महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मारावबाबा आत्राम, संजय बनसोडे, दिलीप वळसे-पाटील अशा एकूण राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शपथ घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार होणार असल्याची चर्चा असताना मध्येच अजितदादा घुसले आहेत. दोन दोन उपमुख्यमंत्री आता झाले आहेत. एका मयानीत दोन तलवारी राहू शकत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवले जाईल. मोदी सरकारचा विस्तारही लगेच होणार आहे. त्यावेळी फडणवीस यांना केंद्रात मंत्री म्हणून घेतले जाईल अशी चर्चा आहे.
ह्या बंडाला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक आणि महिला हे शरद पवार यांच्याबरोबर आहेत. आज जो शपथविधीचा कार्यक्रम पार पडला, तो ऑपरेशन लोटसचा भाग होता. त्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही.शपथ घेतली, तो त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभी करणार,” असे महेश तपासे यांनी सांगितलं आहे. याचा अर्थ अजितदादा हे दुसरे “एकनाथ शिंदे’ झाले आहेत. शरद पवारांचा ‘उद्धव ठाकरे’ झाला असून ‘माझीच राष्ट्रवादी’ खरी असे म्हणण्याची वेळ काकावर पुतण्याने आणली आहे. हे होणारचं होतं. कर्नाटक निवडणुकीत मार खाल्ल्यानंतर राष्ट्रवादी फोडणे हा एकच पर्याय भाजपकडे उरला होता. अजितदादा खूप आधीपासून नाराज होते. त्यामुळे भाजपचे ऑपरेशन सोपे झाले. भाजपने चक्क विधानसभेतील विरोधी पक्षनेता फोडले. दादासोबत राष्टवादीच्या एकूण ५४ आमदारांपैकी ४० आमदार आले आहेत. मग उरलं काय?
काकापेक्षा पुतण्या भारी निघाला. प्रदेशाध्यक्षपद पाहिजे असे दाखवत अजितदादांनी गेली काही दिवस काकाला गुंतवून ठेवले होते. प्रत्यक्षात ते वेगळ्याच कामात होते. आज सकाळी देवगीरी बंगल्यावर अजित पवारांनी समर्थक आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर संबंधित आमदारांच्या सहीचं पत्र घेऊन अजित पवार राजभवनावर दाखल झाले. यानंतर काही वेळातच ब्रेकिंग न्यूज सुरु झाल्या.
अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. त्या नंतर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. शिंदे-फडणवीस सरकार आल्याला बरोब्बर एक वर्ष झाले असताना राष्ट्रवादी उभी फुटली आहे. तिच्या ९ मंत्र्यांना घ्यावे लागल्याने मंत्री व्हायच्या प्रतीक्षेत असलेल्या शिंदे गट-भाजपच्या काही आमदारांच्या पदरी निराशा येऊ शकते.
640 Total Likes and Views