हल्लीची तरुण पिढी कमालीची सनकी झाली आहे. अभ्यास करायच्या वयात पोरांना प्रेम सुचते. ते बिचकते तेव्हा त्यांचा तोल जातो. नाही ते करून बसतात. दिल्लीत अशीच एक घटना घडली तेव्हा क्रोर्यही घाबरले असेल. २० वर्षे वयाच्या साहिल नावाच्या एका तरुणाने १६ वर्षे वयाच्या आपल्या प्रेयसीला ती रस्त्याने जात असताना अडवले आणि तिच्यावर चाकुन सपासप २० वार केले. रस्त्याने येणारे-जाणारे हे पाहत राहिले. कोणीही त्याला रोखायला पुढे आले नाही. साहिलचा चाकू तिच्या डोक्यात अडकला तेव्हा तो तिथून निघाला. पण ती मेली की नाही ह्या शंकेने त्याने तिथला दगड उचलून तिला ठेचून काढले. ह्या घटनेचा व्हिडीओ समोर आला तेव्हा दिल्ली हादरली. मुलं एवढे राक्षस कसे होऊ शकतात? आणि समाज हे सारे उघड्या डोळ्यांने कसे पाहू शकतो?
दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागातली रविवार रात्रीची ही घटना आहे. त्याने तिला संपवलं आणि पळाला. पोलिसांनी काही तासातच त्याच्या मुसक्या आवळल्या.
दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि शनिवारी त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. रविवारी ही मुलगी तिच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना वाटेत मुलाने तिला अडवून तिच्यावर हल्ला केला. शवविच्छेदनानंतरच त्याच्यावर किती वेळा वार करण्यात आले हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून शाहबाद डेअरी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करतील. पण गेलेली मुलगी थोडीच परत येणार आहे? एक घर उध्वस्त झाले. कोवळ्या वयात मुलं-मुली वाहत जातात. ते वयच तसे असते. ते भावविश्व वेगळे असते. आपली मुलगी काय करतेय, कुठे जाते, तिचे मित्र कोण? याची काळजी आई-वडिलांनी घेतली असती तर त्या मुलीला वाचवता आले असते का? समाजाने चिंता केले नाही तर अशाच कोवळ्या मुली रस्त्यावर कापल्या जातील. बघण्यापलीकडे आपण काही करू शकणार नाही.
75 Total Likes and Views