२६ मे २०२३ हा दिवस विलासराव देशमुख यांचा जन्मदिवस….

Analysis
Spread the love

विलासरावांसाठी ‘जयंती’ किंवा १४ अॅागस्टला ‘पुण्यतिथी’ हे शब्द उच्चारायलाही जीभ जड होते. ते नाहीत, हे सर्वांना माहीती आहे. त्यामुळे त्यांची ‘जयंती’ किंवा ‘पुण्यतिथी’ या दिवशी तर त्यांच्या आठवणीने महाराष्ट्र व्याकूळ होतोच… पण, ते अकाली गेल्याची रुखरूक त्यांच्या जन्मदिनीसुद्धा मनात टोचत राहते. विलासराव असतील… आर. आर. आबा असतील… पतंगराव असतील… गोपीनाथ मुंडे असतील… तिकडे राजेश पायलट असतील किंवा माधवराव िशंदे असतील… जी माणसं या देशाला अनेक वर्षे हवी होती तीच नेमकी परमेश्वरांने उचलून नेली… विलासराव असे व्यक्तीमत्त्व… महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय जीवनात असा चेहरा.. असे हास्य… तणाव न घेता काम करणारा असा मुख्यमंत्री… सगळंच काही अशक्य कोटीतील वाटते. राजकारणी माणसं प्रत्येक घरात चर्चेचा विषय असतातच असा नाही. घरातील टी. व्ही. चॅनलवर त्यांचे चेहरे पाहिल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला तो चेहरा पहावासा वाटतोच असे किती नेते असतील…? पण हे ठामपणे सांगता येईल की, असा घराघरात हवाहवासा वाटणारा आणि आनंद देणारा चेहरा विलासरावांचा होता. विलासराव आज असते तर… ७८ वर्षांचे असते… २ वर्षांनी त्यांचा ‘सहस्त्रचंद्र दर्शन’ सोहळा लातूरमध्ये किती प्रचंड जल्लोषात साजरा झाला असता…. याची कल्पना इथे बसूनही करता येते…. जग निर्माण होवून किती वर्ष झाली…. कोणी मोजली ? पण, प्रत्येक दिवसाची सकाळी कधी पारोशी वाटत नाही… ती प्रसन्नच वाटते… विलासरावांचा चेहरा, विलासरावांचे वागणे, विलासरावांचे भेटणे, विलासरावांचे भाषण आणि त्यांचे टाळी देणेसुद्धा… असे काही प्रसन्न असायचे की, महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणात तर हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढीही अशी प्रसन्न, दिलखुलास व्यक्तीमत्त्वे नाहीत.
राजकारणाच्या धबडग्यात विलासराव होते… पाठीशी पूर्ण बहुमत नसताना सरकार चालवणारे विलासराव होते. पूर्वीच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या मागे विधानसभेत प्रचंड बहुमत होते. १९६७ साली २०२ आणि १९७२ साली २२२ एवढ्या बहसंख्येने सरकार चालवणारा मुख्यमंत्री काहीसा निवांत असेल… पण, विलासरावांना जी तारेवरची कसरत करावी लागली ती विलक्षण होती. बहुमत नसताना सरकार चालवायचे… १९९५ ते १९९९ या काळातील सेना-भाजपा युती सरकारकडून विलासरावांच्या हातात सरकार आले त्या सरकारने ७ हजार ९७२ कोटी रुपयांची तूट करून ठेवली होती. पाठीशी बहुमत नाही… अनेक आव्हाने समोर होती..  १ नोव्हेंबर १९९९ रोजी मुख्यमंत्रीपद स्वीकारलेले… १५ दिवसांत दिवाळी सण…. राज्य कर्मचाऱ्यांची बोनसची मागणी. अशा स्थितीत विलासरावांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेवून सांगून टाकले की, ‘बोनस देणे शक्य नाही… ज्या दिवशी शक्य होईल…. त्या दिवशी तुम्हाला बोलावून मी बोनस देईन… पगार वाटण्यासाठी मी आज इथे बसलेलो नाही… ’ विलासरावांच्या मनाचा  नितळपणा कर्मचारी- नेत्यांनाही जाणवला.. त्या सर्व काळात विलासरावांनी चालवलेले सरकार… विश्वास प्रस्ताव मंजूर करून दाखवताना पणाला लागलेले त्यांचे कौशल्य…. अशा अनेक विषयांत मनावर कसलाही ताण-तणाव न ठेवता…. विलासराव तुम्ही वावरताना पाहात होतो.
