जन्मशताब्दी बाबूजींची…

Analysis
Spread the love

बघता-बघता आमच्या बाबूजींची (जवाहरलाल दर्डा)  जन्मशताब्दी जवळ आली. सोमवार, दि. २ जुलै १९२३ ते रविवार, दि. २ जुलै २०२३…  शंभर वर्षे होतील.      त्यांच्यासोबत आयुष्यातील उमेदीची २४ वर्षे राहता आले. त्यांच्यासोबत काम करता आले… त्यांना अनुभवता आले… शिकता आले… एक मुद्दा प्रथमच मांडतो. बाबूजींच्या मनाचा मोठेपणा, त्यांची कर्तबगारी महाराष्ट्राला पूर्णपणे समजलीच नाही, असे मला वाटते. राजकारणात आरोप- प्रत्यारोप होतात…. पण, बाबूजींच्या तोंडून २४ वर्षांत मी कोणाहीबद्दल एकही अपशब्द उच्चारलेला ऐकला नाही. त्यांचे सूत्र होते की, ‘आपल्यावर टीका झाली म्हणजे आपलं काम उत्तम चालले आहे. असं समजायचं’
आयुष्यात योगायोग असतात. मी मूळचा ‘मराठा’च्या आक्रमक परंपरेतील एक छोटा पत्रकार. आचार्य अत्रे यांनी मला घडवले. १९७४ साली अत्रेसाहेबांच्या खोट्या मृत्यूपत्र प्रकरणामुळे आणि तीन वर्षे कोर्टबाजीमुळे, डाव्या कम्युनिष्टांनी घडवलेल्या कामगारांच्या संपामुळे, जे  आर्थिक संकट आले त्यातून महाराष्ट्र बँकेचे कर्ज होवून नाईलाजाने लढाऊ ‘मराठा’ बंद करावा लागला. त्यानंतर योगायोगानेच बाबूजींची भेट झाली. अगदी प्रसन्न मनाने म्हणाले, ‘माझ्यासोबत या… मिळून काम करू…’ मी मनातील शंका मोकळी केली… ‘मी मराठातला… तुमच्या वृत्तपत्राचं आणि माझं कसं जमेल?’ बाबूजी सहज म्हणाले, ‘जमलं तर बघू… तुम्ही मला सूट होता का, मी पाहतो… मी तुम्हाला सूट होतो का, तुम्ही बघा…’ वृत्तपत्राचे स्वत: मालक आणि संपादक असलेल्या व्यक्तीच्याकडून आलेले हे वाक्य त्यांच्या मनाची उंची दाखवून गेले. त्याचक्षणी बाबूजींनी मला जिंकल्यासारखे वाटले! त्यानंतर २४ वर्षांत त्यांच्याशी… त्यांच्या परिवाराशी… लोकमतशी कधी एकजीव होऊन गेलो, कळलेच नाही… सर्वप्रथमच हे खुल्या मनाने सांगतो की, लोकमत आणि दर्डा परिवाराने मला त्यांच्या घरातला आजपर्यंत सदस्यच मानले… बाबूजी, विजयबाबू, राजनबाबू, त्यांचे कुटंुबीय यांनी आणि पुढची पिढीसुद्धा… सर्वांनीच अत्यंत सन्मानाने वागवले. बाबूजी तर इतके समरसतेने वागायचे की, त्या माणसाचे विलक्षणपण अनेक पैलूंमध्ये आहे. त्यांच्यावर जन्मशताब्दी निमित्त  ‘बाबूजी’ हा गौरवग्रंथ करण्याची संधी मला मिळाली… गौरवग्रंथ किती जमला, माहिती नाही… पण माझ्या मनाचे समाधान झाले. ‘हा ग्रंथ मीच करावा’, ही माझी जिद्द होती.  कारण २४ वर्षे त्यांच्यासोबत होतो. गौरवग्रंथ निर्मितीकाळ कोरोनाचा होता. त्यातच पत्नी मंगलाचे दु:खद निधन झाले होते. २ जुलै २०२२ ला शताब्दी वर्षाच्या सुरुवातीला गौरव ग्रंथाचे प्रकाशन करायचे होते. या सगळ्या अडचणींत गौरवग्रंथ गेल्यावर्षी यवतमाळ येथे २ जुलै २०२२ला  प्रकाशित झाला. विजयबाबू, राजनबाबूंनी मोठा समारंभ केला. माझ्या हस्ते वृक्षारोपण करून माझा सन्मानही केला.
