राष्ट्रवादीची भाजपसोबत चर्चा सुरू; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

Analysis
Spread the love

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी आता कुठल्या निर्णयाकडे जाणार? हा महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज अचानक आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याला काही नेते आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. तर अजित पवार यांनी शरद पवारांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. आजच्या या घडामोडीमुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडालेली असताना आता महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. खरेतर चव्हाण यांनी कालच याबाबतच सूचक विधान केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत किती दिवस राहील हे सांगता येत नाही. कर्नाटकातही राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत, असे मोठे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकातील कालच्या भाषणात केले.

काँग्रेसच्या मतांची विभागणी करता येईल का? भाजपला विजय मिळणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. कुणाकुणाची तिकीटे कापली, काय काय सुरू आहे. इथे मी ऐकलं की महाराष्ट्रातील आमच्याबरोबरची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही त्यांच्यासोबत आहे. काय झाले? ते अजून आमच्यासोबत आहेत. पण किती दिवस असतील ते माहिती नाही. कारण त्यांची भाजपसोबत चर्चा सुरू आहे. त्यांच्याबाबत रोज बातम्या येत आहेत की कोण जाणार आणि कोण थांबणार. कोणी काय निर्णय घ्यावा तो त्यांचा अधिकार आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा रद्द झालेला आहे. त्यांना इतर राज्यात मतं मिळाली नाहीत. निवडणूक आयोगाने त्यांचा राष्ट्रीय दर्जा काढून टाकला आहे. त्यामुळे इतर राज्यात जावून मतांची टक्केवारी वाढली तर पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवला जाऊ शकतो. भाजपची टक्केवारी वेगळी आहे आणि राष्ट्रवादीची टक्केवारी वेगळी आहे. त्याला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

 1,074 Total Likes and Views

0 Comments

No Comment.