वाईट बातमी आहे. समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजाजवळ खासगी बसला मध्यरात्रीनंतर अपघात होऊन लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ८ प्रवासी कसेबसे वाचले. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस नागपूरहून पुण्याला निघाली होती.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच घटनास्थळी धावले. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५-५ लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. पण गेलेले जीव ह्या पाच लाखात परत थोडीच येणार? ५५ हजार कोटी रुपये खर्च करून राज्य सरकारने नागपूर-मुंबई असा हा ७०० किलोमीटरचा चिकना रस्ता बांधला आहे. अवघ्या ८ तासात नागपूरहून मुंबईला जाता येईल असे सांगून सरकारने ह्या वेगवान महामार्गाचा खूप उदोउदो केला. पण आता समृद्धी महामार्ग हा ‘शापित महामार्ग’ झाल्याचे विरोधक म्हणू लागले आहेत. समृद्धी सुरु होऊन वर्ष झाले. पहिल्या दिवसापासून ह्या महामार्गावर अपघात होत आहेत. आतापर्यंत ३५० अपघात झाल्याची माहिती आहे. ह्यात मेलेल्या आणि जखमींचा आकडाही मोठा आहे. वेगाने वाहन चालवण्याची मुभा ह्या रस्त्यावर आहे आणि तीच गोष्ट अपघातांना कारण ठरत आहे. रस्ता जागतिक दर्जाचा आहे. मात्र त्यावर लोकल लेव्हलची वाहने धावणार असतील तर गडबड होणारच. गाड्यांचा फिटनेस कोण तपस्तेय? आरटीओ काय करताहेत? अजूनही वेळ गेलेली नाही. ह्या महामार्गावर वाहन हाकण्याची कमाल वेगमर्यादा ताशी फक्त ८० किलोमीटर ठेवा. म्हणजे अपघातांना काही प्रमाणात आळा बसेल.
रस्ता चांगला आहे. गाडी फिट आहे तर हा ताजा अपघात झालाच कसा? पोलिसांनी सांगितले, की ही बस आधी समृद्धी महामार्गावरील वीजेच्या खांबाला धडकली. धडकेनंतर बस पुढे आल्यावर डिझेल टँक दुभाजकाला लागला. यामुळे डिझेल टँक फुटला. पुढे बस दुभाजकाला घासत गेली आणि त्यामुळे बस उलटी होऊन आग लागली.
“या बसमध्ये एकूण ३३ लोक होते. यापैकी ८ जणांना बसच्या काचा फोडून बाहेर पडता आलं. बसमध्ये दोन चालक होते आणि एक क्लिनर होता. यापैकी एका चालकाचा मृत्यू झाला आहे. जो चालक बस चालवत होता तो सुखरुप आहे.
संकटात शातृहू मदतीला धावतात असे म्हणतात. पण इथे याच महामार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली. अपघातग्रस्तांची वेळीच मदत केली असती, तर आणखीही जीव वाचले असते, असा दावा घटनास्थळी बचावकार्य करणाऱ्या काहींनी केला आहे. आपल्या डोळ्यांदेखतच एका बाळाचा जळून मृत्यू झाल्याचंही एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितलं आहे.
अपघातानंतर बसच्या मागील बाजूच्या खिडकीच्या काचांवर हात आपटून काही प्रवासी मदतीसाठी गयावया करत होते. पण आजूबाजूने जाणारे इतर वाहन चालक मदतीसाठी थांबले नाहीत, असा दावाही काही प्रत्यक्षदर्शींनी केला.
या घटनेचा थरार सांगताना प्रत्यक्षदर्शींना अक्षरश: रडू कोसळलं. एक म्हणाला, आम्ही काही लोकांना वर काढण्याचा प्रयत्न केला. पण गाडीने पेट घेतल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नव्हते. सुरूवातीला थोडा थोडा जाळ सुरू होता. पण त्यानंतर लगेच गाडीचा मोठा स्फोट झाला आणि गाडीचे काही पार्ट आजूबाजूला उडून पडले. आतमध्ये असलेले लोकं मोठ्याने आरडाओरडा करत होते. कुणी काचेवर मोठ्याने मारत होते, त्यांना वाटत होतं खिडकीची काच फुटेल. पण काच फुटली नाही.
“खूप भयंकर परिस्थीती होती, आम्ही आमच्या डोळ्यांनी लोकांना जळताना पाहत होतो, पण तरीही आम्ही काही करू शकत नव्हतो. लहान बाळ जळालेलं पाहून आमच्या अंगावर शहारे आले. जे लोकं गाडीतून वाचले होते तेही गाडीच्या मागे आणि पुढे धावले. जो शेवटचा व्यक्ती बाहेर आला त्याने सांगितलं की, मी गाडीतून बाहेर पडलो त्यावेळी गाडीचा स्फोट झाला.
सरकारने हा अपघात गंभीरपणे घेतला नाही तर हा मार्ग ‘श्रद्धांजली महामार्ग’ म्हणून ओळखला जाईल.
63 Total Likes and Views