कसला भूकंप? सौदेबाजी जिंकली!

Analysis
Spread the love

महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य घडले त्याला भूकंप वगैरे मानायला मी तयार नाही. हे आज ना उद्या होणारच होते.. अजितदादा मोठा गट घेऊन जाणार हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांनाच ठाऊक होतं. मीडियाच काय गाव-खेड्यांतील सर्वसामान्य लोकही अगदी ठामपणे हे सांगत होते.  येणाऱ्या पंधरवड्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मोठ्या घडामोडी घडणार आहेत..अशी चिन्हे  दिसत होतीच. जी चर्चा जगजाहीरपणे होतं होती, ती  अखेर खरी ठरली इतकेच.  ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, साखर कारखान्यांचे झोल.. आणि राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांच्या भानगडींच्या सगळ्या फायली अजित पवारांच्या इच्छेप्रमाणे भाजपने क्लियर करण्याचे काम सुरू केले होते.. आधी हे सगळे घोटाळेबाज थोरल्या साहेबांकडेच गेले होते. “भाजप सोबत जावे की तुरूंगात? असा एकच प्रश्न आमच्या समोर आहे. आता तुम्हीच काय ते मार्गदर्शन करा..”, असे साकडे आधी आमदारांनी मोठ्या साहेबांनाच घातले होते. पुतण्यानेच या आमदारांना आयडियाने काकांकडे पाठवले होते.. पण काकांचा सकारात्मक रिस्पॉन्स मिळाला नाही, तेव्हा सगळ्याच  आमदारांना वॉशिंग मशिन मध्ये स्वच्छ करण्याची जबाबदारी पुतण्याने स्वीकारली. अजित पवार मनाने तर केव्हाच भाजपमध्ये पोचले होते.. कुटुंबातील पाच-पन्नास नातेवाईकांचे अकाउंटस् मध्यंतरी सिल झाल्याची बातमी होती. “येतो लवकरच”असे सांगितल्यावर ती मध्यंतरी उघडली गेली.. पण प्रत्यक्षात फूट काही पडत नव्हती. मात्र परवाच पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेत सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करून अजितदादा व कंपूला धडकी भरवली. त्यानंतर सूत्रे वेगाने फिरली. घोटाळेबाज दादांकडे एकवटले आणि दुसरे गद्दारीनाट्य पार पडले. आगामी निवडणुका जिंकायच्या तर  भाजपला महाराष्ट्रातील बहूसंख्य मराठा समाज सोबत हवा आहे..  त्यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते.  त्यामुळे by hook or crook राष्ट्रवादी एक तर भाजपसोबत घ्यायची किंवा जेरबंद करायची असा ‘वन लाईन फॉर्म्युला’ मोदी-शहांनी ठरवला होता. महाराष्ट्रातील बहुतांश मराठा समाज पूर्णपणे भाजपविरोधात असल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीपूर्वी बदलणे हे मोदी-शहा यांच्यापुढील सर्वात महत्त्वाचे टास्क होते. ते अजित दादांच्या सहकार्याने पूर्ण झाले. एकनाथ शिंदेंचे ओझे बिनकामाचे आहे, ते आपल्याला घेऊन बुडतील याची खात्री भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आधीच पटली होती.. अलीकडच्या आगाऊ जाहिरातीनंतर तर देवाभाऊही सटकलेच होते. त्यामुळे आता लवकरच एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील. शिंदेंचे मुख्यमंत्रीपद कायद्याच्या कक्षेत राहून अलगद काढले जाईल.. आणि पहाटस्वप्नानात गडगडलेले अजित पवारांसोबतचे फडणवीसांच्या मनातील सरकार महाराष्ट्रात सत्तेवर येईल. शिंदेंचे मुख्यमंत्री पद हिसकावून भविष्यात ते कदाचित अजित पवारांना आणि फडणवीस केंद्रात असाही प्रयोग शक्य आहे.. पण आगामी निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजप लढवणार नाही, हे आता सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. चंद्रकांत पाटलांसारखा मास बेस नसलेला नव्हे तर अजितदादांसारखा पवार कुटुंबातील लोकप्रिय मराठा चेहराच भाजपला लोकसभा निवडणुकीत तारू शकतो, हे भाजपला कळून चुकले होते. त्यात शिवसेना फोडल्यानंतर उद्भवलेल्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी भाजपने जी विनोद तावडे समिती महाराष्ट्रात पाठवली, त्या समितीचा अहवाल तर धक्कादायक होता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आता दोन आकडी संख्या गाठणेही कठीण जाईल, असा वस्तुनिष्ठ अहवाल तावडे समितीने दिला. म्हणजे ४८ पैकी १० जागाही निवडून येणार नाहीत! या अहवालाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली. या अहवालाची गंभीर नोंद भाजपने घेतली.. आणि आणखी एका फुटीचा प्लॅन ठरला. त्यानुसार आज राजकारणातील सोंगट्या हलल्या. याला भूकंप म्हणता येणार नाही. हा केवळ एक सौदा आहे. अटकेचे भय दाखवून केलेली राजकारणातील सौदेबाजी जिंकली, असे फार तर म्हणता येईल!

                *–ग. तु. जोशी*
                    (पुणे)

 831 Total Likes and Views

0 Comments

No Comment.