बाबूजींवर लिहिताना किती लिहायचे आणि काय लिहायचे… गौरवग्रंथ ३१८ पानांचा झाला. तरी बाबूजी लिहावयाचे शिल्लक राहिलेत, असेच वाटते. आता एवढ्याशा लेखात ते कसे मावणार…. २ जुलै २०२३ रोजी जन्मशताब्दी दिवशी, लोकमत सहसंपादिका अपर्णा वेलणकर आणखीन एक गौरवग्रंथ प्रकाशित करीत आहेत, असे समजले. त्याचे स्वागत…. तो  गौवरग्रथ चांगलाच असेल… बाबूजींवर जेवढ्या बाजूंनी लिहिले जाईल, त्या प्रत्येक संपादकांकडून बाबूजी अधिक माहिती होतील… हे चांगलेच आहे.  पण,  या छोट्याशा लेखात बाबूजी उभे करताना दोन-तीन मुद्दे प्रथम मांडतो…
बाबूजींनी सुरू केलेले ‘लोकमत’ साप्ताहिक १९५२ साली यवतमाळ येथून सुरू केले. त्यावेळचे यवतमाळ कसे असेल? ‘लोकमत’ हे नाव लोकमान्य टिळक यांनी वणी येथील सभेत बापूजी आणे यांना  १९१८ साली सुचवले. लोकनायक बापूजी आणे यांनी १९१८ साली लगेच हे साप्तािहक सुरू केले. काही वर्षांनी स्वातंत्र्य चळवळीत बापूजी आणे तुरुंगात गेल्यावर १९३२ साली साप्ताहिक बंद पडले. १९५२ साली बापूजींकडून बाबूजींनी ते साप्ताहिक घेतले. बापूजींनी फक्त शब्द मागितला की, ‘रॅायल्टी नको, राष्ट्रीय बाण्याने वृत्तपत्र चालवेन, असा शब्द दे….’ बाबूजींनी तो शब्द दिला. आणि शब्दश: तो पाळला. लोकमतचे पहिले वैशिष्ट्य काय? जगातील हे पहिले साप्ताहिक… नंतर दैनिक… जे प्रथम आडवळणाच्या गावात सुरू होऊन नंतर महाराष्ट्रातील सर्वच शहरांत पोहोचले. मुंबई-पुण्याची आजची सर्व वृत्तपत्रे त्या-त्या शहरात सुरू झाली  आहेत. आणि मग खेड्यात गेली. ‘लोकमत’चा चमत्कार वेगळा. ‘लोकमत’ खेड्यातून शहरात गेले. तिथं पहिला नंबर ‘लोकमत’चा… आणि आता वाचकांनी ‘लोकमत’ला महाराष्ट्रभर स्वीकारले… हा दुसरा चमत्कार… चिपळूणच्या स्व. नाना जोशी यांनी तालुका पातळीवर ५० वर्षांपूर्वी ‘सागर’ दैनिक काढून विक्रम केला आहे…. तोही मोठ्या कर्तबगारीचाच भाग. नानांच्या दु:खद निधनानंतर त्यांच्या पत्नी शुभदावहिनी त्याच जिद्दीने ‘सागर’ चालवत आहेत, ते ही अभिनंदनीय…
बाबूजींनी केवळ आणि केवळ निर्धाराच्या जोरावर ‘लोकमत’ला महाराष्ट्रात क्रमांक एकवर नेले. राजकारणात ते ठामपणे काँग्रेसवाले असले आणि आयुष्यभर काँग्रेसबरोबर राहिले तरी, वृत्तपत्र चालवताना ते पहिल्याप्रथम वाचकांबरोबर राहिले. एक किस्सा सांगतो… यशवंतराव चव्हाणसाहेबांनी काँग्रेसच्या प्रचारासाठी पुण्यातून ‘विशाल-सह्याद्री’ हे दैनिक ३० मे १९५८ ला सुरू केले. अनंतराव पाटील यांच्यासारखा संपादक आणला. १ ऑक्टोबर १९८१ पर्यंत ते वृत्तपत्र कसेबसे चालवले.  