पूर्वी लग्नं घरासमोर मंडप टाकून व्हायची. पुढे मंगल कार्यालयात होऊ लागली. आता जमाना बदलला आहे. नवनवे फंडे येत आहेत. दुसऱ्या राज्यात लोक वऱ्हाडी घेऊन जात आहेत. तीही जुनी गोष्ट झाली. आता विदेशात लग्नं होत आहेत. तेवढ्यावरही जोडप्यांचे समाधान झालेले नाही. आता चक्क आकाशात म्हणजे अंतराळात लग्नाचे बेत आखले जात आहेत. येणार तुम्ही लग्नाला?
प्रेमात असताना चंद्र-तारे आणून देण्याचे वायदे होतात, तरीही प्रत्यक्षात ते शक्य नसतं. मात्र, आता तुम्हाला याच चंद्राच्या साक्षीने थेट अंतराळात जाऊन लग्न करता येणार आहे. स्पेस पर्स्पेक्टिव्ह या स्पेस ट्रॅव्हल कंपनीने ही सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे आता डेस्टिनेशन वेडिंगनंतर चक्क ‘स्पेस वेडिंग’चा ट्रेंड सुरू होणार आहे.कंपनीच्या को-फाऊंडर जेन पॉइंटर यांनी सांगितले, की अंतराळात लग्न करण्यासाठी कित्येक लोक उत्सुक आहेत. यासाठी एक मोठी वेटिंग लिस्ट तयार आहे. त्यामुळे आता अंतराळात लग्न करणारं पहिलं जोडपे कोण ठरेल हे पाहण्यासाठी आपणही उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या.
लग्नासाठी आलेल्या कपलला अंतराळात नेण्यासाठी कंपनीने स्पेस बलून्स तयार केले आहेत. हायड्रोजनने भरलेले हे बलून्स ‘नेपच्यून’ नावाच्या स्पेस कॅप्सुलला अंतराळात नेतील. याचा वेग १९ किलोमीटर प्रतितास एवढा असेल. त्यामुळे हे एखाद्या विमानात बसल्याप्रमाणेच सुरक्षित असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. स्पेस पर्स्पेक्टिव्ह कंपनीने वापरलेले हे तंत्रज्ञान गेल्या कित्येक वर्षांपासून नासा आणि इतर सरकारी अंतराळ संस्थांकडून वापरण्यात येत आहे. अंतराळात रिसर्च टेलिस्कोप आणि अन्य उपकरणे नेण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी एका व्यक्तीचा खर्च सव्वा लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे एक कोटी रुपये एवढा येणार आहे. स्पेस पर्स्पेक्टिव्ह कंपनीच्या वेबसाईटवर तुम्ही यासाठी नोंदणी करू शकता. २०२४ च्या शेवटी ही सुविधा सुरू होईल. यासाठी आतापासूनच मोठी वेटिंग लिस्ट तयार झाली आहे.
या स्पेस कॅप्सुलमध्ये रिफ्रेशमेंट्स, वायफाय, टॉयलेट आणि एक फ्लोटिंग लाउंज अशा विविध सुविधा मिळतील. ज्यामुळे, आतील व्यक्तींचा प्रवास अगदी आरामदायी होणार आहे.
कंपनीचे लीड डेव्हलपमंट इंजिनिअर व्हिन्सेंट बॅचेट यांनी सांगितले, की नेपच्यून या स्पेस कॅप्सुलला मोठी खिडकी असेल. आतापर्यंत अवकाशात पाठवण्यात आलेल्या कोणत्याही कॅप्सुलला नव्हती, एवढी मोठी ही खिडकी असेल. यामध्ये हायपर रेझिस्टंट मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच सूर्यकिरणांपासून बचावासाठी विशेष अँटी यूव्ही लेअर लावण्यात आली आहे. यामुळे अंतराळातून पृथ्वीचा सुंदर नजारा पाहता येणार आहे.
816 Total Likes and Views