‘ ए रिक्षा , खाली है क्या ? ‘

Analysis Hi Special News
Spread the love

एक गोष्ट लक्षात आली का , माझ्या खास नागपुरी मित्रमैत्रिणींनो ?एकेकाळी नागपूरचा ब्रँड अँबेसेडर असलेला सायकलरिक्षा आता हळू हळू लुप्त होतोय . सध्याच्या काळात सायकलरिक्षा पश्चिम नागपुरात तरी दिसत नाही .तुरळक असेलही . महाल -इतवारी-गांधीबाग – कॉटन मार्केट या भागात अजूनही या रिक्षांचे महत्त्व टिकून आहे .मध्य , दक्षिण आणि पूर्व नागपुरात काही भागातच सायकल रिक्षे दिसतात ,पण नाहीच जवळजवळ !!तशा सिटीबसेस होत्या पन्नासच्या दशकात पण ,सामान्य माणसाचे दळणवळणाचे साधन त्या काळात केवळ सायकलरिक्षा हेच होते. तसे नागपुरात टांगेही होते रिक्षांच्या पूर्वी ! सायकलरिक्षांचे चलन नागपुरात नक्की केव्हा सुरु झाले हा संशोधनाचा विषय आहे …

……. मला आठवते ,आमचे मामा नुकतेच ,उमरेड रोडवरील विद्यानगरी (मोहता सायन्स काॅलेज आणि एस.बी. सिटी कॉलेज परिसर ) येथे राहायला गेले होते . मामा सिटी कॉलेजात पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक होते . आम्ही बर्डीवर राहात होतो . मामांकडे महालक्ष्मीच्या वेळेस जायचे तर मी ,आई आणि तिघे भाऊ केवळ चार रुपयात जात असू . तेही घासाघीस करून . रिक्षावाला पाच रुपये सांगत असे आई तीन रुपयांपेक्षा एक पैसा जास्त द्यायला तयार नसे .मग तडजोड होऊन चार रुपये ठरत .ही गोष्ट आहे १९५७-५८-५९ च्या आसपासची . बर्डीवरून विद्यानगरीला जायचे म्हणजे घाटरोडने जावे लागे . घाटरोडच्या उतारावरून रिक्षा जाताना जीव गोळा व्हायचा . येताना याच उताराचा चढाव होत असे . आम्ही दोघे भाऊ रिक्षातून उतरून त्याला मागून ढकलीत असू .नंतरच्या काळात केव्हातरी ,म्हणजे माझ्या मते साठच्या दशकात, या रिक्षांना लावायला पेट्रोलचे इंजिनही मिळू लागले . ‘आता घाटरोडचा चढाव चढायला श्रम पडणार नाहीत ‘ अशी त्याची जाहिरातही येत असे . परंतु त्याचा जास्त प्रसार झाला नाही .

…… मी सातवी -आठवीत किंवा नववी -दहवीतही असे पर्यंत नागपुरात टांगेही होते . इतवारी ,धरमपेठ,महाल , रेल्वे स्टेशन , बस स्टॅन्ड या ठिकाणी मोठे टांगा स्टॅन्ड असत . लोक जातही असत टांग्याने . लग्नाच्या वरातीही टांग्यातून निघालेल्या मी पाहिल्या आहेत.नंतर बग्गीतून निघत . साधारणपणे सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत टांगे दिसत .नंतर मात्र ते पूर्णपणे लोप पावले . आता नागपुरात टांगा नाही . हीच अवस्था आता सायकल रिक्षाची आहे . १९९० नंतर सायकलरिक्षे हळूहळू कमी होत गेलेले दिसतात .कारण १९९० नंतरच्या पिढीने रिक्षा चालविलाच नाही . पूर्वी श्रुंगारलेले रिक्षेही दिसत .ते दिमाखात चालवणारे रिक्शावालेही दिसत. आता ते अजिबात दिसत नाहीत …..

‘ ए रिक्षा खाली है क्या ?
”कहां जानेका बाबू ?’
‘धरमपेठ . कितना लेंगा ?”
“कितनी सवारी है ?”
“दो बडे ,तीन छोटे ”
“पूरा रिक्षा हो गया ना बाबू . दस रुपये देना. चढाव भी तो है बर्डी के बाद”
…असे संवाद होत आणि घासाघीस होऊन शेवटी आठ रुपयांवर रिक्षा ठरे . बडकस चौक ते धरमपेठ या प्रवासाला एक तास लागे . ह्या १९५५-६० च्या गोष्टी आहेत . आमच्या बालपणात एक जोक फेमस होता ….