मग बंद करावे लागले. नागपूरात ‘महाराष्ट्र’ या काँग्रेस विचाराच्या दैनिकाला यशवंतराव चव्हाणसाहेबांनी भरपूर आर्थिक मदत केली होती. दोन्ही दैनिकं चाललीच नाहीत… यशवंतराव बाबूजींना भेटले… ते म्हणाले, ‘दर्डाजी, ‘विशाल सह्याद्री’साठी आम्ही एवढे पैसे ओतले… चांगला संपादक आणला… आमचा पेपर चालत नाही… बंद करायची वेळ आली… तुमचा ‘लोकमत’ तुम्ही प्रभावीपणे कसा  चालवता? या मागचे रहस्य काय?…’ बाबूजी हसत म्हणाले, ‘चव्हाणसाहेब, रहस्य सांगायचं नसतं… तरी तुम्हाला म्हणून सांगतो… निवडणुकीच्या आगोदर आम्ही पाच वर्षांपैकी दोन महिने माझे वृत्तपत्र काँग्रेस पक्षाबरोबर असते… बाकी ४ वर्षे १० महिने आम्ही लोकांच्याबरोबर असतो… त्यांच्या प्रश्नांसाठी लढतो. विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही तेवढीच जागा देतो. वाजपेयींची सभा नागपूरमध्ये झाली तर ‘तरुण भारत’ जेवढी प्रसिद्धी देणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही देतो… अग्रलेखांतून त्यांच्या विचाराला विरोध करतो. कोणाचीही बातमी मारायची नाही… आणि बातमीत ‘बात’ असता कामा नये. आणि ‘मी’ असता कामा नये. हे पथ्य पाळतो.’  किती नेमकं उत्तर होतं! आणि हे केवळ यशवंतरावांच्या चर्चेतील शब्द नव्हते… बाबूजी सात-आठ वेळा मंत्री होते… वसंतदादा असोत… बॅ. अंतुले असोत… निलंगेकर असोत… शरद पवार असोत… सुधाकरराव नाईक असोत… बाबूजींना कोणी टाळू शकले नाही. त्या काळात बाबूजींकडे असलेल्या खात्याच्या विरुद्धसुद्धा ‘लोकमत’ने चुकीच्या धोरणांवर झोड उठवली. मी संपादक असताना एक विषय असा होता, मनाला वाटले, छापण्यापूर्वी बाबूजींशी एकदा बोलून घ्यावे… मुख्य वार्ताहर बडगेसाहेबांना सांगितले, ‘तुम्ही बाबूजींशी बोला….’ बडगेसाहेबांनी बाबूजींना विषय सांगितला… बाबूजी म्हणाले, ‘भावेसाहेबांना सांगा, बातमी सत्य असेल तर जरूर छापा… मी सरकारमध्ये आहे… ‘लोकमत’ सरकारमध्ये नाही…’ पत्रकार म्हणून बाबूजी समजून घ्यायला याच्यापेक्षा वेगळ्या उदाहरणाची गरज नाही. 
संपादक म्हणून बाबूजी प्रभावी असले तरी बाबूजींनी ‘लोकमत’ साप्ताहिकाचे पहिले संपादक म्हणून यवतमाळचे ख्यातनाम पत्रकार, साहित्यिक शरदचंद्र टोंगो यांना आणले. १९७१ साली नागपूरमधून दैनिक सुरू करताना, मुंबईच्या पां. वा. गाडगीळ साहेबांसारख्या ख्यातनाम पत्रपंडिताला बाबूजींनी ‘संपादक’ म्हणून नागपूरला नेले. गाडगीळ साहेबांना ‘सांभाळणे’ ही गोष्ट त्यापूर्वी कोणालाही जमली नव्हती. अत्रेसाहेबांच्या ‘नवयुग’चे गाडगीळसाहेब सहसंपादक  होते. मुंबईतील ‘लोकमान्य’ दैनिकाचे संपादक गाडगीळसाहेब होते. पण गुजराती मालकाशी गाडगीळसाहेबांचे जमले नाही. बाबूजींशी त्यांचा कधीही विसंवाद झाला नाही. त्याला बाबूजींचा समंजस स्वभाव जास्त कारणीभूत आहे. संस्था चालवताना कसे वागावे, कसं बोलावे, किती मोजून-मापून विषय मांडावा…,  