मणिपूर जळणे-जाळणे !

Editorial
Spread the love

 ६० आमदारांचे पूर्वोत्तर राज्य (north-east) मणिपूर येथील माणुसकी मारली जातांना किंवा मरत असतांना प्रधानमंत्री यांनी यावर, व्यक्त होऊ नये. लाभ-तोट्याचा विचार करावा.
यापेक्षा भयंकर काय असू शकते ?

      शिवाय, या महान देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती अशी आदरणीयता असतांना, मणिपूर जळसंहारात ठोस मुद्दा ‘आदिवासी’ हाच आहे.
अशा संवेदनवेळी महामहिम गप्प असणे !

      राजकारण-सत्ताकारण डोक्याच्या किती वर गेले आहे याचे हे संकेत समजावे.

      मणिपूर राज्याचा नव्वद टक्के भाग डोंगराळ आहे. खळाळणाऱ्या नद्या, कोसळणारे धबधबे, रंगबेरंगी फुले, सर्वत्र हिरवाई याचमुळे इंग्रजांनी मणिपुरला भारताचे स्वित्झर्लंड म्हटले.
असा हा सुंदर-शांत प्रदेश इतका अशांत का झाला असेल ?

      इथले मूळचे वहिवाटी, मैतेई व कुकी हेच परस्पराचे शत्रू झाले आहेत. आता त्याची अनेक कारणे सांगितली जातात.
पण ‘बहुसंख्यावाद’ व ‘द्वेष’ हे या नवनिर्मित शत्रूतेचे प्रमुख कारण आहे.ही दोन कारणे अलीकडे सत्ताप्राप्तीची आवडती माध्यमे झाली आहेत.

      गेल्या काही वर्षांत संघाने पूर्वोत्तर राज्यात विशेष लक्ष दिले. त्यानंतर आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि मणिपूर या सातही पूर्वोत्तरी राज्यातील जीवनरहाटीत बदल दिसत गेले. राजकीय चमत्कार आढळू लागले.
त्याच साखळीत मणिपूर घटना पाहता येईल.

कुकी हा जनजाती (ST) समूह आहे. ते धर्माने बहुसंख्य ख्रिस्ती आहेत.
मैतेई हे हिंदू आहेत. हिंदूतील खालच्या वर्गात मोडतात. या मैतेईंना जनजाती दर्जा हवा. गेल्या ९-१० वर्षांपासून ते मागणी करीत आहेत. संख्येने अधिक आहेत. सधन आहेत.
मणिपुरातील एकूण ६० विधानसभा क्षेत्रपैकी ४० वर मैतेईंचा प्रभाव आहे.
त्यातुलनेत कुकी संख्येने कमी आहेत. ते पहाडी भागात राहतात.  कुकी आणि नागा यांचा उर्वरित २० विधानसभा जागांवर प्रभाव आहे. नागा ही सुद्धा जनजाती आहे.

      मणिपुरातील पर्वतीय भागातील जमीन, गैरजनजातीय समूह विकत घेऊ शकत नाही असा कायदा आहे.

      मैतेई जनजाती नाही. पण त्यांना पर्वतीय जमीन घ्यायची आहे. इथे ठिणगी पडली. (की पाडली). त्यासाठी मैतेईंना जनजाती दर्जा हवा. मागणी सुरू झाली.

      नव्या मागण्या, नवा भारत या ९-१० वर्षातच घडलाय, हे विशेष !

      कोर्ट-कचेरी सुरू झाल्या. तशात मणिपूर उच्च न्यायालयाने गेल्या २७ मार्चला मैतेईंच्या सोयीचा निकाल दिला.
त्यातून आलेल्या प्रतिक्रियेतून या भीषणाचा प्रारंभ झाला.

      ३ मे पासून हिंसकता इथे सुरु आहे.आज नियंत्रणात वाटत असली तरी आतल्या आत धुमसत आहे. इंटरनेट सेवा बंद आहे.
आतापावेतो या भीषणात, १०० जणांचा बळी गेला. घरे जाळण्यात आली. वाहने जाळली. धार्मिक स्थळे विद्रूप केली. हजारो विस्थापित झाले.
नुकसान, क्षती दोन्ही बाजूने झाली.

      करण थाफर या वरिष्ठ पत्रकारांनी यासंबंधी एका महिलेची जी मुलाखत घेतली,
तीत त्या म्हणतात .. How dare you keep silent … Mr. Prime Minister. How can you keep silent ? We the people of Manipur are crying … This is not our India.

वाक्ये … चरर चीरत जातात !

० रणजित मेश्राम

 93 Total Likes and Views

0 Comments

No Comment.