१९९५ च्या निवडणुकीत तुम्हाला घेरून पराभूत करण्यात आले. त्या पराभवानंतरही तुम्ही खचला नाहीत… १९९९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक मतांच्या फरकाने तुम्ही विजयी झालात… मुख्यमंत्री झालात…. तेव्हा हुरळूनही गेला नाहीत… खचून जाणे किंवा हुरळून जाणे… या दोन्ही मनुष्य स्वभावापेक्षा तोल आणि समतोल पक्षात आणि राजकारणात तुम्ही उत्तम सांभाळलात….  खरं म्हणजे त्यावेळच्या प्रदेशाध्यक्षा प्रभाताई राव आणि निरिक्षक मार्गरेट आल्वा यांचा तुम्हाला राजकीय पाठींबा नसतानाही तुम्ही सगळं निभावून नेलंत…
१९८० साली तुम्ही विधानसभेत आलात… पहिल्याच आमदारकीच्या काळात तुम्हाला मंत्रीपद मिळेल, असे वाटले होते… पण बॅ. अंतुलेसाहेबांनी तुम्हाला संधी दिली नाही. तुम्ही नाराज झाला नाहीत… उलट राज्याच्या मुख्यमंत्र्याला लातूरला बोलावून ७ अॅाक्टोबर १९८१ ला त्यांचा प्रचंड सत्कार केलात… मंत्रीपद मागितले नाहीत…. मागितले काय…. ‘अंतुलेसाहेब, आम्हाला लातुर जिल्हा द्या….’
बॅ. अंतुले यांनी एका क्षणात जाहीर करून टाकले, ‘दिला…’ त्याच अंतुलेसाहेबांनी जालना स्वतंत्र जिल्हा केला… सिंधुदुर्ग जिल्हा जाहीर केला… पण, एकाचवेळी जाहीर झालेल्या या जिल्ह्यात तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने लातूर जिल्हा कुठे घेवून गेलात… सत्ता कोणाकरिता राबवायची, याचे भान तुम्हाला पूर्णपणे होते… त्यामुळेच आमदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, या सगळ्या प्रवासात तुमच्या व्यक्तीमत्त्वाची… तुमच्या प्रसन्नपणाची आणि तुमच्या माणुसकीची पाऊले ठळकपणे उमटली… २००७ साली लातूर जिल्हा निर्मितीला २५ वर्ष पूर्ण झाली… विलासरावांनी सात दिवसांचा लातूर जिल्हा महोत्सव केला… उद्घाटनाला त्यांनी आमंत्रित केले…. बॅरिस्टर अंतुले यांना…. बॅ. अंतुले तेव्हा कोणत्याही पदावर नव्हते…  विलासराव, आपण त्यांना आमंत्रित करायला गेलो…. त्यांना लातूरला आणण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिलीत… केवढा मोठा कार्यक्रम झाला… अंतुलेसाहेब भाषणाला उभे राहिले… ‘विलासराव, मी मुख्यमंत्री झालो तेव्हा तुम्हाला मंत्रिमंडळात घेतले नव्हते…. तुम्ही ते लक्षात ठेवले नाही… लातुर जिल्हा मी तुम्हाला दिला… हे लक्षात ठेवून २५ वर्षांनंतर तुम्ही आज मला सन्मानाने आमंत्रित केलेत… तुम्ही आज मुख्यमंत्री आहात…. पण, राजकारणात २५ दिवस कोणी लक्षात ठेवत नाही…. मी मुख्यमंत्री असताना जिल्हा दिला… ही छोटी गोष्ट होती… तुम्ही २५ वर्षांनी माझी आठवण ठेवलीत…. ही फार मोठी गोष्ट आहे…. तुमचं मन…’ आणि  पुढचं काही बोलायच्या आगोदर… अंतुलेसाहेबांना अश्रू आवरले नाहीत… व्यासपीठावर तुम्ही… दिलीपराव..  वहिनीसाहेब… आपण सगळेच होतो… सगळ्यांचे डोळे भरून आले… अंतुले साहेबांच्या मोठेपणाइतकाच तुमच्या मनाच्या दिलदारीचेहे त्यात नकळत वर्णन होते…. तुमच्या मनाची… तुमच्या मोठेपणाची… तुमच्या दिलदारीची.. अशी किती उदाहरणे  आहेत. त्यामुळे तुम्ही आज नसताना महाराष्ट्र वैराण झाल्यासारखा वाटतो आहे.
मैत्रीला तुम्ही  किती पक्के…. गोपीनाथराव मुंडे भाजपाचे…  तुम्ही त्यांचे विरोधक… पण, तुमचे आिण त्यांचे मैत्र आज महाराष्ट्राला दृष्ट  लागल्यासारखे आहे. आजचे द्वेषाचे, सूडाचे… हे राजकारण तुम्हाला पहावलेही नसते… पण, तुम्ही जर आज असतात… तर आज महाराष्ट्रावर ही वेळच आली नसती… .काँग्रेसवर ही वेळ आली नसती… सुशीलकुमार आणि तुमचे मैत्र… अनेक मंत्रिमंडळं मी पाहिली… पण, ‘दो हंसो का जोडा….’ असं म्हणता येईल, असं मैत्र एका मंत्रिमंडळात आता पुन्हा कधीच होणार नाही…