हे सर्व बाबूजींकडून शिकावे. राजकारणात २४ तास बुडवून घेवू नये, नाटक- संगीत- चित्रपट- खेळ- निसर्ग- झाडे- पाने- फुले- शेती या सगळ्यामध्ये रमून बाबूजी पत्रकारितेत रमले. मंत्रीपदी राहिले. अनेक चांगली खाती जबरदस्त सांभाळली. उद्योगमंत्री असतानाचे ‘नागपूरचे बुटीबोरी’ हे उद्योगक्षेत्र बाबूजींचेच स्मारकच आहे. विदर्भात अनेक उद्योग बाबूजींनी आणले. हे सगळं असले तरी बाबूजींनी राजकारण अंगाला चिटकवून घेतले नाही. माणुसकी कधी सोडली नाही. मंत्री झाले म्हणून हूरळून गेले नाहीत. मंत्रीपदी नव्हते तेव्हा, कधी निराश झाले नाहीत. त्यांची जीवनदृष्टीच वेगळी होती. बॅ. अंतुलेसाहेबांच्या मंत्रीमंडळात बाबूजी उद्योगमंत्री होते. उद्योग खाते त्यांना मिळाल्यावर बाबूजींच्या घरी अनेक उद्योगांचे प्रमुख आणि त्यांच्या प्रतिनिधींची पुष्पगुच्छ घेवून गर्दी झाली. सगळा हॉल पुष्पगुच्छांनी भरला. चार वाजता गर्दी संपली. बाबूजी त्यांच्या सेवकाला म्हणाले, ‘हिराजी, हे सगळे पुष्पगुच्छ जवळच्या रुग्णालयात रुग्णांना नेवून शुभेच्छा दे…. यातला एकही पुष्पगुच्छ जवाहरलाल दर्डा यांचा नाही…. ते पुष्पगुच्छ उद्योगमंत्र्याचे आहेत… त्यातल्या अनेकांना मी ओळखतही नाही. सत्तेला वाहिलेले ते गुच्छ आहेत…’ सत्तेचे महत्त्व यापेक्षा नेम्ाक्या शब्दांत कोणालाही सांगता येणार नाही. त्यामुळेच सत्ता बाबूजींना कधीही चिकटली नाही.
आणखी एक दोन छान आठवणी आहेत… व्यक्तिगत जीवनातील मोठेपण हे सार्वजनिक जीवनातील मोठेपणापेक्षा मला अधिक महत्त्वाचे वाटते. बाबूजी समजायला हे दोन विषय पुरेसे आहेत. त्यांचे मन कसं निळ्याशार पाण्यासारखं तळापर्यंत दिसायचे, ते यातून समजून येईल.
बाबूजी मंत्री नसताना त्यांना एका सहाय्यकाची गरज होती. मुंबईतून त्यावेळी ‘लोकमत’ दैनिक प्रसिद्ध  होत नव्हते. ‘लोकसत्ता’मध्ये छोटी जाहिरात दिली. पाच-सहा माणसं मुलाखतीसाठी आली. त्यातील पाचजणांना बाबूजी दोन-दोन मिनीटं भेटले, बोलले… नंतर कळवतो म्हणून सांगितले. सहावा माणूस बाहेरच बसून होता. पाचजण गेल्यावर बाबूजी त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांना म्हणाले, ‘तुम्ही उद्यापासून काम सुरू करा…’ त्यांचे आडनाव होते ठिपसे…. ते म्हणाले, ‘दर्डासाहेब, आगोदरच्या पाचजणांना तुम्ही दोन-दोन मिनीटं प्रश्न विचारले… त्यांच्याशी बोललेत…  ते लोक निघून गेले.. माझ्याशी काही न बोलता तुम्ही मला काम सुरू करायला सांगत आहात…’ बाबूजी शांतपणे म्हणाले, ‘तुमच्या अंगावर खादीचे कपडे आहेत… तुम्ही माझ्या परीक्षेत पास झालेले आहेत… मला तेवढं पुरेसं आहे.’ त्यानंतर हे ठिपसे बाबूजींच्या सेवेत ७ वर्षे होते. (बाबूजी आयुष्यभर खादीचे कपडे वापरत होते.)
