शिंदेसाहेब, ही जाहिरात तयार करणाऱ्याला ‘महाराष्ट्र-भूषण’ द्या!

Editorial
Spread the love

सध्या महाराष्ट्र ताण-तणावाखाली आहे. राजकीय तणाव आहे. सामाजिक तणाव आहे. मानसिक तणाव आहेच… शहरांत वाहतूक कोंडी आहे. चार-चार पाच-पाच तास वाहतूक कोंडीत जीव गुदमरत आहे. प्रवास लवकर व्हावा म्हणून महामार्ग झाले. पण, या महामार्गावर एका टँकरला आग लागते… आणि मुंबईच्या बाजूला चार तास आणि पुण्याच्या बाजूला चार तास वाहतूक ठप्प राहते…. प्रवास करणारे वृद्ध, रुग्ण, डायबेटीसवाले, या सर्वांच्या हालाला सीमा नाही. नाशिकला जायला पाच-सहा तास लागताहेत…. पुण्याची स्थिती तीच झाली आहे. बाजारात महागाई आहे. बेरोजगारी तर भरपूर आहे. रोजगार नाही ते तरुण टपोरीपणाकडे वळत आहेत…. धमक्या सुरू आहेत… मधून मधून दंगली घडवल्या जात आहेत. हे सगळे का होते आहे…. कोण करते आहे…. कशाकरिता करते आहे… याची चर्चा सगळे करताहेत… सगळ्यांना उत्तरं माहिती आहेत… पण, ‘सहन करता येत नाही… आणि बोलताही येत नाही’…. इतक्या तणावाखाली लोकं आहेत…. कांद्याला भाव नाही म्हणून शेतकऱ्यांना कांदा फेकून द्यावा लागला. टोमॅटोला भाव नाही म्हणून टोमॅटो उत्पादकांची हालत खराब आहे. तिकडे विदर्भात तर आता खरिपाच्या कापूस पेरणीचा हंगाम समोर आला आहे. पण, गेल्यावर्षीचा कापूस कास्तकाराला घरात भरून ठेवावा लागला आहे. त्या गरिब कास्तकराची घरे म्हणजे महाल नव्हेत…. खोल्या- दोन खोल्यांची कौलारू बैठी घरे.. त्यात चुली पेटवणे… घराच्या बाहेर पाणी तापवायला चुलाण टाकणे… श्रमणारा शेतकरी विडी-काडी ओढणारा… भरून ठेवेलेल्या कापसाला आग लागण्याची एवढी भिती असताना आज भाव मिळेल… उद्या भाव मिळेल म्हणून वाट बघत हजारो शेतकरी घरात बसलेत… अवकाळी पावसाने नुकसान करूनच टाकले आहे. सरकारच्या ते गावीसुद्धा नाही. मदतीच्या घोषणा वृत्तपत्रांच्या पानावर राहिल्या. प्रत्यक्ष किती मदत पोहोचली… घोषणांपर्यंतच थांबली. आज विदर्भात अशी स्थिती आहे की, तीन हजारांच्या खाली कापसाचा भाव पडला आहे. सरकारची योजना कागदावर आहे. एक काळ असा होता की, नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘एकाधिकार कापूस खरेदी’चा दबदबा होता. आज ती योजना कागदावरच राहिली आहे. पडलेल्या भावात कापूस विकायला शेतकरी तयार नाहीत… ६ हजार रुपये भाव मिळणे शक्य नाही… कोणी देतही नाही… कारण शेतकऱ्याच्या बाजूने बोलणारे आहे कोण? सरकारला सध्या गतिमान जाहिराती करण्यात इतका वेळ चालला आहे की, मुख्य प्रश्न सगळे बाजूला पडलेले आहेत. लोकांच्या जीवन-मरणाचे प्रश्न आहेत. त्याकडे पहायला वेळ नाही… ‘सरकार आपल्या दारी’ आल्याची घोषणा आहे. पण, सगळे लक्ष आकडेवारी अाणि टक्केवारीत आहे. किती टक्के मतं कोणाला आहेत…. आणि कोण पुन्हा पंतप्रधान आणि कोण पुन्हा मुख्यमंत्री… याचे हिशेब पान-पान जाहिराती करून झळकवले जात आहेत. सध्या खूष आहेत ती वृत्तपत्रे. कारण शिंदे सरकार आल्यापासून जाहिरातींना तोटा नाही…. रोज एक ‘गतिमान’ जाहिरात पहिल्या पानावर पूर्ण पान….