ओव्हलला टीम इंडियाचं वाट्टोळं, पूर्वार्ध

Editorial Sports
Spread the love

ओव्हल मैदानावर झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद सामन्यात चॅम्पियन ऑसी संघाने टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला आहे. आयपीएल मे शेर बाहरमे ढेर या उक्तीला जागणाऱ्या भारतीय संघाची लज्जास्पद कामगिरी पाहून भारतीय क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला आहे. जणुकाही आयसीसी चषक जिंकणे हे आता आपल्या संघासाठी दिवास्वप्न ठरले आहे असे वाटते‌. अयोग्य संघनिवड, खेळपट्टीचा अचूक अंदाज न घेणे, गोलंदाजीत सातत्याचा अभाव, ठिसूळ फलंदाजु, रोहितचे निष्प्रभ नेतृत्व, द्रविडच्या प्रशिक्षक म्हणून मर्यादा भारतीय संघाच्या पतनाला कारणीभूत ठरल्या आहे.*

झाले काय तर आयपीएलच्या वरातीमागून जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे घोडे नाचवले गेले. मात्र आपले घोडे दमले, भागलेले होते हे विसरून कसे चालेल. सध्यातरी टीम इंडिया म्हणजे जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले. तो ची भारतीय संघ ओळखावा, पराभव तेथेची जाणावा अशी स्थिती आहे. मुख्य म्हणजे अश्विनला बाहेर बसवून उमेश यादवची निवड धक्कादायक होती. वेगवान गोलंदाजांच्या भाऊगर्दीत अश्विन सारखा ऑफ स्पिनर काय करू शकतो हे नॅथन लॉयनने या सामन्यात पाच बळी घेऊन दाखवले आहे. भलेही नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली हा जुगार जरी असला तरी गोलंदाजांकडून शिस्तबद्ध कामगिरीची अपेक्षा होती. कांगारूंच्या दोन्ही डावात आपल्या गोलंदाजांनी प्रारंभी सत्तर अंशी धावांत तीन तीन बळी घेऊन चुणूक दाखवली होती. मात्र नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या झाले.

ओव्हलला गोलंदाजांनी खोल टप्पा टाकणे अपेक्षित होते. ते त्यांच्या यशाचं गमक होतं. तर डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडला शॉर्ट पीचवर पकडणे जरुरी होतं. याकरिता भारतीय संघाचा गृहपाठ कमी पडला. याच ट्रॅव्हिस हेडने आपल्या गोलंदाजांना बॉल पणीचा काळ सुखाचा नसतो हे दाखवून दिले. त्याने खडूस स्मिथच्या साथीने निर्णायक भागीदारी करत भारतीय संघाला घुटने टेकवण्यास विवश केले. पहिल्याच दिवशी या दुक्कलीने सव्वा तिनशेचा टप्पा ओलांडत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले. नशीब समजा दुसऱ्या दिवशी नवीन चेंडू आपल्या मदतीला धावून आला आणि कसेबसे का होईना कांगारूं संघाला गुंडाळण्यात आपण यशस्वी ठरलो. मात्र तोपर्यंत थेम्सच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.

ऑसीचा पाठलाग करतांना रोहीत, शुभमन, पुजारा, विराट, रहाणे या प्रमुख फलंदाजांसोबतच जडेजा, श्रीकर भरत, शार्दुल ठाकूर यांच्या तिसऱ्या आघाडीवर भिस्त होती. मात्र प्रत्यक्षात काय घडले ते सर्व स्पष्ट आहे. एकटा रहाणे आणि तिसऱ्या आघाडीने जोर मारला परंतु बहुमतापासून ते कोसो मैल दूर होते. वरच्या फळीतील दिग्गजांनी मनी नाही धाव, देवा मला पाव केले आणि टीम इंडियाचे सरकार तिनशेच्या आत कोसळले. कांगारूंना पहिल्या डावात जवळपास पाऊने दोनशे धावांची आघाडी मिळताच अब की बार कांगारू सरकार येणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. रोहित, शुभमनचे चार चेंडूच्या अंतराने बाद होणे धक्कादायक होते. त्यातही शुभमन आणि पुजाराची चेंडूवरची नजर हटी दुर्घटना घटी संघाला हादरवून गेली.

शुभमनला एकवेळ माफ केले जाऊ शकते परंतु पुजाराने काय केले हा प्रश्नच उरतो. त्याचा वर्षाभराचा कौंटी क्रिकेटचा अनुभव कुठे गेला?ओव्हलवर केवळ फलंदाज नव्हे तर यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकांना सुद्धा चेंडूवर नजर ठेवावी लागते. ऑसींनी विराट साठी विशेष पाहुणचार ठेवला होता. सुरवातीला दोन षटकानंतर स्टार्कला विश्रांती देऊन ताजेतवाने ठेवले आणि त्याने नंतर अचूकपणे विराटला टिपले. या पडझडीतही पहिले रहाणे जडेजाने किल्ला लढवला. जणुकाही चेन्नई सुपर किंग्ज भारतीय संघाच्या मदतीला धावल्या सारखे वाटत होते. श्रीकर आला कधी गेला कधी काही कळलेच नाही. संघ फॉलोऑनच्या सावटाखाली असताना रहाने शार्दुलची मराठमोळी जोडी धावून आली आणि पुन्हा एकदा दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा याची आठवण झाली.

या जोडीने जरी आपल्या संघाचे वस्त्रहरण थोपवले होते तरी आपला संघ जवळपास पाऊने दोनशे धावांनी माघारला होता. म्हणायला जरी हा आकडा दोनशेच्या आतला असला तरी चौथ्या डावात फलंदाजी, खेळपट्टीचा बदललेला सूर आणि तेवढेच खतरनाक ऑसी गोलंदाजी आक्रमण पाहता ही धावसंख्या आणखीनच भितीदायक वाटत होती. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर भारतीय संघाने जी काही थोडीफार धावसंख्या उभारली त्याकरिता ऑसी कर्णधार पॅट कमीन्स आणि त्याच्या क्षेत्ररक्षकांचे आभार मानले पाहिजे. वास्तविकत: नोबॉल वर बळी घेण्याचे पेटंट भारतीय गोलंदाजांकडे आहे. मात्र सतत आयपीएल साठी भारतात येणाऱ्या पॅट कमीन्सला भारतीय गोलंदाजांचा वाण नाही पण गुण लागला. भविष्यात पॅट कमीन्सने नो बॉल वर बळी कसे मिळवावेत याचे कोचिंग क्लासेस काढले तर आश्चर्य वाटायला नको.
क्रमशः,,,,,!

डॉ अनिल पावशेकर


दि. १२ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

 58 Total Likes and Views

0 Comments

No Comment.