मुलगा म्हणे ,’बाबा , यंदा परीक्षेत मला चांगले मार्क मिळून मी नंबरात आलो तर मला सायकल घेऊन द्या ‘
यावर त्या बापाचे उत्तर ,’ ठीक आहे .पण कमी मार्क मिळाले ,थर्ड क्लास मिळाला किंवा नापास झाला तर रिक्षा घेऊन देईन .”
रिक्षा चालवणे हे अशिक्षित अडाण्याचे काम अशीच भावना असे . गेले ,ते बापही गेले आणि ते पोट्टेही गेले .. १९५९ साली आलेल्या ‘ छोटी बहेन ‘ या चित्रपटातील ,मेहमूदवर चित्रित झालेले मोहम्मद रफीचे ‘मैं रिक्षावाला ,मैं रिक्षावला / है चार के बराबर ये दो टांगवाला/कहाँ चलोगे बाबू,कहाँ चलोगे लाला ‘ हे गाणे त्यावेळी खूप लोकप्रिय झाले होते .

… पण अपार्ट फ्रॉम जोक्स ,रिक्षा चालवणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हते ,आजही नाही . माणसानेच माणसांना ओढून न्यायचे ! करणार काय ? पापी पेटका सवाल है !!रिक्षात आरामात बसलेल्या सवाऱ्या आणि घाम पुसत रिक्षा ओढणारा रिक्षेवाला हे दृश्य तसे सुखावह कधीच नव्हते . आपल्या वयाच्या विसाव्या वर्षी सायकल रिक्षा चालवयाला सुरुवात केलेल्या माणसाच्या छातीचे ,वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी पार खोके होऊन जाई .शिवाय बहुतेकांना मद्यपान,धूम्रपान या अॅडिशनल सवयी असतच . काहींचे रिक्षे स्वतःचे असत तर काहींचे भाड्याचे ! एकेकाळी नागपुरात मोठमोठी रिक्षा ग्यारेजेस होती. हे ग्यारेज मालक आपल्या रिक्षा गरजूंना दिवसभराच्या भाड्याने देत . दिवसभराच्या कमाईतून भाड्याचे पैसे वगळता हाती आलेल्या पैशातून त्यांचा संसार चाले . नागपुरात अनेक ठिकाणी अशा ग्यारेजमधील रिक्षा एकाच मोठ्या चेनने जखडून ठेवलेल्या असत . नवीन रिक्षा बांधण्याचा व्यवसायही आता फारसा दिसत नाही . नागपुरी रिक्षावाल्याचा जीवनावर आमच्या संजीव कोलते ह्याने ‘तानी’ हा चित्रपट २०१३ साली काढला होता . त्याचे जवळजवळ सर्वच चित्रीकरण नागपुरात झाले होते . अरुण नलावडे , वत्सला पोलकमवार ,विलास उजवणे, देवेन्द्र दोडके , केतकी माटेगावकर आणि अन्य कलाकार ह्यांच्या त्यात भूमिका होत्या .

त्याकाळी लोकलची सवय असलेले मुंबईकर पाहुणे आणि टांग्याची सवय असलेले पुणेरी पाहुणे नागपूरला आले की,त्यांना नागपुरी रिक्षांचे दचके असह्य होत . त्यातही नागपुरातील ७०- ८० -९०च्या दशकांमधल्या बहुगुणी नागपुरी रस्त्यांवरून रिक्षा चालवणे ,मग ती माणसांनी भरलेली असो की सामानाने ,एक दिव्यच होते . एखादी ‘ अडलेली ‘ माता-भगिनी असेल तर ,तिला सायकल रिक्षात बसवून टिळक पुतळा ते व्हेरायटी चौक व्हाया कॉटन मार्केट या रस्त्यावरून नेल्यास ,बर्डीवरील मातृसेवासंघ येण्यापूर्वीच तिची सुटका होई , अशी त्या काळातील नागपुरी रस्त्यांची आणि रिक्षांची अभिमानास्पद आठवण त्या काळातील जुने -जाणते वृद्ध आजही सांगतात.

