*साल १९९१ ला प्रदर्शित झालेल्या सौदागर पिक्चर मध्ये राजकुमारचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. हम खैरात नहीं लेते वीरसिंग, हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक भी हमारी होंगी, गोली भी हमारी होंगी और वक्त भी हमारा होंगा. अगदी डीक्टो अशीच काहीशी स्थिती आयपीएल अंतिम लढतीत धोनी विरुद्ध पांड्या दरम्यान होती. टायटन्स संघ एकतर गतविजेता, त्यातच शुभमन, सहा, साई, मिलर, पांड्या सारखे खंदे शिलेदार आणि दिमतीला शामी, राशिद खान, मोहितचा सुसज्ज तोफखाना. भरीस भर म्हणजे टायटन्सना सोयिस्कर असे होम ग्राऊंड. तरीपण आयपीएलचा दादा संघ असलेल्या माहीच्या सेनेने गुजरात टायटन्सला त्यांच्याच भुमीत धोबीपछाड देत पाचव्यांदा आयपीएल चषक जिंकला. सोबतच अब की बार माही सरकार हे दाखवून दिले.*
*झाले काय तर दुनिया गोल आहे असे म्हणतात आणि झालेही तसेच. आयपीएल स्पर्धेचा प्रांरंभीचा आणि अंतिम सामना चेन्नई विरूद्ध गुजरात असा रंगला. त्यातही वरुणराजाने सुपर संडेला वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत सामना कुठेही असो, आपणच बॉस आहे हे दाखवून दिले होते. त्यामुळे फायनलचा फिव्हर शिगेला पोहोचला होता. अगदी राखीव दिवसाला सुद्धा वरुणराजाने आपली वक्रदृष्टी या लढतीवर ठेवल्याने उत्सुकता आणखीनच ताणली गेली होती. अखेर आकाश काहीसं निरभ्र झालं आणि अंतिम लढतीला हिरवी झेंडी मिळाली. अर्थातच सामन्यावर पावसाचे सावट असल्याने नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला डकवर्थ लुईस या राहुकेतूच्या जोडीची कृपा असल्याने चांगला फायदा होतो. खरेतर हा लकी ड्रॉ असतो जो कोणत्याही संघाला, कधीही, कुठेही लागू शकतो.*
*प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरात संघावर यावेळी चेन्नई संघ फिदा दिसत होता. त्यांनी जबरदस्त फॉर्मात असलेल्या शुभमनला तीन धावांवर तर वृद्धीमान सहाला एकवीस धावांवर जीवदान दिले. भरीस भर म्हणून शुभमनला धावचीत करण्याची संधी दवडली गेली होती आणि आऊटफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षणात आनंदी आनंद होता. सोबतच माहीचे गोलंदाजी आक्रमण शुद्ध शाकाहारी असल्याने सहा,गील जोडीने सात षटकांपर्यंत फटकेबाजी करत साठी ओलांडली होती. मात्र ही दुक्कल डोईजड ठरताच धोनीने आपले जुने अस्त्र काढले आणि जडेजाने जादू दाखवली. ज्याप्रकारे धोनीने निमिषार्धात शुभमनला यष्टीचीत केले ते पाहता चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और धोनी के स्टंपींग पे शक नहीं करते हे सिद्ध झाले. खरेतर शुभमनला धोनीने क्रिझमध्ये येऊ देण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याबद्दल शुभमनने मानवाधिकार आयोगाकडे धोनीची तक्रार करायला हरकत नाही.*
*शुभमन बाद होताच धोनीने सामान्याचे गिअर आपल्या हातात घेतले आणि सहा, साई जोडीला लगाम लावला. भलेही सहा, साईने विकेट पडू दिली नाही परंतु पूर्वीच्या तुलनेत रनरेट घसरला. वास्तविकत: टायटन्सला एवढी चांगली सुरुवात मिळाल्यावर पांड्या किंवा मिलरला वन डाऊन पाठवले असते तर आणखी चांगले झाले असते. मात्र याची भरपाई साई सुदर्शनने तडाखेबंद ९६ धावांची तुफानी खेळी करत पुर्ण केली. तरीपण वृद्धीमान सहा पन्नाशी गाठतांना थोडा मंदावला आणि तिथेच टायटन्सच्या कमीतकमी विस पंचवीस धावा कमी काढल्या गेल्या. अखेर हाणामारीचा परमोच्च बिंदू गाठत टायटन्सने वीस षटकांत दोनशे चौदा धावा केल्या ज्या कोणत्याही संघासाठी निश्चितच आव्हानात्मक होत्या.*
