच्या निर्मितीत  महाराष्ट्र आघाडीवर आहे…  एका दिवसात हे घडलेले नाही. शैक्षणिक क्रांती…. तंत्रशिक्षण क्रांती… शेतीमधील क्रांती… या सगळ्यांसाठी योग्य निर्णय करणारे नेते आणि कष्ट करणारी जनता… शासन आणि प्रशासन हातात हात घालून किती प्रभावीपणे काम करू शकते… असा हा अितशय प्रभावी कालखंड होता. लोकशाहीच्या सगळ्या चांगल्या परंपरा याची सुरुवातही महाराष्ट्रानेच केली. ‘विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा’ याची सुरुवात महाराष्ट्रानेच केली. त्यावेळचा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी, महाराष्ट्राच्या बांधणीसाठी हातात हात घालून काम करत होते. रोजगार हमीसाठी कर लावायला पहिला प्रस्ताव विरोधी पक्षानेच आणला होता. ते वातावरण आता पुन्हा कधीच पहायला मिळणार नाही.
बाळासाहेब विधानसभेत सांगायचे…. ‘लोकशाहीमध्ये चांगला विरोधी पक्ष असणे आमची ही जबाबदारी आहे… विरोधी पक्षनेत्याला पहिल्याप्रथम एस. टी. महामंडळाचा संचालक  बाळासाहेबांनीच केले. बाळासाहेबांनी केलेल्या कामाची यादी फार मोठी आहे. कोयना धरणाचा पहिला निर्णय मुंबई राज्यात झाला. यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्याला गती दिली आिण बाळासाहेबांकडे बांधकाम खाते आल्यावर अवघ्या चार वर्षांत हे धरण पूर्ण झाले. मुंबई-गोवा हा रस्ता बांधकाम खात्यामार्फत काँक्रीटचा करण्याचे काम बाळासाहेबांनीच केले. गृहखात्यामधील अनेक निर्णय पोलिसांच्या हितासाठी झाले. वरळीच्या पोलीस वसाहती हा बाळासाहेबांचाच निर्णय…. सलग ४० वर्षे ते आमदार होते. त्यावेळचे नेते यांचे पाय जमिनीवर होते. यशवंतराव चव्हाण निवडणुकीत कधीही पराभूत झाले नाहीत. १९५२, १९५७, १९६२ विधानसभा नंतर नाशिकहून बिनविरोध लोकसभा नंतरच्या लोकसभेच्या तीन टर्म कराडमधून १९८० पर्यंत… वसंतदादा १९५२ साली आमदार झाले.. पण मंत्री झाले ते १९७२ साली. विधानसभा असो… लोकसभा असो… दादा कधीही पराभूत झाले नाहीत. बाळासाहेब त्याच्याही पुढे… सलग सहावेळा विधानसभेत आमदार… आणि एकाच मतदारसंघातून म्हणजे पाटण. १९६७ साली बिनविरोध निवडून आलेले एकमेव आमदार. दरारा असलेलेही एकमेव मंत्री… पण, मनाने अितशय हळवे आणि प्रेमळ.
या सर्व नेत्यांसोबत वावरता आले… त्यांना भेटता येत होते… बोलता येत होते… त्यांच्यासोबत प्रवास करायला मिळत होता… खूप काही शिकायला मिळत होते… साहित्य…. पत्रकारिता…  कला… नाटक… िचत्रपट…. सगळ्या क्षेत्रातील ही मोठी माणसं हे महाराष्ट्राचे वैभव आहे.
बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमत्ताने एखाद्या चित्रपटासारखे अनेक प्रसंग डोळ्योसमोरून जात आहेत… संग्रहातील एक फोटो पाहिला… माणसं मनाने किती मोठी होती…. त्याचे उदाहरण सांगून थांबतो… बाळासाहेबांनी जेव्हा सातारा लोकल बोर्डातर्फे रयत शिक्षण संस्थेला ५००० रुपयांचे अनुदान जाहीर केले त्यावेळी कर्मवीर आण्णा बाळासाहेबांना लोकल बोर्डाच्या कार्यालयात भेटायला गेले. आण्णांनी सोबत हार नेला होता… बाळासाहेबांना ते हार घालू लागले… बाळासाहेबांनी हार घालू दिला नाही… हातातच ठेवला… म्हणाले, ‘आण्णा, आम्ही सत्तेवर आहोत…. आमचे कर्तव्य आम्हाला केलेच पाहिजे… सत्तेवर नसताना तुम्ही जी वणवण करून शिक्षणाचे काम करीत आहात…. खरे तर मीच तुम्हाला हार घातला पाहिजे….’
महाराष्ट्रातल्या त्या पिढीतील सगळी माणसं अशी मनानं मोठी होती… अनेकजण या नेत्यांचे वाद सांगतात… पण, यांचे मोठे मन कोणी सांगत नाही. यशवंतरावांनी दादांशी झालेला वाद मिटवून सांगलीच्या जाहीर सभेत दादांचे मोठेपण खुल्या मनाने सांगितले. राजारामबापू आणि दादांचा वाद झाला… पण, बापूंच्या अॅसिटोन प्रकल्पाचे उद्घाटन करायला दादा आले आणि म्हणाले की, ‘भांडण विसरा… विकास कामात दादा-बापू एक आहेत…’ बाळासाहेब देसाईंच्या एकसष्ठी समारंभाचा सत्कार करायला त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण स्वत: आले. ही तर एकाच पक्षातील मंडळी. पण, शे. का. पक्षाचे नेते उद्धवराव पाटील… यांचा औरंगाबादचा सत्कार करताना यशवंतरावांनीच पुढाकार घेतला. एस. एम. जोशी यांचा सत्कारही यशवंतरावांच्या हस्ते झाला.
महाराष्ट्राचे मोठेपण केवळ विकासाची मोठी कामं उभी करण्यातच नाहीत… तर, परस्पर आदर आणि मोठ्या मनाने सर्वांना वागवण्यामध्ये आहे. म्हणून तर या राज्याचे नाव…. महा… राष्ट्र…. आहे. या नावातच सगळी शक्ती आहे.

– मधुकर भावे

 588 Total Likes and Views

0 Comments

No Comment.