राष्ट्रवादीचे तीन नेते ‘घड्याळ’ सोडण्याच्या तयारीत,‘बीआरएस’च्या संपर्कात, पवारांना धक्का?

Editorial
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर भाकरी फिरविली असली तरी खालच्या पातळीवर अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे नाराजी असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पक्षाचे तीन नेते राज्यात नव्याने हातपाय पसरत असलेल्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.

यापैकी श्रीगोंदा तालुक्यातील महत्वाचे नेते मानले जाणारे घन:श्याम शेलार सध्या हैद्राबादमध्ये गेले असून तेथे ते बीआरएसचे नेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. तर कर्जत आणि पाथर्डी तालुक्यातील आणखी दोघेही बीआरएसच्या संपर्कात आहेत. ते दोघेही ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू असल्याचे सांगण्यात येते.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्यात सभा झाल्यानंतर नगर जिल्ह्यातही त्यांना प्रतिसाद मिळत आहे. नेमकी विधानसभेची तयारी सुरू असताना बीआरएसने महाराष्ट्रात लक्ष घातले आहे. त्यामुळे पुढील सोय लक्षात घेता विविध पक्षांतील नेत्यांकडून प्रतिसाद मिळेल, अशी अटकळ राव यांची असावी. ती खरी ठरताना दिसत आहे. नगर जिल्ह्यात याची सुरवात राष्ट्रवादी काँग्रेसपासून होत असल्याचे दिसते.

घन:श्याम शेलार यांची राजकीय सुरुवात भाजपपासून झाली. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र, पुन्हा पाक्षपासून दुरावले. नंतर पुन्हा पक्षात आल्यावर विधानसभेची उमेदवारीही मिळाली. आता पुढील विधानसभेला ते इच्छुक असल्याचे मानले जात असतानाच श्रीगोंदा मतदारसंघातून पक्षाने माजी आमदार राहुल जगताप यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. जगताप यांनीही अलीकडे झालेल्या छोट्या मोठ्या निवडणुकांत आपला करिष्मा पुन्हा दाखवून दिला आहे. त्यामुळे आता पक्षाकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेलार अस्वस्थ आहेत. त्यातूनच त्यांनी नवीन पर्यायाची चाचपणी सुरू केल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याकडून याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. मात्र, ते निवडक कार्यकर्त्यांसह हैद्राबादला गेल्याचे सांगण्यात आले.

कर्जत तालुक्यातील बडा नेताही सध्या नाराज आहे. जिल्ह्याचे पद असूनही स्थानिक पातळीवर डावलले जात आहे. पक्षात थेट पवार यांच्याशी संपर्क असलेल्या या नेत्याची स्थानिक पातळीवर कोंडी झाली आहे. विश्वासात घेतले जात नसले तरी परभवाचे खापर मात्र फोडण्यात येत आहे. यातूनच हा नेताही नाराज असून त्यांच्याकडूनही बीआरएसची चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. नगरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा मेळावा आयोजित करण्यात या नेत्याचा पुढाकार होता. मात्र, चक्रीवादळाचे कारण सांगून तो ऐनवेळी रद्द करण्यात आला. हा मेळावा रद्द होण्यामागे आणखीही काही कारणे असल्याची चर्चा आता सुरू आहे.

पाथर्डी तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे. तेथे विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेला नेता नाराज आहे. कारण तेथेही दुसऱ्या एका नेत्याची नाराजी आणि आधीच्या एका निवडणुकीतील पराभवाची भरपाई काढण्यासाठी त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा कारणांमुळे बीआरएसकडे जाण्यासाठी चाचपणी सुरू झाल्याचे दिसून येते.

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खरोखरोच बीआरएसमध्ये गेले, तर राज्यातील आणखी ठिकाणाहून अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर के. चंद्रशेखर राव यांनी शरद पवार यांना दिलेला मोठा धक्का म्हणावा लागेल.

 116 Total Likes and Views

0 Comments

No Comment.