आणि सर्वच वृत्तपत्रांना…. अगदी ‘सामना’सुद्धा. शिंदे उदार आहेतच…. पेपरवाल्यांमध्ये तरी कोणीच नाराज नको… मिडिया खूष…. पेपरवाले खूष…. पेपरवाल्यांना तर शिंदे सरकार पर्वणीच ठरली आहे. या व्यवसायात आयुष्य घालवले आहे…. त्यामुळे थोडीशी माहिती आहे…. पहिल्या ‘गतिमान’ पानाचे दर ….. मग थोडी गती कमी झालेल्या दोन नंबर पानावर आणि नंतर तीन नंबर पान…. मग बातमी वाचायची सुरुवात पान नंबर तीन किंवा चार…. मग तिथेही बातम्या काय…? याला धमकी… त्याला धमकी… या पाच मंत्र्यांना काढाचा आदेश… मग मंत्रीमंडळ विस्तार… राजकीय बातम्यांनी वाचक कंटाळून गेला… त्याचे प्रश्न इतक्या ऐरणीवर आलेले आहेत की, ते कोणते प्रश्न आहेत…. हे समजण्याच्या पलिकडे सरकार निघून गेले आहे,… असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हते.
महाराष्ट्रातील नगरपालिका आणि महापालिका निवडणुका, मे २०२४ मधील लोकसभा निवडणूक आणि अॅाक्टोबरमधील विधानसभा निवडणूक, या पैकी कोणत्याही निवडणुकीचा काही पत्ता नाही. लोकसभा निवडणुका झाल्याशिवाय महापालिकेच्या निवडणुका तर होणारच नाहीत. लोकसभेच्या बरोबर विधानसभेची निवडणूक होऊ शकेल… पण, लोकसभेची निवडणूक मे महिन्यात होईलच, हेही कोणाला ठामपणे सांगता येणार नाही. कारण राजकारण आता एवढे निसरडे आहे की, आजचं उद्या खोटं ठरतं… आणि उद्याचं परवा भलतच काहीतरी होऊन जातं…
या सगळ्या मनस्तापात थोडासा तणाव कमी व्हावा म्हणून आणि विरंगुळा व्हावा म्हणून मंगळवा दिनांक १३ जून रोजी एक छान जाहिरात आली… सर्वच वृत्तपत्रांत पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली. शिंदे शिवसेनेच्या वतीने ती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील जनतेचे खूप-खूप आभार मानले आहेत. जाहिरातचे शिर्षक इतकं मोठं आहे की, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ‘अमूक विजयी आणि तमूक विजयी’, अशी जशी हेडलाईन असते… तशा थाटात ती जाहिरात आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी…. महाराष्ट्रात शिंदे’ एखाद्याला वाटेल निवडणूक कालच झाली आणि आजच निकाल लागला….. अर्थात ही जाहिरात ज्या कोणाच्या सुपिक डोक्यातून निघाली… (प्रसिद्धीपूर्वी ती छापण्याला मंजुरी घेण्यातच आलीच असेल…) त्या माणसाच्या सुपिक डोक्याची कमाल आहे… इंग्रजी किंवा मराठी वृत्तपत्राने हा माणूस शोधून काढून त्याला भल्या मोठ्या पगारावर त्यांच्या त्यांच्या वृत्तपत्राचा जाहिरातप्रमुख म्हणून ताबडतोब घेवून टाकावे.
