केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे भन्नाट कल्पनांचा नेता आहे. देशाला काही नवे देण्याच्या कल्पनेने ते झपाटलेले असतात. पुण्यातील चांदणी चौकात नव्याने झालेल्या उड्डाणपुलाचं लोकार्पण समारंभात बोलताना त्यांनी अफाट संकल्पनांनी पुणेकरांना खिळवून ठेवले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते.
हवेतून चालणाऱ्या बसेस पुण्यात आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांनी पुण्यातील प्रदूषण कमी करण्याबाबत काही सल्ले राज्य सरकारला दिले. यात इथेनॉलचा वापर सुरू करण्याचं प्रमुख आवाहन त्यांनी केलं. आपल्याला देशातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करायचं आहे अशी घोषणाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी टोयोटाच्या फ्लेक्स-फ्युएल कारचा उल्लेख केला. टोयोटा-किर्लोस्कर कंपनी देशात एक फ्लेक्स-फ्युएल कार लाँच करणार आहे, असं गडकरींनी सांगितलं. टोयोटा कॅमरी असं या कारचं नाव असणार आहे. “या गाडीचं जुनं व्हर्जन हे ४० टक्के वीजेवर आणि ६० टक्के पेट्रोलवर चालायचं. मात्र, या महिन्यात मी याचं नवीन व्हर्जन लाँच करणार आहे, जे १०० टक्के इथेनॉलवर चालेल.”, असं ते म्हणाले. इथेनॉलची किंमत आणि गाडीचं मायलेज लक्षात घेता, सुमारे 15 रुपये प्रतिलीटर इंधनावर ही कार धावू शकेल असा दावा गडकरींनी केला. टोयोटा कॅमरी ही गाडी भारतात लाँच झाल्यानंतर त्याचे फीचर्स आणि किंमत याबाबत अधिक माहिती उपलब्ध होईल. सध्या या गाडीच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत सुमारे ४७ लाख रुपये आहे.
पेट्रोल आणि डिझेल हे पृथ्वीच्या पोटातून बाहेर काढले जातात. तर फ्लेक्स फ्युएल हे लॅबमध्ये तयार करण्यात येतं. यासाठी पेट्रोलसोबत इथेनॉल किंवा मिथेनॉल मिक्स करण्यात येतं. इथेनॉल हे मका किंवा ऊसापासून तयार करता येतं. इथेनॉलच्या वापरामुळे प्रदूषण कमी होतं, तसेच इंधनाची किंमतही कमी होते.”हायड्रोजन इंधन हे भविष्य आहे. माझ्याजवळ असणारी ‘टोयोटा मिराई’ ही हायड्रोजनवर धावणारी गाडी आहे. मिराई या शब्दाचा अर्थच भविष्य होतो. पुण्याला भविष्यात पेट्रोल-डिझेल मुक्त केलं तर इथलं ४० टक्के प्रदूषण नाहीसं होईल”, असं गडकरी म्हणाले.मिराई कारमध्ये 5.2 लीटर क्षमतेचा हायड्रोजन टँक मिळतो. एकदा टँक फुल केल्यानंतर ही कार तब्बल ६४६ किलोमीटर धावू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात या कारची किंमत सुमारे ६० लाख रुपये आहे. अद्याप ही गाडी भारतात लाँच करण्यात आलेली नाही.
53 Total Likes and Views