बाबूजींकडे मुंबईला स्वयंपाकी म्हणून किशन महाराज नावाचे एक ‘महाराज’ होते. ते मूळचे राजस्थानचे. बाबूजींकडे त्यांनी ३० वर्षे सेवा केली. उत्तम स्वयंपाक करायचे… निसर्ग नियमाने थकले.. निवृत्त व्हायची वेळ आली… ते गावी जायच्या दिवशी त्यांना स्वयंपाक करू न देता, ऊषाताईंनी स्वयंपाक करून आगोदर त्यांना जेवायला वाढले… बाबूजींनी आग्रहाने पानात पक्वान्न वाढले… ते निघताना धोतर, शर्टाचे कापड, गांधी टोपी, त्या महिन्याचा पगार, शिवाय १९८० सालचे दहा हजार रुपये रोख, हे हातात ठेवून बाबूजी म्हणाले, ‘महाराज, जब तक आप हैं किशनगड में आपके घर आपका पेन्शन हर महिनेमे आता रहेगा..’ आणि एकही महिना पेन्शन जाणे चुकले नाही. या गोष्टी खूप लहान असल्या तरी बाबूजींचे मन समजायला त्या खूप मोेठ्या आहेत. सामान्य माणसांशी तुम्ही कसे वागता… हीच माणसाची खरी कसोटी असते. बाबूजींनी ‘लोकमत’ला परिवार मानले. आज कोणाला खरे वाटणार नाही. घराघरात लोकमत टाकणाऱ्या (हॅाकर्स) विक्रेत्यांच्या कुटुंबासह बाबूजी ‘दिवाळी संमेलन’ भरवत होते. सर्वांना जेवण… भेटवस्तू… स्वत: बाबूजी हाताने जवळपास प्रत्येकाच्या तोंडात जिलेबी भरवायचे… मनामध्ये अपार सहानुभूती अाणि प्रेमळपणा असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाहीत.
हे झाले व्यक्तिगत जीवनातील अनुभव.. राजकारणात बाबूजींनी कितीजणांना मदत केली याचा हिशेब नाही… िकतीजणांना आमदार केले… शिवाजीराव मोघे म्हणणार, ‘बाबूजींमुळे मी आमदार झालो. त्यांनी ितकीट दिले’. औरंगाबादचे केशवराव औताडे म्हणणार, ‘बाबूजींमुळे इंिदराजींनी मला तिकीट दिले.’ सुरेंद्र भुयार म्हणणार… ‘हा माणूस नाही, देवमाणूस आहे…’ सोलापूरचे खासदार धर्माण्णा सार्दुल सांगणार, ‘सोलापूरची बंद िगरणी बाबूजींमुळे सुरू झाली आणि १५०० कामगारांना रोजगार मिळाला.’ अमरावतीचे शरद तसरे सांगाणार… ‘विदर्भात जी काही काँग्रेस आहे ती बाबूजींमुळे आहे…’ िगरीष गांधी सांगणार, ‘काँग्रेसला सर्वस्व देणारा नेता म्हणजे बाबूजी’. बनवारीलाल पुरोहित म्हणणार… ‘हिमालयाच्या उंचीचा माणूस…’ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रा. स्व. संघ सरसंघचालक मोहन भागवतसाहेब म्हणणार, ‘विदर्भात सगळ्यात अग्रगण्य आणि उठून दिसणारे नाव म्हणजे जवाहरलाल दर्डा…’ आणि नितीन गडकरी सांगणार… ‘वाजपेंयीसाठी बाबूजींनी गाडी पाठवली तेव्हाची गोष्ट…’ किती विषय आणि िकती कंगोरे … बाबूजी आरोग्यमंत्री असताना किंवा नसताना, अनेक रुग्णांना त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये स्वत:च्या खर्चाने उपचारासाठी भरती केलेले आहे. त्याचा नावासह तपशील माझ्याकडे आहे. पण, उजव्या हाताने केलेले बाबूजींनी डाव्या हाताला कधी समजू दिले नाही.
बाबूजी कधीही कोणावर रागवले नाहीत. नागपुरातील एका वृत्तपत्राने वर्षातील ३६५ दिवस बाबूजींच्या विरोधात हेडलाईन केली… हातात स्वत:चे प्रभावी दैनिक असताना बाबूजींनी शब्दाचाही प्रतिवाद केला नाही. दुर्दैवाने त्या मालकाचे अपघातात अकाली निध्ान झाले… त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनाला विजयबाबू यांना घेवून पहिल्यांदा त्यांच्या घरी पोहोचले ते बाबूजी.
पण, टाईम्स अॅाफ इंडिया समूहाने बाबूजींच्या विरुद्ध एक खोटी बातमी छापली. बाबूजींनी दहा कोटींचा दावा केला. मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती छगलासाहेबांसमोर खटला चालला. ‘बातमी खोटी आहे’, हे सिद्ध झाले. न्यायमूर्तींनी टाईम्स अॅाफ इंिडया समूहाच्या व्यवस्थापक आणि संपादकांना बातमी छापलेल्या जागेवर बाबूजींची माफी मागायला लावली.
