२ जून २०२३ रोजी रामशेठ ठाकूर यांचा ७२ वा वाढदिवस आहे. रामशेठ जेव्हा ‘शेठ’ झाले नव्हते तेव्हा जसे होते तसेच ‘शेठ’ या विशेष नामाने त्यांचा उल्लेख होऊ लागल्यावरही, ते आहेत तसेच अाहेत. त्यांचा स्वभाव बदललेला नाही… त्यांचा पोशाख बदलेला नाही… त्यांच्या पायातली चप्पल बदललेली नाही… आणि काही कमी नसताना, सकाळी उठल्यानंतर आपल्या अंथरूण- पांघरूणाची घडी स्वत: करण्याची सवयही बदललेली नाही.
रामशेठ आज २० टक्के राजकारणी आहेत… ८० समाजकारणी आहेत… ते खासदार होते… एकदा नव्हे दोनदा… निवडणूक कोणाविरुद्ध लढवली? एकदा दि. बा.पाटील आणि एकदा बॅ. अंतुले… दोन्ही दिग्गज. दोघांनाही पराभूत करून खासदार झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांच्याबद्दल आदर त्यावेळी कमी झाला नाही. आिण आजही तेवढाच आदर वेळोवेळी ते व्यक्त करतात. यासाठी मनाचे निर्लेपपण असावे लागते. रामशेठजवळ ते निर्लेपपण आहे. निर्मळपणा आहे. घमेंड नाही… ‘जे माझ्याजवळ आहे ते देण्यासाठी आहे… घेण्यासाठी नाही…’ या भावनेने रामशेठ माणूस म्हणून फार मोठे आहेत. ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत, हा गौण प्रश्न आहे. शे. का. पक्ष असेल… काँग्रेस असेल किंवा भाजपा असेल… या सर्व पक्षांत काम करताना रामशेठना पक्षाचा अभिनवेष कधीच नव्हता. आजही नाही. आजच्या राजकारणात जो कमालीचा कडवटपणा आलेला आहे, त्याचा लवलेषही रामशेठ यांच्याजवळ नाही. त्यामुळे रामशेठ कोणत्याही राजकीय पक्षात कोणाचे शत्रू नाहीत… आणि ते कोणाला शत्रू मानत नाहीत. शरद पवारसाहेब हे तर रयतमध्ये अध्यक्ष. आणि रामशेठ एक संचालक… तिकडे काँग्रेसमधील सुशीलकुमारही त्यांचे मित्र… राजकारण करताना समंजसपणा आणि सुसंस्कृत व्यवहार त्यांनी नेहमीच पाळला.
सार्वजनिक कामात तर स्वत:ला झोकून देणारा नेता असा नेता महाराष्ट्रात आज तरी नाही. व्यवसायाने ते फार मोठे काँन्ट्रॅक्टर आहेत… आज नव्या पिढीला खरे वाटणार नाही की, आयुष्याची सुरुवात शिक्षक म्हणून करणारा हा माणूस रयत शिक्षण संस्थेत (कमवा आणि शिका) या योजनेतून पदवीधर झाला ते साल १९७२. पुढच्या वर्षी बी. एड. पूर्ण केले… पनवेलमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘विठोबा खंडप्पा’ या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून सुरुवात केलेल्या रामशेठ यांनी आपल्या जीवनाचा सांधा १९७६ साली बदलला आणि छोट्या व्यवसायातून ते आज ‘रामशेठ’ झाले. पण, त्यांचे सगळ्यात मोठे काम त्यांनी काँन्ट्रॅक्टर म्हणून जे काही केले असेल, त्याही पेक्षा आपण शिक्षक होतो… हे न विसरता त्यांनी उभी केलेली शैक्षणिक संकुले… त्यामध्ये शिकणारे … जवळपास २० हजार पेक्षा अधिक विद्यार्थी… एकेकाळी शिक्षक असलेला एक माध्यमिक शिक्षक कसलाही गाजावाजा न करता आज २० हजार विद्यार्थ्यांचा ‘पालक’ आहे. शिक्षण संस्थांचे मोठे जाळे त्यांनी उभे केले आहे. त्यातूनच पनवेलचे सी. के. टी. कॉलेज… ज्या कॉलेजला आज महाराष्ट्रात पाचवा क्रमांक मिळालेला आहे आिण देशात २६ वा क्रमांक सी. के. टी. कॉलेजला आहे. याशिवाय गव्हाण -कोपरचे महािवद्यालय, पनवेलचे सी. के. महाविद्यालय, खांदा कॉलनीतले महाविद्यालय, आवेपेठ येथील इंग्रजी शाळा, खारघरचे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खांदा कॉलनीतले भागुबाई ठाकूर लॅा कॉलेज आणि उच्च माध्यमिक विद्यालय, द्रोणागिरी नोड येथील विद्यालय, खारघरची माध्यमिक शाळा, महाविद्यालय, उलवे येथील ‘शकुंतला रामशेठ ठाकूर महाविद्यालय’ अशा किती संस्था… शिवाय उलवे येथील क्रीडा संकुल… एक की दोन… अशा अनेक संस्था उभारताना रामशेठ यांनी शिक्षण संस्थेचा दर्जा… पावित्र्य आणि आर्थिक शिस्त सर्वकाही संभाळून आज एका अर्थाने ते ‘शेठ’ असले तरी मी त्यांना महाराष्ट्रातील एक शिक्षणशास्त्री समजतो. त्यांना हा शब्द फारसा पसंत नाही तर, शिक्षणप्रेमी म्हणू या… पण, आज रामशेठचे महाराष्ट्रभर जे नाव झाले ते शिक्षणामध्ये त्यांनी स्वत:ला झोकून देवून जे काही काम उभे करून ठेवले त्यामुळे झाले आहे. मला वाटते की, रयत शिक्षण संस्थेचे लाखो विद्यार्थी असतील… ते त्यांच्या कर्तृत्वाने मोठेही झाले असतील… आर्थिकदृष्ट्या संपन्नही असतील… पण, रामशेठ वेगळे कसे… हा एकमेव माजी विद्यार्थी आहे… ‘ज्या संस्थेत आपण शिकलो त्या संस्थेला ७ कोटी रुपये खर्च करून एक इमारत मी बांधून देतो’, असं सांगून सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संकुलात रयत शिक्षण संस्थेला जागा कमी पडत होती म्हणून रामशेठ यांनी ७ कोटींची इमारत बांधून दिली. ५० वर्षांपूर्वी फलटणचे राजे मालोजीराव नाईक-निंबाळकर यांनी साताराच्या रयत शिक्षण संस्थेसाठी फलटण संस्थानची १० एकर जागा उदार मनाने दान करून टाकली. आज तसा फलकही त्या संस्थेत लावलेला आहे. मालोजीराव हे फलटणचे राजे होते. रामशेठ कोण होते? सुरुवातीची गरिबीच होती. २०० रुपये पगारावर शिक्षक होते… २०० रुपये पगारावरील शिक्षक आपल्या शिक्षक संस्थेला ७ कोटी रुपयांची इमारत बांधून देतो, आिण हे दातृत्त्व बघून रयत शिक्षण संस्थेचे आजचे अध्यक्ष शरद पवारसाहेब इमारत पाहतात… आणि त्यांच्या तोंडून सहज शब्द बाहेर पडतात… या इमारतीचे नाव
‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’…
२०० रुपये पगारावर आयुष्याची सुरुवात करणाऱ्या शिक्षकाने ७ कोटी रुपयांची इमारत सातारा येथे आणि ५ कोटी रुपयांची इमारत आदिवासी गाव असलेल्या मोखाड्यात शिक्षण संस्थेला बांधून द्यावी… ‘गिनीज बुक’ थिटं पडून जाईल… आणि आता इथून पुढं अशा कर्तृत्त्वाला आणि दातृत्वाला ‘रामशेठ ठाकूर बुकात नाव आहे का’ अशी तुलना होईल… एवढं मोठं हे काम आहे.