नागपुरात मार्च -एप्रिल – मे या महिन्यांमधील तळपत्या -राक्षसी उन्हात, ४५-४६ तर कधी ४८-४९ डिग्री सेल्सियसच्या जीव कोरडा करणाऱ्या उन्हात रिक्षा चालवणे म्हणजे शब्दशः अग्निपरीक्षाच असे, आजही आहे ! अशा उन्हात रिक्षा चालवतांना चालक थकला आणि एखाद्या झाडाखाली सावलीत विसावला की , पुन्हा उन्हात येत नसे . पूर्वीच्या काळी जसे फॅमिली डॉक्टर किंवा एकाच कुटुंबातील मुलामुलींना पिढी दर पिढी ट्युशन देणारे फॅमिली मास्तरअसत ,तसे अनेकांचे फॅमिली रिक्षावालेही असत . आपल्या रिक्षात एकाच वेळी आठदहा पोट्टे त्यांच्या दप्तरांसकट ओढून नेणारे रिक्षेवाले दिसणे आता कमी झाले आहे . माझी मुले मोठी होईपर्यंत आम्हीही सायकल रिक्षातूनच गावात फिरलोय्.

साधारण साठच्या दशकात नागपुरात शहर बस सेवेने बाळसे धरले . ऑटोरिक्षा हे वाहन साठच्या दशकाच्या अगदी उत्तरार्धात नागपूरच्या रस्त्यांवर आले आणि आता तर त्यांचेच साम्राज्य आहे .ई-रिक्षा, ऑटोरिक्षा ,सिटीबस , ओला ,उबेर आणि मेट्रो यासारख्या गतिमान साधनांपुढे सायकल रिक्षा किती टिकणार ? जीवनाच्या असह्य गतीमुळे अगतिक झालेल्या आजच्या पिढीला गतिमान वाहनच हवे ना? ह्या गतीपुढे सायकल रिक्षा किती टिकणार ?

मागे एका पोस्ट मध्ये मी ,नागपुरातील लुप्त झालेल्या गोष्टींबद्दल लिहिले होते . नरसिंग टॉकीजच्या फुटपाथवरचे न्हावी , महाराजबागेसमोरील फोटोग्राफर , लाल कपड्यात टिनाचा डब्बा गुंडाळलेले चनाजोर गरमवाले ,उन्हाळ्याच्या दिवसात रात्री नऊनंतर आपल्या गाडीची घंटी वाजवत आईस्क्रीम विकणारे , ‘दे दान छुटे गिरान ‘ ही आरोळी मारणारे , जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडे देणाऱ्या बोहारणी , खांद्यावर लुगड्यांचे गठ्ठे अडकवून घरोघरच्या आयाबहिणींना नागपुरी वाणाच्या साड्या लुगडे विकणारे कोष्टी बंधू, कल्हईवाले , उशा -गाद्यांमधला कापूस पिंजून देणारे धनुकलिवाले पिंजारी बंधू , जाते -पाटे -वरवंटे टाकवून देणारे पाथरवाट ,अस्वला -माकडांचे खेळ करणारे दरवेशी ,सुया-बिब्बे-फण्या विकणाऱ्या बाया,घरोघरच्या आया-बहिणींना रंगीबेरंगी बांगड्या भरून देणारे कासार बंधू ,बायोस्कोप वाले,बुढ्ढीके बाल वाले,वेगवेगळ्या चवीचे चूरण विकणारे,रस्त्यावर खेळ करणारे डोंबारी ,नागपंचमीला नागांचे टोपले घेऊन येणारे गारुडी आणि असेच आणखी कितीतरी !!! कुठे गेले हे सगळे ? तसेच आता सायकल रिक्षावाल्यांबद्दलही हेच म्हणावे लागणार असे दिसते . आता काही काळानंतर ती परिचित हाक ऐकू येणार नाही ….

‘ ए रिक्षा, खाली है क्या ?’

—-प्रकाश एदलाबादकर , नागपूर
Prakash Edlabadkar,Nagpur.

 921 Total Likes and Views

0 Comments

No Comment.