१५ फेब्रुवारी १९८७ च्या मुंबईतील ‘नवभारत टाईम्स’ या दैनिकाने पहिल्या पानावर माफी प्रसिद्ध केली. या माफीपत्रावर टाईम्स चालवणारे बेनेट कोलमेन कंपनीचे अध्यक्ष अशोककुमार जैन, जनरल मॅनेजर राम तनरेजा, प्रकाशक पीठावाला, मुख्य संपादक राजेंद्र माथुर यांच्या सह्या आहेत. बाबूजींनी एक रुपया डिक्री घेतली. दुसऱ्या दिवशी मला सोबत घेवून बाबूजी पोहोचले टाईम्सचे मालक श्रेयंप्रसाद जैनसाहेब यांच्या घरी. कशाकरिता…. त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करायला. कारण टाईम्स समूहाने त्यांच्या हयातीत छापलेली ही पहिली माफी! माझ्या डोळ्यांसमोर घडलेली घटना. श्रेयंप्रसाद म्हणाले, ‘दर्डाजी, मैने ऐसा बडे मन का इन्सान देखा नही… हमारे लोगोंकी गलती हैं…. और आप मेरे पास क्षमा-याचना करने को आये….’ श्रेयंप्रसाद यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. बाबूजी गाडीत बसेपर्यंत खाली सोडायला श्रेयंप्रसादजी आले. गाडीत बसताना बाबूजी म्हणाले, ‘आपने जैन धर्म का सिद्धांत हैं… क्षमा विरस्य भूषणम…’
बाबूजी स्वातंत्र्यसैनिक होते. व्यक्तिगत सत्याग्रहात महात्मा गांधीजींच्या परवागनीने त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी भाग घेतला. १८ महिन्यांचा तुरुंगवास झाला. जबलपूरच्या तुरुंगात बाबूजी होते. बाबूजी मंत्री झाल्यावर विरोधकांनी विधानसभेत बाबूजींवर आरोप केला की, ‘बाबूजी स्वातंत्र्यसैनिक नव्हतेच…’ २५ नोव्हेंबर १९८७ आणि २६ नोव्हेंबर १९८७ असे दोन दिवस विधानसभेचे कामकाज या प्रश्नावर विरोधकांनी बंद पाडले. विरोधी पक्षनेते दत्ता पाटील हे होते. अध्यक्ष शंकरराव जगताप यांनी आमदार जवाहरलाल दर्डा यांना  बोलावले, आणि म्हणाले की, ‘तुम्ही खुलासा का करत नाही….?’ बाबूजींनी सांिगतले, ‘माझ्यावर जे आरोप करीत आहेत, त्यापैकी कुणीही स्वातंत्र्य संग्रामात कधीच नव्हते… त्यांना मी १८ महिने शिक्षा भोगली आहे, हे सांगण्याची मला गरज वाटत नाही.’ दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांनी बाबूजींच्या विरुद्ध हेडलाईन केल्या. मग स्वातंत्र्यसंग्राम समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक अच्युतराव देशपांडे  आणि अमरावतीचे स्वातंत्र्यसैनिक पंदे गुरुजी यांनी जबलपूर जेलचे सगळे रेकॉर्ड घेवूनच पत्रकारांसमोर आले. आणि मग आरोप करणारे आमदार दत्ता पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी आपले शब्द मागे घेतले. ते दोघे माझ्यासोबत बाबूजींना घरी भेटायला आले. बाबूजींनी दोघांचे स्वागत करून त्यांना नाश्त्याच्या टेबलवर बसवले.. ते दोघे संकोचले होते… बाबूजी म्हणाले, ‘राजकारणात आरोप -प्रत्यारोप होत असतात… विरोधकांचे ते कामच आहे. मला राग नाही… चला, फस्टक्लास नास्ता करूया…’ बाबूजींकडून बाहेर पडल्यावर दत्ता पाटील म्हणाले… ‘काय विलक्षण व्यकि्तमत्त्व आहे हो….’