साताराच्या इमारतीचे लोकार्पण झाले तेव्हा त्या कार्यक्रमाला होतो. शरद पवारसाहेबांनी रामशेठ यांच्या दार्तृत्वाची यादीच वाचून दाखवली. सातारा एववेळ समजू शकतो… कारण रामशेठ तिथं शिकले… तिथूनच पदवीधर झाले… पण, ज्या मोखाड्यात रामशेठ यांनी ५ कोटी रुपये लावून प्रचंड संकूल उभे केले… जगातील कोणत्याही पदवीच्या सत्काराने रामशेठच्या या कामाची तुलना होणार नाही… मोखाडा नेमकं कुठं आहे, हे अनेकांना माहितीही नसेल…. ठाण्यापासून ७० किलोमीटर…. मुंबईपासून ९५ किलोमीटर… कसारा स्टेशनपासून ३० किलोमीटर… २८ किलोमीटरचा प्रचंड घाट… घाटतील आजुबाजूचे सगळे बोडके डोंगर… कुठेही झाडी नाही… मोखाडा येईपर्यंत रस्त्यावर एखादेच वाहन… तरी आता रस्ते बरे झालेत… पण, गेली चार वर्षे ज्यांना कसल्याही गोष्टीची कमी नाही… जे घरी आराम करू शकतात.. ७० वर्षे वय झालेले आहे. त्या वयापासून ७२ व्या वर्षात पोहोचेपर्यंत एका ध्येयाने झपाटून पनवेलहून मोखाड्याला गेल्या ३ वर्षांत रामशेठ ७३ वेळा गेले… कारण काय… रयत शिक्षण संस्थेने म्हणजे जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील होते… त्या माणसाची दूरदृष्टी पहा… १९६० साली मोखाडा येथे त्यांनी रयतची शाळा बांधली… छोटी मातीची इमारत… पण आदिवासी मुलं शिकावीत हा हेतू. कर्मवीर कुठे राहत होते… सतारात… मोखाडा कुठे?…. ३०० किलोमीटर दूर… तिथं शाळा सुरू केली… गेल्या ६३ वर्षांत ती शाळा जुनी झाली… नवीन इमारतीची गरज निर्माण झाली… रयत शिक्षण संस्थेमध्ये चर्चा झाली… संपूर्ण संकुल नवीन करायचे ठरले… ७-८ कोटी रुपये खर्च… पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. जे सरकारला जमले नाही ते या दोन नेत्यांनी करून दाखवलं.. रामशेठ म्हणाले, ‘मी पाच कोटी देतो… ’ पवारसाहेब म्हणाले, ‘मी तीन कोटींची व्यवस्था करतो…’मोखाड्यात जावून बघा… मुंबईला लाजवेल एवढे प्रचंड शिक्षण संकूल अशा थाटात उभे राहिले आहे की, रामशेठच्या आयुष्यभराच्या जीवनाचे सार्थक जणू या मोखाड्याच्या कार्याने व्हावे. संपूर्ण तालुका आदिवासी… रोजगार नाही… पिण्याचे पाणी फारसे नाही… मुलांना शिक्षणासाठी जव्हार किंवा नाशिकला जावं लागायचे… डोंगरावरची नागली- नाचणीची शेती… अशा या आदिवासी भागात हे शिक्षण संकुल उभे राहिले. रामशेठ ठाकूर पनवेलहून आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. भगिरथ शिंदे नाशिकहून गेली चार वर्षे, रामशेठ आणि भगिरथ शिंदे खेपा घालून एक प्रचंड शिक्षण संकुल उभे राहिले. ते संगळं पाहून आल्यानंतर असं वाटतं राहिलं की, अरे, आयुष्यात काही करता आले पाहिजे तर एवढं मोठं काम उभं करता आलं पाहिजे… जे खऱ्याअर्थाने सर्वसामान्यांसाठी आहे. या कामाला तोड नाही. या कॉलेजमध्ये ९८ टक्के विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आदिवासी आहेत. २८ प्राध्यापक आहेत. त्यातील एक महिला प्राध्यापक आहे. प्राचार्यपदी डॉ. लक्ष्मण दाजी भोर आहेत. अद्ययावत विज्ञाान प्रयोगशाळा आहे. ८ एप्रिल २०२३ ला या संकुलाचा लोकार्पण सोहळा झाला… शरद पवारसाहेब प्रमुख पाहुणे होते… त्यांच्याच हस्ते हा सोहळा रणरणत्या उन्हात झाला. पण, दातृत्त्वाचं चांदणं असे काही होते की, हे रणरणते ऊन कोणाला जाणवलेही नाही. माझ्या मनात विचार येऊन गेला, ‘ही रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव आण्णा यांनी किती कष्टाने उभी केली… आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले… त्यातून पहिली शाळा उभी केली. गावोगाव फिरून चारआणे- आठ आणे- रुपाया… वर्गणी जमा केली… ज्या घरात चार आणे देणे शक्य नव्हते…. त्या घरातील माऊलीने पायलीभर जोंधळे दिले… ते जोंधळे बाजारात विकून आण्णांनी त्यातून आणे-चारआणे जमा केले… काय कष्टातून संस्था उभी राहिली… आज पाच लाख विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. सर्व जाती-धर्मातील आहेत… १५०० प्राध्यापक आहेत… एकूण संस्थेचा पसारा १०० शाखांच्या पुढे आहे. ते आण्णा ८ एप्रिलच्या मोखाडा येथील कार्यक्रमावेळी स्वर्गात किती खूश असतील… माझ्या मनात येऊन गेले… आण्णा आता नक्की यशवंतरावसाहेबांना भेटायला गेले असतील… कारण आण्णांच्या स्वर्गवासानंतर रयतचे अध्यक्ष १९६१ साली यशवंतराव चव्हाण झाले होते…. तेव्हा ते मुख्यमंत्री होते… पण, अध्यक्ष झाल्यावर रयतच्या अभिप्राय पुस्तकात यशवंतरावांनी लिहून ठेवले…. ‘मी ज्या दिवशी मुख्यमंत्री झालो, त्यादिवशी मला जो आनंद झाला नव्हता त्यापेक्षा कितीतरी पट रयतचा अध्यक्ष झाल्यानंतर मी आनंदी आहे…’ अशा या यशवंतरावांकडे स्वर्गात आण्णा भेटायला गेले… यशवंतरावांनी मग संस्थेचे नंतरचे अध्यक्ष वसंतदादा पाटील, एन. डी. पाटील, रावसाहेब शिंदे, यांनाही बोलावून घेतले… चहा घेता घेता आण्णा म्हणाले की, ‘साहेब रयत शिक्षण संस्था उभी करताना आपल्याला लय कष्ट घ्यावे लागले… आयुष्य संपल्यावर वाटत होते की, हे कसं चालवणार… कोण चालवणार? तुम्ही लय चांगलं सांभाळलंत… नंतर दादा, एन. डी., रावसाहेब यांनी ही मोठ्या खुबीनं काम केलं… १२ कोटी रुपये खर्च करून शरद पवारसाहेबांनी संगणकाचं शिक्षण सुरू केलं… आणि आता तर रामशेठ असतील… शरद पवार असतील… संस्थेला आर्थिक अडचणींचा विषयच संपला आहे… आपल्याला लय समाधान आहे… आपल्या पोरांनी आपल्या ध्येयाचं सोनं करून टाकलं… ’
आण्णांच्या या शब्दांनंतर यशवंतराव अगदी सहज म्हणाले, ‘आण्णा चिंता करू नका… ही आपली मुलं संस्था अधिक मोठी करतील… महाराष्ट्र मोठा करतील… तुम्ही लावलेलं झाड त्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय कसा राहिल? रामशेठ आहेत ना…. खरं म्हणजे ते ‘दानशेठ’च आहेत…’

9892033458
393 Total Likes and Views