जाहिरात वाचल्यानंतर ताण-तणाव असलेल्या महाराष्ट्राला एकदम हलकं वाटलं… कारण जाहिरातीतच सांगून टाकले आहे की, एका नागरिक पाहणीत असा कौल मिळाला आहे की, भारतीय जनता पक्षाला ३०.०२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. आणि शिंदे शिवसेनेला १६.०२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. या दोघांची एकत्रित मतं ४६.०४ टक्के आहेत. खाली आणखीन एक मस्त मजा आहे… काय डोकं आहे त्या माणसांच…. एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्रीपदी पुन्हा आणायचे आहे आणि त्याला महाराष्ट्रातील २६.०१ टक्के लोकांची पसंती मिळालेली आहे…. त्यापुढे आणखीन एक मजा आहे… देवेंद्रजी फडणवीस यांना २३.०२ टक्के मतदारांनी मुख्यमंत्रीपद देवून टाकलेले आहे. या दोघांची एकत्रित बेरिज करून ४९.०३ दाखवलेली आहे. त्याचे दोन वेगळे अर्थ आहेत…
१) एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील ७४.९९% मतदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी पसंती नाकारलेली आहे….
२) ‘मीच पुन्हा येईन…’ असा छान राजकीय संदेश नेहमी देणारे बिचारे देवेंद्र फडणवीस यांना ७६.९८% मतदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी पसंती नाकारलेली आहे.
जाहिरातीत दोघांच्या मुख्यमंत्रीपदाची बेरिज करून ती ४९.०३ % अशी दाखवली आहे. म्हणजे राहिलेल्या ४९.०७% लोकांनी दोघांनाही नापसंती दिली आहे.
ज्यांचे गणित कच्चे आहे, त्यांनासुद्धा हे गणित पटकन समजून आले. मुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूरला दौऱ्यावर निघणारे देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी लवकर उठून… तयार होऊन चहा घेता घेता पहिल्या पानावरची जाहिरात बघितली आणि त्यांची तब्बेत बिघडली, अशी जोरदार बातमी सगळीकडे पसरली. त्यांनी कोल्हापूरला जाणे रद्द करून टाकले. त्याची कारणं दोन असावीत….
एक तर मुख्यमंत्रीपदाच्या परिक्षेत फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे यांना २.०९ टक्के लोकांनी अिधक पसंती दाखवली आहे. त्यामुळे ‘पुन्हा मीच येईन’ मध्ये ही दोन टक्क्यांची अडचण येवून उभी राहिली! आता हा दोन टक्क्यांचा फरक पंतप्रधान मोदीसाहेब किंवा अिमत शहा हे भरून काढतील… एवढी एकच आशा आहे. तसं झालं तर मग शिंदेसाहेबांचे काय? असाही प्रश्न आहे. जाहिरात तयार करणाऱ्याने सगळ्या महाष्ट्रालाच चक्रावून टाकलेले नाही तर, मोदी-शहा हे सुद्धा इतक्या जबरदस्त डोक्याच्या माणसाचं कौतुक करत असतील… आजपर्यंत अनेक पक्षांत सल्लागार म्हणून काम करणारे प्रशांत किशोर यांचा दबदबा होता… ते कधी काँग्रेसकडे जायचे… कधी दुसऱ्या पक्षांना सल्ला द्यायचे…. ममता बॅनर्जी यांच्याकडेही ते सल्लागार म्हणून होते… फुटबॅाल हातात घेवून प्रचारसभेला जा… हा त्यांचाच सल्ला होता. पण, हे सगळे सल्ले या जाहिरातवाल्याच्या डोक्यापुढं काहीच नाहीत…. त्यामुळे संबंध महाराष्ट्रात अशी काही खळबळ झाली की, दुसऱ्या दिवशी लगेच झी टीव्हीचा आधार घेवून जनेतेच्या चरणी माथा टेकला गेला… आणि महाराष्ट्राचा जयजयकार करून जनतेच्या मनातील महायुतीचे आपले सरकार, अशी जाहिरात झळकली… वरच्या रांगेत मोदी- शहा- बाळासाहेब ठाकरे- आनंद दिघे यांचे फोटो आणि खालच्या रांगेत भाजपाच्या एकाही मंत्र्याचा फोटो नाही.. ज्या पाच मंत्र्यांना काढा… मग मंित्रमंडळाचा विस्ताराची परवानगी, अशा अमित शहा यांच्या नावाने ज्या बातम्या आल्या त्या पाच मंत्र्यांसकट शिंदे गटाच्या नऊ च्या नऊ मंत्र्यांचे फोटो…. आता शिंदे यांच्या मंत्रिमंडळात जे भाजपाचे मंत्री आहेत, त्यांना क्षणभर असे वाटेल की, आपल्याला वगळून टाकले की काय…! म्हणून त्यांनी धडाधड फडणवीस यांना फोन लावले… आता पुन्हा दोन दिवसांत सगळ्या मंत्र्यांच्या छायाचित्रासह जाहिरात येवू शकते… भाजपामधील कुणीतरी चाणाक्या ने तसाही सल्ला दिला असेल…. गतिमान सरकारला रोज एक पानभर जाहिरात द्यायची अशी काही सवय झाली आहे…. की, आता सकाळी उठल्यावर सरकारची ‘गतिमान’ जाहिरात जर नसेल तर अनेक मंत्र्यंना चहाचा घोट घेणे कठीण होऊन बसले आहे….
