रामायण ह्या महाकाव्यावर आधारित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. ६०० कोटींची गुंतवणूक करुन या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा सिनेमा पाहून बाहेर आलेल्या लोकांनी फक्त सिनेमा वाईट आहे असंच म्हटलं नाही तर यात ‘छपरी’ भाषेचा उपयोग करण्यात आला अशीही टीका केली. सिनेमातल्या रावण, हनुमान, प्रभू राम यांच्या वेशभुषेची तसंच VFX ची खिल्लीही लोकांनी उडवली. सिनेमात दाखवण्यात आलेली रावणाची लंका सोन्याची नाही तर काळ्या दगडाची वाटते असंही लोकांनी म्हटलं. ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होताच वादात अडकला आहे. चित्रपटातील संवाद, व्हीएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लूकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
ओम राऊत दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नसल्याचं चित्र आहे. अनेकांनी या चित्रपटाला ट्रोल केलं आहे. रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर तर सडकून बोलले. प्रेम सागर म्हणाले, मी चित्रपट पाहिलेला नाही. पण आदिपुरुषचा ट्रेलर व टीझर मी पाहिला आहे. रामानंद सागर यांनीही रामायणमध्ये क्रिएटिव्ह फ्रिडमचा वापर केला होता. पण राम त्यांनी श्री रामाला समजून घेतलं होतं. अनेक ग्रंथ वाचल्यानंतर त्यांनी छोटे-मोठे बदल केले. परंतु, सत्याशी छेडछाड कधीच केली नाही. सैफ अली खानने साकारलेल्या रावणाच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, “रावण एक विद्वान व बुद्धिवान मनुष्य होता. त्याला खलनायक म्हणून दाखवणं चुकीचं आहे. ग्रंथांनुसार, श्रीरामांच्या हातूनच मोक्ष मिळू शकतो, हे ठाऊक असल्यानेच रावणाने इतका विनाश केला. श्रीरामही रावणाला विद्वान मानायचे. जेव्हा रावणाचा मृत्यू होणार होता, तेव्हा श्रीरामांनी काहीतरी शिकवण मिळेल या उद्देशाने लक्ष्मणाला त्याच्या पायाकडे जाण्यास सांगितले होते.
‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, जलेगी तेरे बाप की’ या हनुमानाच्या तोंडी असलेल्या डायलॉगबद्दलही त्यांना मुलाखतीत विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना प्रेम सागर हसले आणि याचा टपोरी स्टाइल असा उल्लेख केला.
रामायणमधील हनुमान अशी भाषा खरंच बोलायचे का? असे प्रश्नही नेटकरी विचारत आहेत. या संपूर्ण वादावर संवादाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या वादानंतर मनोज मुंतशीर यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला मुलाखत दिली. हनुमानाच्या ज्या संवादावरून नेटकरी ट्रोल करत आहेत, ते संवाद जाणीवपूर्वक तसेच लिहिले असल्याचं मनोज मुंतशीर यांनी म्हटलंय. “आताच्या पिढीला संवाद कनेक्ट व्हावे, त्यामुळे तशा भाषेत डायलॉग लिहिले आहेत. फक्त हनुमानाबद्दलच का बोलले जात आहे? भगवान श्रीरामांच्या संवादांवरही बोलले पाहिजे. माता सीतेचे संवाद जिथे ती आव्हान देते त्याबद्दल बोलले पाहिजे,” असंही ते म्हणाले.
दिग्दर्शक ओम राऊत यांना ‘तुम्ही रामायणची अॅक्शन फिल्म बनवली आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ओम राऊत म्हणाले, , “रामायण खूप मोठे आहे. त्यामुळे ते कुणालाही समजणे शक्य नाही. जर कुणी म्हणत असेल की त्यांना रामायण समजतं तर ते मुर्ख आहेत किंवा ते खोटं बोलत आहेत. आम्ही आदिपुरुषला रामायण म्हणत नाही. आम्ही त्याला आदिपुरुष म्हणतोय. कारण तो रामायणमधील एक छोटा भाग आहे. आम्ही यात युद्धकांड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. युद्धकांडमध्ये ते पराक्रमी आणि पराक्रमी राम आहेत.”
92 Total Likes and Views