काका-पुतण्या आणि पिढीजात कसरती…

Editorial
Spread the love

दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं…अशी म्हण आहे. राजकारणाला ती तंतोतंत लागू होते. राजकारणात दिसतं तसं नसतं, यात बदल करून राजकारणी जसे दाखवतात, तसे नसतातच आणि त्यांना जे करायचे असते ते कधीच दाखवत नाहीत, हे लागू होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर वाहन ताफ्यातल्या सुरक्षाविषयक वाहनांना फाटा देऊन गुपचूप जान शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली, असे वृत्त प्रसिद्ध जाले आहे. स्वतः अजित पवार यांनी ते फेटाळले असले तरी कोणताही राजकारणी सुरुवातीला असे काही घडलेलेच नाही, हेच सांगत असतो. त्यांच्या दृष्टीने ते बरोबरही असते कारण त्यांची मजबुरीच असते.

गेले काही दिवस राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP) अंतर्गत काय सुरू आहे, याचा थांगपत्ता कुणाला लागत नाहीये…अर्थात, शरद पवार म्हटलं की संशय किंवा गूढ निर्माण होणे, हे ओघानेच आले. तेच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून सुरू आहे. राष्ट्रवादीत कोण आहे, राष्ट्रवादीतून कोण बाहेर पडलेय किंवा राष्ट्रवादीत कोण उरलेय, याची चर्चा माध्यमांनी गेले महिनाभर म्हणजे २ जुलैपासून सुरू केली.

ही बातमी पण वाचा : स्वच्छ हवा उपक्रम राज्यभरातही व्हावा…

अजित पवारांनी पहाटे शपथ घेतली तीदेखील शरद पवार यांच्या संमतीने किंवा परवानगीनेच…तसेच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिमंडळात प्रवेश करत शपथ घेतली तीदेखील शरद पवार यांच्या संमतीनेच, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेन्द्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) या दोघांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून बहुतांश नेते आले तरी शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच भारतीय जनता पक्षाची दारे खुली करायची. त्याद्वारे राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या ऐक्क्याला सुरूंग लावायचा, ही रणनीती असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह काही नेत्यांना आधी भाजपाकडे पाठवले आहे आणि नंतर बाकीचेही जातील, अशी प्रतिक्रिया २ जुलैलाच राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. शरद पवार यांना राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता, त्यांनी आता कोण कोण उरले आहेत, ते बघतो, असे हसत हसत उत्तर दिले होते. त्यामुळे कदाचित पवार यांच्या संमतीनेच हे सारे मंत्रिमंडळात आले आहेत का काय, अशी शंका अनेकांना होती. आता ती उघडपणे व्यक्त केली जात आहे.

ही बातमी पण वाचा : दोन गट नाहीत, दोन्ही राष्ट्रवादीच आहेत…

ही शंका उघडपणे व्यक्त व्हायला लागण्यामागेही कालच्या शरद पवार अजित पवार यांच्या कथित भेटीमुळे हवा मिळत आहे. शरद पवार यांच्या पाठोपाठ अजित पवार आणि जयंत पाटील यांचीही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. भले अजित पवार हे वृत्त फेटाळत असले तरी धूर येतोय, याचा अर्थ कुठे तरी काही तरी पेटलेले होतेच, या न्यायाने दाल मे कुढ काला है किंवा कुछ तो गडबड है दया….असे म्हणावेच लागेल.

राजकारणात बोलायचे एक आणि करायचे भलतेच, हे शरद पवार यांचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. अजित पवार त्यांच्याच तालमीत तयार झाले आहेत. त्यामुळे एकीकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला जाता आले नाही, याबद्दल स्पष्टीकरण देणाऱ्या अजित पवार यांनी माध्यमांना उल्लू बनवल्याचे दिसते. त्यात शरद पवार त्या कार्यक्रमाला होते म्हणून अजित पवारांनी जाणे टाळले, अशा बातम्याही काहींनी छापल्यात. पण, या सर्व अटकळबाज पत्रकारांना कात्रजचा घाट दाखवत काका-पुतण्यांनी चर्चा केली का आणि त्यातून राष्ट्रवादी मंत्रिमंडळ प्रवेश अंक २ सुरू होणार का, हे उत्कंठावर्धक प्रश्न आहेत.

शरद पवारांनी महाराष्ट्राला (Maharashtra) अनेकदा कोड्यात टाकले आहे. कोडी घालणे, ती सोडवणे आणि स्वतः निर्माण केलेल्या कोड्यांमधे स्वतःच अडकणे, हाच शरद पवारांचा गेल्या पन्नास साठ वर्षांचा खेळ सुरू आहे. बघू या, पारंपरिक कलाकार कसरती करत करत पुढच्या पिढीकडे ते कौशल्य पास ऑन करतात, त्याच पद्धतीने शरद पवारही अजित पवारांना हे कौशल्य शिकवण्यात यशस्वी होतात का…

शैलेंद्र परांजपे

 112 Total Likes and Views

0 Comments

No Comment.