तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती या पक्षाचे संस्थापक के. चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. मराठवाड्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांची पहिली मोठी सभा नांदेडला झाल्यावर परवा संभाजी नगरला झालेल्या दुसऱ्या सभेला सुद्धा दखल घ्यावी असा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. किमान दीडलाख लोक या सभेला उपस्थित होते असा पोलिसांचा आकडा आहे. भाजप सरकार असताना पोलीस जर एवढा आकडा सांगत असतील तर तो नक्कीच दाखवला त्यापेक्षा जास्त असला पाहिजे असा अंदाज बांधायला हरकत नाही. केसीआर यांनी फार लवकर महाराष्ट्र टार्गेट करून बरेच मासे गळाला लावले आहेत. माजी खासदार हरिभाऊ राठोड,राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे,माजी आमदार माने ,ज्ञानेश वाकुडकर,मराठा नेते प्रदीप सोळुंखे ,माजी आमदार हर्षवर्धन जाधव असे असंख्य मोहरे त्यांना मिळाले आहेत. विदर्भ,मराठवाड्यातील शेतकरी संघटना तर अर्ध्यापेक्षा जास्त केसीआर यांच्या कडे आकर्षित झाल्याचे दिसत आहे.
तेलंगणाच्या केसीआर यांच्या जाहीर सभांना महाराष्ट्रात प्रतिसाद मिळतो याचा अर्थ आपल्याकडील राजकीय पक्षांनी जनतेचा हिरमोड केला आहे. एवढे पक्ष आणि नेते इथे असताना लोकांना तेलंगणातील नेत्याचे आणि त्या सरकारने तिथे केलेल्या कामाचे कौतुक वाटत असेल तर या घडामोडी प्रमुख पक्षांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात हे लक्षात घ्यायला हवे. संभाजी नगरच्या सभेत केसीआर यांनी या राज्यातील आगामी सर्व निवडणूक लढण्याचे घोषित केले आहे. असे झाले तर प्रामुख्याने मराठवाड्यात मोठा फरक पडू शकतो. काळात जिल्हा परिषद आणि नगर पालिकेत भारत राष्ट्र समितीचे सदस्य विराजमान होऊ शकतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . केसीआर तेलंगणाचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री आहेत याचा अर्थ निवडणुका कश्या जिंकल्या जातात याचे गणित त्यांना कळले आहे. त्यांनी आपल्या राज्यात शेतकरी आणि दलित योजनांवर ज्या पद्धतीने काम करून अनेक राज्यांचे लक्ष वेधून घेतले आहे त्याचा अभ्यास इतर पक्षांनी करण्याची गरज आहे.
केसीआर राजकीय अभ्यासक आहेत . लोकांची नाडी ओळखण्याचे कसब त्यांना जमले आहे. त्यासाठी त्यांनी तेलंगणा राष्ट्र समिती हे प्रदेशवाचक नाव हटवून पक्षाला व्यापक स्वरूप देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी भारत राष्ट्र समिती असे आपल्या पक्षाचे नामांतर करून घेतले आहे. केंद सरकार आणि प्रामुख्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत भाजप विरोधात सर्वानी एकत्र येऊन लढा देण्याच्या बाजूने त्यांनी कामही आहे. महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी ” अब की बार ,किसान सरकार ” ही आकर्षक टॅग लाईन वापरून मराठी शेतकऱ्यांच्या दुखत्या नशीवर बोट ठेवले आहे. महाराष्ट्रात आजवर शेतकऱ्यांच्या नावाने जयघोष करीत त्यांचे शोषण कसे झाले याची अतिशय अभ्यासपूर्व मांडणी केसीआर इथे येऊन करतात तेव्हा शेतकरी आणि सामान्य मतदारांना ते थोडेफार पटायला लागले आहे. निवडणूक लढायला लागणारा सगळा दारुगोळा सध्या त्यांच्या भात्यात आहे.
गेल्या काही महिन्यात केसीआर यांच्या सरकारने तेलंगण राज्यात दलित,आदिवासी,शेतकरी,महिला बचत गट,विद्यार्थी आणि नव्या उद्योजकांसाठी काय काय केले याची माहिती देणाऱ्या पानभर जाहिराती मराठी वृत्तपत्रात देऊन वातावरण निर्मिती करून लक्ष केंद्रित करून घेतले आहे. हा त्यांच्या नियोजनाचा उत्तम भाग म्हणावा लागेल. अनेक माजी आमदार,माजी नगरसेवक आणि असंख्य नेते अचानक इथले पक्ष सोडून या नव्या पक्षात कसे काय जात आहेत याचे नवल वाटणे स्वाभाविक आहे ,कदाचित तेलंगणातील सत्तेचा थोडाफार लाभ काही नेत्यांना मिळाला असेल मात्र सगळ्यांना पैसे देऊन दखलपात्र गर्दी करणे शक्य नसते. केसीआर यांनी गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आणि युवक नेत्यांना हैद्राबादला निमंत्रित करून सरकारचे प्रत्यक्ष काम बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याचाही मोठा परिणाम सध्या दिसत आहे.
या सगळ्याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रात लोकांच्या प्रश्नावर बोलायला कोणताही पक्ष तयार नाही. प्रत्येकाला आपल्याच पानावर आहार ओढून घ्यायचा आहे. त्यात शेतकरी सर्वाधिक भरडला जात आहे. तेलंगणात ,छोट्याश्या राज्यात जर काही मूलभूत गोष्टी के. चंद्रशेखर राव सारखा माणूस करू शकतो तर एवढ्या विशाल महाराष्ट्रात ते का हाऊ शकत नाही याचा विचार अनेक नेते करायला लागले आहेत. शिवाय बाहेरचा नेता स्वीकारला तर त्याची घराणेशाही लादून घ्यावी लागणार नाही ,इथे आपणच आपले राजे होणार आहोत असाही विचार अनेकनेते करीत केसीआर यांच्याशी हातमिळवणी करताना दिसत आहेत. सध्या रिपब्लिकन गटात असलेली ताटातूट बघता हा मतदार सर्वात आधी जवळ केला जाऊ शकतो याचाही विचार करून केसीआर यांनी आखणी सुरु केल्याचे दिसते. बाबासाहेबांचा विशाल पुतळा उभारणे,त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर याना निमंत्रित करणे हा त्या रणनीतीचा भाग होता .
-पुरुषोत्तम आवारे पाटील
29 Total Likes and Views