मानवाने निसर्गाशी खूप छेडछाड केली. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी माया कॅलेंडरचा दाखला देत जगबुडी होणार अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र, आता थेट शास्त्रज्ञांनीच याबाबत गंभीर इशारा दिला आहे. वाढत्या तापमानवाढीवर वेळीच उपाययोजना न केल्यास पृथ्वीवरील बर्फ वितळून सगळीकडे पाणीच पाणी होईल असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अगदी ९०च्या दशकांपासून याबाबत वारंवार उल्लेख होत आहे, मात्र अजूनही आपण त्यावर ठोस उपाययोजना केलेली नाही. याचाच परिणाम म्हणून आता पृथ्वीवरील बर्फ चक्क तीन पट वेगाने वितळत असल्याचं समोर आलं आहे.
ग्रीनलँडमध्ये असलेल्या हिमनद्या या २०व्या शतकाच्या तुलनेत तीन पट वेगाने वितळत आहेत. हे असंच सुरू राहिलं, तर पृथ्वीवरील बहुतांश जमीनीवर देखील पाणी होऊन जाईल. ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन उत्सर्जन आणि इतर प्रदुषणामुळे केवळ ग्रीनलँडच नाही, तर ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या देखील वितळत आहेत. पोर्ट्समाउथ विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंट, भूगोल आणि भूगर्भशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. क्लेअर बोस्ट यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी शास्त्रज्ञांनी जो अंदाज व्यक्त केला होता, त्या तुलनेत ग्रीनलँडमधील ग्लेशिअर्स अधिक वेगाने वितळत असल्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ग्रीनलँड हे उत्तर ध्रुवावर असणारं सर्वात मोठं बेट आहे. यावर अनेक हिमनद्या आणि बर्फाचे मोठे पर्वत आहेत.
जिओफिजिकल रिसर्च लेटर्सने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या वितळत राहिल्यास, पृथ्वीवरील समुद्राच्या पातळीत वाढ होईल, आणि किनारी भागातील लोकांना सर्वाधिक धोका असेल, असं यात सांगितलं आहे.
समुद्राच्या वाढलेल्या पातळीमुळे आताच जगभरातील कित्येक सागरी किनारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या किनारी भागांमधून मानवाला स्थलांतर करावं लागलं आहे. हे असंच सुरू राहिलं, तर एक दिवस मानवाला स्थलांतर करण्यासाठी जमीनच उपलब्ध नसेल. ही वेळ येऊ नये असे वाटत असेल तर आपण आजच सावध झाले पाहिजे. पृथ्वीचे तापमान वाढू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. पण अशी कोणाची इच्छा आहे?
59 Total Likes and Views