शेवटचा मुद्दा : बाबूजी हे असे एकमेव नेते महाराष्ट्रात आहेत त्यांनी खांद्यावर घेतलेला काँग्रेसचा झेंडा कधीही उतरवला नाही. ‘एकटा राहिलाे तरी चालेल, काँग्रेसचा झंेडा खांद्यावर घेवून लढत राहिन’, ही त्यांची शेवटची मुलाखत होती. १९८० साली इंिदरा गांधी यांना मिळालेल्या देशभरातील यशामध्ये बाबूजींच्या भूमिकेचा सिंहाचा वाटा आहे. त्याचा तपशील द्यायचा तर एक प्रबंध होईल…  २५ जून १९७८ रोजी इंिदरा गांधी पवनार येथे विनोबांना भेटायला गेल्या. हजारो लोक इंिदराजींसाठी रस्त्यावर उभे होते. हे सगळे वातावरण देशभर बाबूजींनी ‘लोकमत’मधून पोहोचवले. ‘हारे तो क्या हुआ- फिर जीत जाएंगे’ इंिदराजींच्या या एका मुलाखतीने महाराष्ट्रातील सगळे वातावरण बदलले… पण, १९८२  साली बाबासाहेब भाेसले मुख्यमंत्री झाले त्यांनी बाबूजींना मंत्रिमंडळात घेतले नाही तेव्हा, ‘मला मंत्री करा’ हे सांगायला बाबूजी कधीही इंिदराजींना भेटायला गेले नाहीत.  किंवा शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात (१९८६) बाबूजींना वगळले गेले तेव्हा, ‘मला मंत्री करा’ म्हणून सांगायला बाबूजी  त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधी यांना भेटायला गेले नाहीत. मंत्रीपद गेले म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाची साथ कधीही सोडली नाही. वसंतराव नाईकांशी मैत्री कायम ठेवून, त्यांच्यापासून वेगळी राजकीय भूमिका घेवून अलग होताना त्यांनी इंिदराजींना शेवटपर्यंत साथ दिली. सत्तेची त्यांना पर्वा नव्हती. काँग्रेस पक्षाच्या ठाम भूमिकेवर शेवटपर्यंत खंबीरपणे उभे राहण्याची वैचारिक प्रगल्भता बाबूजींजवळ होती. त्यामुळे त्यांनी सत्तेसाठी कधीही पळापळ केली नाही.
बाबूजी २५ नोव्हेंबर १९९७ साली वयाच्या अवघ्या ७४ व्या वर्षी अचानक गेले. त्यापूर्वी चार महिने म्हणजे १५ अॅागस्ट १९९७ ला देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली होती. स्वातंत्र्याचा तो सुवर्णमहोत्सव बाबूजींनी डोळेभरून पाहिला. १४ अॅागस्ट १९९७ रोजी औरंगाबादला रात्री १२ वाजता एकनाथ मंिदरात स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा भव्य सत्कार बाबूजींच्या हस्ते झाला. दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे १५ अॅागस्ट १९९७ च्या लाेकमत मध्ये त्यांनी छोटं संपादकीय लिहलं… त्यातील शब्द आणि शब्द आजच्या तारखेला या देशाला आणि महाराष्ट्राला १०० टक्के लागू आहे. त्यांची ‘सोच’  किती उच्च दर्जाची होती, हे या अग्रलेखातील शब्द नी शब्द सांगेल…. लेख मोठा झाला असला तरी बाबूजींचा तो शेवटचा अग्रलेख मुद्दाम देतो आहे.
बाबूजींचा शेवटचा अग्रलेख (१५ अॅागस्ट १९९७)
‘देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव मी पाहत आहे. माझं भाग्य आहे, असं मी समजतो. मात्र, आज जी चिंता वाटते ती व्यक्त करावी आणि त्यावर उपाय योजावा, असे सतत वाटत राहते. जमेची एक बाजू मोठी आहे. देशातला सामान्य माणूस अत्यंत सुजाण आहे. म्हणूनच, देशाची एकता आणि अखंडता आज अभंग राहिलेली आहे. सर्वधर्मसमभाव, लोकशाही आणि स्वातंत्र्य हा या देशाचा प्राण आहे. देशाचा खरा भाग्यविधाता देशातला सामान्य माणूसच आहे. मात्र… मनाला खंत अशी आहे की, आजचे चित्र मन विषण्ण करणारे आहे. तरुणांसमोर आदर्श नाहीत, नेत्यांमध्ये सामाजिक आणि राजकीय नैतिकता कमी होत चालली आहे. जाती-जातींमध्ये प्रेमभाव निर्माण होण्याऐवजी जाती अधिक घट्ट होताना दिसत आहेत. वैर वाढत आहे. महागाई कमालीची वाढत चाललेली आहे. बेकारांच्या फौजा निर्माण होत आहेत, त्या बेकारांना काम देण्याची कोणतीही योजना नाही. यातून निर्माण होणारे वैफल्य हा लोकशाहीला धोका ठरू शकतो. प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव हा देशापुढील चिंतेचा विषय ठरेल. राष्ट्रीय म्हणवणारे पक्ष राज्यपातळीवर प्रभावहीन वाटू लागले आहेत आणि देशपातळीवरही राजकीय पक्षांचा प्रभाव कमी होत चालला आहे. समाजवादी चळवळ आता क्षीण झालेली आहे, त्यामुळे धर्मवादी शक्ती प्रबळ झाल्या असल्यामुळे देशाचे धर्मनिरपेक्ष स्वरूप आणि लोकशाही गळून पडते की काय, असे वाटू लागले आहे. 