बाकी महाराष्ट्राचे ढीगभर प्रश्न कोणते का असेनात…. आणि ते किती काळ पडलेले असेनात… जाहिरात आणि घोषणाबाजी या दोन मुद्यांवर सरकार आणता येईल, अशी खात्री वाटल्यामुळेच सुपिक डोक्यांना हाताशी धरले गेले आहे.
पण आणखीन गंमतशीर बातमी होती… मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत अब्दुल सत्तारांना झापल्याची बातमी…. त्याच बातमीम खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता बोगस बियाणे वाटप होऊ नये याची चर्चा झाल्याची बातमी दिली गेली आहे. खरिपाच्या हंगामाची तयारी कृषीमंत्र्यांकडून एप्रिलपासून सुरू होते. विभागवार बैठका होतात… कृषीमंत्री आणि कृषी अधिकारी यांच्याकडून दोन महिने आधी पूर्ण आराखडा तयार केला जातो… पाऊस लांबला आहे… पण, ७ जून हा मृग नक्षत्राचा ठरलेला दिवस. त्या दिवसापासून पावसाची अपेक्षा… एप्रिल, मे ऐवजी खरिप हंगामाची चर्चा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात १३ जूनला झाली. सरकारच्या ‘गतिमान’ जाहिरातीचाहा एवढा परिणाम फारच गमतीचा वाटला. कृषीमंत्र्यांनाच त्याची काही माहिती नाही. आणि जाहिरात, उद्घाटने, देवदर्शने यामध्ये सरकारला वेळ नाही. अशी सगळी महाराष्ट्राची आजची दैना असताना मतदानाच्या टक्केवारीचे वाटपसुद्दा होवून गेलेले आहे. प्रसिद्ध झालेल्या टक्केवारीप्रमाणे मोदीसाहेब पंतप्रधान होणार, हे ठरून गेले आहे. शिंदेसाहेब मुख्यमंत्री होणार, हे ठरलेले आहे… आता अिमत शहा आणि फडणवीस या दोघांचाच प्रश्न शिल्लक आहे… बाकी लोकांच्या प्रश्नाबद्दल जाहिरातीत कधी चर्चा होत नसते… एकूण ही धमाल जाहिरात आहे. जाहिरात तयार करणारे… त्याला मान्यता देणारे…. त्या जाहिराती छापणारे… त्या जाहिरातीचे लोखो रुपयांचे पेमेंट करणारे… आणि त्या जाहिराती वाचणारे सगळेच कसे धन्य झालेत.. कारण दोन लोकांची निवडणूक झाली आणि त्यांची पदं पण जाहीर झाली. बाकीच्यांचा प्रश्न हळूहळू सोडवता येईल. त्यामुळे बाकीच्यांनी घाई करू नये…
१३ जूनच्या वृत्तपत्रांतील जाहिरात तयार करणाऱ्या सुपिक डोक्याला ‘महाराष्ट्र-भूषण’ पुरस्कार द्यायला काहीच हरकत नाही. बाकी कोणाला दिला नाहीत तरी चालेल… पण, अशी जाहिरात आजपर्यंत कुणी करू शकले नाही. या विक्रमाबद्दल त्याचा सन्मान व्हायलाच पाहिजे. आणि तो सन्मान ‘महाराष्ट्र-भूषण’ या पुरस्काराखेरिज कशाने होणार आहे?
सध्या एवढेच📞9892033458

– मधुकर भावे

 109 Total Likes and Views

0 Comments

No Comment.