” समर्पणातून संघ संवर्धन “

Analysis
Spread the love

संघाचा इतिहास हा १९२५ पासूनचा ९८ वर्षांचा आहे. ज्या काळात डाॅक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली त्याकाळी हिन्दूधर्म जाती जातीत विभाजित होता. मी तेली,मी कुणबी, मी सोनार, मी ब्राह्मण आहे परंतू मी हिन्दू आहे हे फारच कमी लोकं म्हणत होते. काही लोकं तर थट्टेने म्हणायचे की चार हिन्दू एका दिशेने त्याच वेळी जातात जेंव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो.

    ज्या काळी हिन्दू एकत्र येणे ही केवळ अशक्यप्राय गोष्ट होती, संघटीतपणाच्या अभावामुळे  परधर्मीयांच्या आक्रमक वृत्तीला सडेतोड उत्तर देणे देखील शक्य नव्हते अशा परिस्थितीत सशक्त, संघटीत व सामर्थ्यवान हिन्दूंचे संघटन करण्यासाठी प.पू. डाॅक्टर हेडगेवारांनी २७ सप्टेंबर १९२५ रोजी नागपुरात संघाची स्थापना केली.  संघाच्या प्रारंभकाळात सेवाकार्य करून माणसे जोडण्यात आली. रामटेकच्या गडमंदिरावर यात्रेची व्यवस्था करण्यापासून संघाचे सेवाकार्य सुरू झाले. त्याकाळी संघाचे कार्य अत्यंत मर्यादित असल्यामुळे होणारा खर्च डाॅक्टरांचे मित्र स्वतःजवळूनच देत परंतू जसजशी संघाची व्याप्ती वाढू लागली तसतसे खर्च देखील वाढू लागले. अशा स्थितीत वारंवार त्याच लोकांवर खर्चाचा भार टाकण्यापेक्षा आपणच ही राशी उभारावी व या विचारातून संघाचा गुरूदक्षिणा कार्यक्रम घेण्याचे ठरले.
        १९२७ साली पहिला गुरूदक्षिणेचा कार्यक्रम घेण्यात आला. गुरू कुणाला मानावे? सर्वांना वाटले की डाॅ. हेडगेवार संघ निर्माते आहेत त्यामुळे त्यांनाच गुरू करावे, परंतू डाॅ. हेडगेवार म्हणाले की कोणत्याही जीवित व्यक्तीला गुरू केले की त्याची कुठली ना कुठली नकारात्मकता राहणार. व्यक्ती हा स्खलनशील आहे. आज जरी तो चांगला असला तरी तो कायम तसाच राहील हे कुणीच सांगू शकत नाही म्हणून त्याग, धर्म, संस्कृती, पराक्रम, पवित्रता यांचे आदर्श प्रतिक असलेल्या भगवा ध्वजालाच गुरू मानून त्याचे पूजन करून गुरुदक्षिणा अर्पण करावी असे ठरले व त्यानुसार पहिला गुरुदक्षिणेचा कार्यक्रम पार पडला. गुरूदक्षिणा म्हणून ८४ रू. निधी जमला होता.  एकाच वेळी मोठी राशी देणे शक्य नाही म्हणून पुढे दर महिन्यात थोडी थोडी राशी जमवून गंगाजळी निर्माण करण्याची संकल्पना पुढे आली.

      भगव्या ध्वजाला प्रणाम करून जो पूजन करेल तोच गुरूदक्षिणा समर्पित करेल व त्यातूनच संघाचा खर्च चालेल हे निश्चित करण्यात आले. पूजनाशिवाय कुणी करोडो रुपये देण्याची इच्छा दर्शविली तरी संघ ही राशी स्विकारत नाही.

  भारतमातेला परम वैभव प्राप्त व्हावे, भारत विश्वगुरु व्हावा, संस्कृती संवर्धन व्हावे यासाठी संघ स्वयंसेवकांनी स्वतःला झोकून दिलेले आहे.

      स्वार्थांध व धर्मद्रोह्यांनी संघाला बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे पण संघाच्या पारदर्शी कार्यामुळे त्यांचा प्रयत्न सफल होवू शकला नाही. ज्यांच्यासोबत आपण अनेक वर्षांपासून वावरतोय त्या स्वयंसेवकाची जात कोणती आहे ते इतरांना माहिती नसते इतकी समरसता व एकरुपता स्वयंसेवकात आलेली आहे .
    सामान्यपणे कोणताही माणूस काम करताना आपल्या स्वार्थाचा विचार करतो. यामुळे कधी कधी लोक प्रश्न विचारतात की, या कामाचा आम्हाला काय फायदा?  संघात जसे वैयक्तिक अभिमान, स्वार्थ याला स्थान नाही, तसेच संस्थेच्या अभिमानालाही वाव नाही. संघ केवळ आपल्या अखिल भारतवर्षाचा अभिमानी आहे. आम्हाला दुसऱ्या कोणत्या ध्वजाचा अनादर करावयाचा नाही, पण आमच्या श्रद्धा प्राचीन भारताच्या इतिहासाला आणि परंपरागत भगव्या ध्वजालाच समर्पित आहेत. संघाचे स्वयंसेवक भगव्या ध्वजाला प्रणाम करून ज्या ज्या वेळी समाजावर संकट येते त्या त्या वेळी कुणाच्या आदेशाची वाट न पाहता धावून जातो व त्या कार्यात स्वतःला झोकून देतो. 

    पाकिस्तानबरोबर आपली तीन युद्धे झाली. १९४७ च्या पहिल्या युद्धात केवळ ४८ तासात विमाने उतरू शकतील असा विमानतळ जम्मूच्या पर्वतीय भागात स्वयंसेवकांनी बांधला होता. हे कार्य मजूर लावून इतक्या कमी अवधीत पूर्ण करणे निव्वळ अशक्य होते. १९६५ च्या दुसऱ्या युद्धात राजधानीची व्यवस्था व प्रशासनाचे कार्य सहजपणाने स्वयंसेवकांनी सांभाळले. १९७१ च्या सर्वंकष युद्धाच्या वेळी तर आघाडीवर तोफांचा आणि मशिनगन्सचा भडीमार चालू असताना तरुण स्वयंसेवक थेट खंदकापर्यंत जात असत. जखमी जवानांना मदत करीत, त्यांच्यासाठी गरम पेय घेऊन जात. हे तर साक्षात मृत्यूच्या मुखातले धाडस होते. लष्करातील अधिकाऱ्यांना प्रश्न पडे की इतके प्रशिक्षण यांना कसे, कोणी दिले? आपण जाणतो की संघशाखेत काही लष्करी शिक्षण नसते, तरीही असे कार्य यशस्वीपणे करण्याचे सामर्थ्य कुठून मिळते? तर ते मिळते समर्पणाच्या भावनेतून. एका अर्थाने सहजपणे ती गुरूदक्षिणेची पूर्तीच असते.

    याचना न करता राष्ट्रव्यापी संघटनेच्या कार्यासाठी लागणारे धन अव्याहतपणे मिळत आहे. अशी दक्षिणा देताना कोणावर भारही पडत नाही व दिलेल्या धनाच्या मागे उपकाराची भावनाही रहात नाही. शिवाय कोणी किती गुरूदक्षिणा ठेवली याचा विचार मनात येत नाही.
विचार फक्त एकच येतो……

“गुरू वंद्य महान,
भगवा एकची जीवनप्राण ॥”
“अर्पित कोटी कोटी प्रणाम !!!”

 878 Total Likes and Views

0 Comments

No Comment.