*चेन्नई संघ आयपीएल विजयाच्या पंजावर टपून होता तर टायटन्स सलग दुसऱ्या जेतेपदासाठी आतूर होते. मात्र डकवर्थ लुईसने चेन्नईचे काम तुलनेत सोपे केले होते. टायटन्सची संपूर्ण भिस्त गोलंदाजीवर होती. त्यातही शामीचा पॉवर प्ले मध्ये हमखास बळी टिपणारा गोलंदाज म्हणून लौकीक होता. तर राशिद खानच्या फिरकीला बहुतेक फलंदाज टरकून होते. मोहित शर्माची गोलंदाजीतील मोहिनी फलंदाजांना चकित करणारी होती तर नूर अहमदची फिरकी सामन्याचा नूर पालटण्यास तेवढीच सक्षम होती. पांड्या आणि जॉश लिटिल गर्दीतल्या खिसेकापू प्रमाणे कधीही विकेटवर हात की सफाई दाखवू शकत होते. दुसरीकडे चेन्नई संघ हिरव्या मैदानावर यलो फिवरचे जबरदस्त प्रदर्शनासाठी उत्सुक होता.*
*पॉवरप्ले हा दोन्ही संघांसाठी जीवन मरणाचा प्रसंग होता. मात्र इथे चेन्नई संघाने बाजी मारली. डेव्ह कॉनवे आणि रुतूराजने अवघ्या सात षटकांत जवळपास पाऊनशे धावा चोपताच चेन्नई एक्सप्रेस रूळावर आली होती. मात्र सातव्या षटकात टायटन्सच्या जीवात जीव आला. नूर मोहम्मद ने एकाच षटकात डबल धमाका करत दोन्ही सलामीवीरांना उडवले. चेन्नई संघाचे पाऊने दोनशेचा टप्पा गाठतांना एवढे रक्त तर सांडणारच होते. तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबे आला आणि खरेतर हाच खेळाडू चेन्नई संघासाठी एक्स फॅक्टर ठरला. कारण त्याने जरी नाबाद बत्तीस धावा केल्या असल्या तरी फलंदाजीचे एक टोक मजबूतपणे पकडून ठेवल्याने इतर सहकाऱ्यांना बेछूट गोळीबाराची संधी मिळाली. चेन्नई संघाने एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ करत सामन्यात रंग भरला. शिवम दुबे ने रहाणे, रायडू आणि जडेजा सोबत महत्वाच्या तीन भागिदाऱ्या करत चेन्नई संघाला तारले.*
*मात्र या लढतीत खरा भाव खाऊन गेला तो म्हणजे जडेजा. मोहित शर्माचे शेवटचे षटक अक्षरशः जीवघेणे होते. सलग चार चेंडू यॉर्कर लेंथवर टाकून त्याने चेन्नई संघाच्या छातीत धडधड वाढवली होती. तरीपण स्ट्राईक जडेजाकडे असल्याने चेन्नई समर्थकांना आशा होती. दोन चेंडूत दहा धावांसाठी माही सेना देवाचा धावा करत होती. शेवटी सर जडेजाने आपला अनुभव पणाला लावला. त्याने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकताच मोहित शर्मा गोलंदाजीची लय घालवून बसला. दबावाखाली मोहितने अखेरचा चेंडू लेगवर टाकताच चेन्नई एक्सप्रेसने टायटन्सला उडवून लावले. जडेजाचा मौके पे चौका धोनीसाठी आईसींग ऑन दी केक होता. थोडक्यात काय तर गुजरात टायटन्स जिंकता जिंकता हरले. तर चेन्नई सुपर किंग्ज हरता हरता जिंकले. याचे एकमेव कारण देता येईल आणि ते म्हणजे सर जडेजा आले धावून, टायटन्स गेले वाहून. सोबतच टायटन्सच्या शामी आणि राशिद खानचे गोलंदाजीतील अपयश गुजरातच्या टायटॅनिकला बुडण्यापासून वाचवू शकले नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे.*
79 Total Likes and Views