१ जानेवारी २००३ साली तुम्ही सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची सूत्र दिलीत… आणि एक वर्ष दहा महिन्यांनी सुशीलकुमारांनी  पुन्हा  तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची सूत्रं दिली… हे तुमचे मैत्र महाराष्ट्र कायमचे लक्षात ठेवतो… तेव्हा पतंगराव कदम गंमतीने म्हणाले, ‘अरे, आपसात वाटून घेता का काय ?’ विलासरावांनी गंमतीने उत्तर दिले… ‘पतंगराव, लातूरचा रस्ता सोलापूरहून जातो….’ तुमच्या वागण्या-बोलण्यात कटूता कधीच नव्हती… तुमच्या वागण्यात कधी फरक नव्हता… सत्ता मिळाल्यावर अनेकांचे चेहरे बदलतात… स्वभाव बदलतात… मोबाईल नंबर तर रोज बदलतात… आणि नवीन नंबर मिळवून कोणी फोन केला तर लगेच फोन उचचला जाईल, असे फार क्वचित घडते… पण, विलासराव ९८२११२५००० हा तुमचा मोबाईलनंबर कधीही बदलला नाही. तुम्हाला या नंबरवर ज्यांनी-ज्यांनी फोन केला, त्यांचा फोन तुम्ही उचलला नाही, असे कधीच झाले नाही. २५-२६ जुलै २००५ च्या महापुरात दिवस-रात्र तुमच्यासोबत होतो… दोन्ही रात्री आपण जागून काढल्या… आलेला प्रत्येक फोन तुम्ही घेत होतात. दहा किलो गहू…. दहा किलो तांदूळ… दहा लिटर रॉकेल…. एक हजार रुपये रोख किती वणवण  फिरून तुम्ही या वस्तुंचे वाटप होतेय, की नाही, याची पाहणी केलीत… त्यावेळचे राष्ट्रपती अब्दुल कलामसाहेब तुम्हाला दूरदर्शनवर पाहात होते…. त्यांनी थेट तुम्हाला फोन केला…. काय म्हणाले, ‘मिस्टर चीफ मिनीस्टर… आय एम वॉचिंग यू अॅान टी. व्ही. तुम्ही खूप मेहनत करत आहात…. माझ्याकडून जे काही लागेल ते सांगा….’ तुम्ही आभार मानलेत… पूर ओसरून गेल्यानंतर दिल्लीत जावून तुम्ही त्यांचे प्रत्यक्ष भेटून आभार मानलेत….
आज हे सगळे आठवते आहे… तुम्हाला मुख्यमंत्रीपद सोडावे लागले…. शांतपणे तुम्ही वर्षा बंगल्याचा निरोप घेतलात… प्रत्येकाच्या हातात हात मिळवून तुम्ही ‘वर्षा’ सोडला. राजकारणात प्रत्येक मुख्यमंत्र्याला एक दिवस असा येतच असतो, असे शब्द तुमच्या तोंडून तेव्हा बाहेर आले.
आज अनेक गोष्टी आठवतात…. तुमचे पिताश्री दादा लातुरला आजारी झाले… त्यांना हिंदुजा रुग्णालयात तुम्ही दाखल केलेत… दोन तास तिथं बसलात… दादाच तुम्हाला म्हणाले, ‘विलासराव, तुम्हाला राज्य सांभाळायचे आहे… माझी काळजी करू नका… तुमच्या कामाला तुम्ही जा… ’ त्या दिवशी रुग्णालयातून निघताना तुमचा पाय किती जड झाला  होता…. आणि तुमचे डोळे काय सांगत होते, हे सगळं टिपून ठेवले आहे…  तुमच्यातला माणूस खूप मोठा होता… तुमच्यातला प्रशासक खूप मोठा होता… तुमच्यातला राजकारणी खूप मोठा होता… तुमच्या जयंतीच्या दिवशी किंवा स्मृतिदिनाच्या दिवशी महराष्ट्रातील अनेकजण अस्वस्थ होतात. तुम्ही आता नाहीत… हे तर खरे… पण विलासराव, खरं सांगू का…. तुमच्या जयंतीदिनी आज मनात एकच गोष्ट येते…. तुम्ही आज नाहीत महाराष्ट्रातच्या राजकारणातील ‘राजहंस’च गेला… लातुरची रया गेली…. महाराष्ट्राची रया गेली… ते राजकारणही संपले… राजकारणातला दोस्तानाही संपला…. आणि भलत्याच गोष्टीला महाराष्ट्राला समोर जावे लागत आहे… सारखं वाटतंय, आज तुम्ही हवे होतात… तुमचा वाढदिवस तर जोरातच झाला असता…. पण आजचा हा महाराष्ट्र बघायची वेळच आली नसती…  

📞

9892033458

 636 Total Likes and Views

0 Comments

No Comment.