(१५ अॅागस्ट १९९७)

२ जुलै २०२३ रोजी बाबूजींच्या जन्मशताब्दीला एवढेच वाटते की, आज बाबूजी हवे होते… राजकीय निष्ठा काय असते, हे दाखवण्यासाठी हवे होते.. काँग्रेससाठी हवे होते… महाराष्ट्राला हवे होते… मला त्यांनी ‘लोकमत’चे संपादक केले. माझ्या सुख-दु:खात माझ्या मागे ते नेहमी उभे राहिले. माझी मोठी कन्या मनीषा कॅन्सरने ५ जून १९७८ साली देवाघरी गेली. तेव्हा मी आणि मंगला निराश होवून भरकटलो होतो.. काय करायचे सूचत नव्हते… बाबूजी घरी आले… शेजारी बसले… पाठीवर हात ठेवला… म्हणाले, ‘आयुष्यात सगळ्यांच्या वाट्याला दु:ख येतात… सिकंदराच्या वाट्यालाही आलं असेल… पण जग जिंकायचा तो थांबला का? तुमच्ाी जिद्द सिकंदराची आहे. उठा, कामाला लागा… मी तुमच्यासोबत आहे…’ आज त्या शब्दांची आठवण येते… मी संपादक झालो. पत्रकाराचे  सगळ्यात मोठे ध्येय काय असते? मला नागपूर , जळगाव, नाशिक ‘लोकमत’ समूहाचा संपादक बाबूजींनी केले. हे मी कसे विसरेन! बाबूजी गेल्यानंतर १ मे १९९८ रोजी सुरू झालेल्या मुंबई ‘लोकमत’च्या पहिल्या संपादकपदाची जबाबदारी विजयबाबू, राजनबाबूंनी माझ्यावर तेवढ्याच विश्वासाने सोपवली. हे ही मी कधी विसरणार नाही. बाबूजींच्या नंतर विजयबाबू आणि राजनबाबू आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याच िजद््दीने ‘लोकमत’ला महाराष्ट्र भूमंडळावर सर्वत्र नेले आणि गोवा, दिल्लीपर्यंत पताका फडकवली.
शेवटी एवढेच…
आचार्य अत्रे आणि बाबूजी या दोन व्यक्तिमत्त्वांसोबत  माझी ५० वर्षे गेली.  दोन भिन्न प्रकृती आणि भिन्न वैचारिक भूमिका असलेल्या या दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी माझ्यातल्या ढिगभर दोषांसकट, त्यांच्या परिसस्पर्शाने माझ्या आयुष्याचे सोनं केले, हे सांगायला मला कसलाही संकोच वाटत नाही. अत्रेसाहेबांनी मला आक्रमक पत्रकारितेतील शब्दाच्या सामर्थ्याची जाणीव  करून दिली. आणि बाबूजींनी सकारात्मक आणि विकासात्मक पत्रकारिता देशाला कशी तारेल, हे नकळत शिकवले. पत्रकारितेतील अनेक सन्मान माझ्या वाट्याला आले. आजही मी ८४ व्या वर्षी धडधाकड आहे…  पुरोगामी महाराष्ट्रासाठी तडाकून लिहितो आहे… महाराष्ट्रभर फिरतो आहे.. कार्यक्रम करतो आहे… बोलतो आहे… लोकांना भेटतो आहे… अजून १० वर्षे मरणार नाही, याचे सगळे श्रेय मला पत्रकार होता आले, यामध्ये आहे आणि त्याचे श्रेय ‘मराठा’चे संपादक आचार्य अत्रे, ‘लोकमत’ आणि त्याचे मुख्य संपादक बाबूजी यांनाच आहे… १३ अॅागस्ट २०२३ रोजी आचार्य अत्रे यांची १२५ जयंती आहे. आणि या जुलै २०२३ ला बाबूजींची जन्मशताब्दी आहे, हाही एक योगायोगच..

आचार्य अत्रे आणि बाबूजी या दोन महान व्यक्तिमत्त्वांना नम्र अभिवादन 📞9892033458

–  मधुकर भावे

 646 Total Likes and Views

0 Comments

No Comment.