महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार नावाच्या तरुणीचा खून झाल्याचे उघड झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. चार दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिचा मित्र राहुल दत्तात्रेय हंडोरे याला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून रात्री अटक केली. मित्र एवढा क्रूर वागू शकतो? काय गुन्हा होता दर्शनाचा?
दर्शनाचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरल्याने तिचा तीक्ष्ण हत्याराने आणि दगडाने वार करून खून केल्याची कबुली राहुल याने पोलिसांना दिली आहे. समाजमन सुन्न आहे. माणुसकी, मैत्री….सर्वांवरचा विश्वास उडावा असा हा मामला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना दत्तू पवार (वय २६, रा. न-हे, मूळ कोपरगाव, जि. अहमदनगर) हिचा मृतदेह किल्ले राजगडच्या पायथ्याशी १८ जून रोजी आढळून आला होता.शवविच्छेदन अहवालात डोक्यावर आणि अंगावरील मारहाणीच्या जखमांमुळे दर्शनाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
दर्शना ही नगर जिल्ह्यातील कोपरगावची तर राहुल हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातला. ते दोघे लहानपणापासूनचे मित्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देत होते. दोघे लग्न करणार होते अशी माहिती आहे. राहुल स्पर्धा परीक्षेच्या तयारीसह फूड डिलिव्हरी सर्विसमध्ये काम करीत होता. त्याने परीक्षेपूर्वी तिच्याशी ब्रेकअप केले होते. दर्शनाची लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली. त्यानंतर राहुल पुन्हा लग्नासाठी तिच्या मागे लागला होता. दरम्यान, दर्शनाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी जमवल्याने राहुल अस्वस्थ होता. त्याने थोडा वेळ मागितला. परंतु दर्शनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, दर्शना ९ जून रोजी पुण्यात एका खासगी अकॅडमीतर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी आली होती. ती संधी त्याने साधली. १२ जूनला ती राहुलसोबत सिंहगड आणि राजगड किल्ला फिरण्यासाठी दुचाकीवर गेली होती. पुढे दर्शनाचा फोन लागेना. नातलग पोलिसात गेले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दर्शना आणि राहुल दोघे सकाळी सव्वासहा वाजता किल्ले राजगडावर जाताना एकत्रित दिसत होते. परंतु परत येताना पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास तो एकटाच दिसून आला होता. त्यामुळे राहुल याच्यावर संशय बळावला होता. दर्शनाला संपवल्यानंतर राहुल तब्बल १० दिवस पोलिसांना चुकवत फिरला. मोबाईल लोकेशनवरून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर तो सापडला. त्याने दर्शनाला मारल्याचे कोणी पाहिले नाही. पण त्याने दर्शनाला मारल्याचे कबूल केले आहे. त्याला शिक्षा होईलही. पण दर्शना परत मिळेल? तिच्या आईचा आक्रोश सुरु आहे. ‘मला त्याचे तुकडे करू द्या’ असे ती आईची माया म्हणते आहे. भाऊ म्हणतो, ‘आमच्या ताब्यात द्या. नाहीतर मारून टाका त्याला.’ कसे सांत्वन करायचे ह्या मायलेकाचे?
दर्शनच्या हत्येने काही प्रश्नं निर्माण केले आहेत. एवढी गोड मुलगी वाचू शकली नसती का? लग्नाला घरून नकार आहे, राहुल तणावात असेल हे हेरून दर्शनाने त्याच्यासोबत जायलाच नको होते का? जायचे तर किल्ला टाळायला हवा होता. दर्शना विश्वासाने त्यांच्यासोबत गेली. इथेच त्याने दगाबाजी केली. हे वयच मोठे धोकेबाज असते. ‘मेरी नही, तो किसकी भी नाही’ अशाच विचाराने राहुलमध्ये राक्षस संचारला असणार. अशा प्रकरणात समुपदेशन नावाचा प्रकार उपयोगी ठरतो. राहुलच्या जवळच्या नातलगांनी, मित्रांनी त्याला समजावून सांगितले असते तर दोघांचेही आयुष्य सावरले असते. आज काय झाले? करिअरची काय काय स्वप्नं रंगवली असेल त्या दोघांनी? मात्र दर्शना गेली आणि राहुल जगुनही आयुष्यातून उठला आहे.काही वर्षांपूर्वी दिल्लीची निर्भया थोड्या वेगळय प्रकरणात मारली गेली तेव्हा ‘दुसरी निर्भया नको’ म्हणत लोक मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर आले. पण निर्भया होणे थांबलेले नाही. हायफाय सोसायटीत असले अघोरी प्रकार चालायचे. पण आता ही बिमारी मराठमोळ्या घरांमध्येही घुसली आहे. शिकलेली पोरं हैवान होताना दिसत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे तर स्वैराचार वाढला आहे. अतिशय क्रूर पद्धतीने मैत्रिणींना मारले जात आहे. तुकडे करून कुकरमध्ये शिजवले जात आहे. कसं वाचवायचं ह्या पोर-पोरींना?
60 Total Likes and Views