महानोरांच्या मनाला उभारी देणारा शेवटचा पुरस्कार… ‘साहित्य सम्राट आचार्य अत्रे जीवन गौरव पुरस्कार…’

Hi Special News
Spread the love


– मधुकर भावे
या आठवड्यात धुवाँधार पावसात महाराष्ट्राच्या कला जगतावर आणि साहित्य जगतावर दोन दरडी कोसळल्या.  २ अॅागस्टला  महान कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपले जीवन संपवले. न समजण्या पलिकडचा हा धक्का होता. माणसाचं वरून दिसणारं जीवन आणि त्याच्या मनातल्या उलथा-पालथीची, जाणीव होत नसल्यामुळे, ही कोसळलेली दरड महाराष्ट्राच्या कला जीवनावर फार मोठा आघात करून गेली न गेली तोच, ४ तारखेची सकाळ उजाडली आणि महाराष्ट्राचे महान निसर्ग कवी ना. धो. महानोर गेले. निसर्ग नियमाने ८१ व्या वर्षी गेले. दुखणे असह्य झाल्याने गेले. पत्नीच्या िनधनानंतर ते खचलेच होते. जेमतेम दोन वर्ष काढली. पण, याच अॅागस्ट महिन्यात गेल्या वर्षी १३ अॅागस्ट रोजी जळगाव येथे महानोर यांना ‘साहित्य सम्राट आचार्य अत्रे जीवन गौरव पुरस्कार’ दिला गेला. त्या दिवशी ते सहज म्हणून गेले होते…. ‘खूप दिवसांनी आज मनाला थोडीशी ऊभारी आणि प्रसन्नता वाटते आहे. कदाचित हा माझा शेवटचाच पुरस्कार असेल…’ आणि त्यांचे ते शब्द खरे ठरले. जळगावचे उद्योगपती भवरलाल जैन यांचे सुपूत्र अशोकभाऊ जैन यांनी त्यांच्या संकुलातील कस्तुरबा हॉलमध्ये हा देखणा समारंभ केला. खरोखर त्या दिवशी ना. धो. खूष होते. त्यांना मुंबईला यायला प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून, जळगावला समारंभ घ्यायचे ठरले. आणि तब्बल पावणे दोन तास महानोर बोलत राहिले. त्यात सामाजिक परिस्थिती, कविता, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, आचार्य अत्रे, १९८० ची जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडी…. अशा िकतीतरी विषयांवर ते बोलले. त्यांच्या शब्दांचा वेग कोसळणाऱ्या पावसासारखा असायचा… आता इथून पुढे त्या शब्दांच्या सरी अंगावर कोसळणार नाहीत… त्यांचा शेवटचाच कार्यक्रम आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करून व्हावा आणि तो जळगावात व्हावा…. आम्हा अत्रे परिवाराला सुखावणारा तो कार्यक्रम कालपासून या क्षणापर्यंत, मनात असा भिरभिरत आहे. ना. धो. बोलायला लागले की, त्यांना भान नसायचे… प्रत्येक शब्द मनातून आलेला असायचा… कृत्रिम नसायचा… किती सांगू…. काय सांगू…  असं त्यांना होऊन जायचं…. पवारसाहेब तर एकदा गमतीने म्हणाले, ‘एरवी त्यांचे नाव ‘ना. धो.’ असले तरी ते बोलायला लागले की, त्या ना. धो चे धो. धो. महानोर होतात.’ जळगावात अनेकजण त्यांना धो. धो. महानोरच म्हणायचे. पण त्या कोसळणाऱ्या  शब्दांच्या सरी िकती सुखावून जायच्या… महानोर यांच्या भाषणाने कंटाळलेला एकही श्रोता मी पाहिलेला नाही. अनेक कार्यक्रम पाहिले… त्यांच्यासोबत केले.. विधान परिषदेत त्यांना १९७८ पासून पाहत होतो.. त्यांची भाषणे ऐकत होतो… राजकारणावर ते कमी बोलले…. पण, विधानमंडळात अख्खं शेत आणि शेताचा बांध… शेतकरी आणि त्याची दु:ख… महानोरांनी उचलून आणली… आणि शब्दांतून व्यक्त केली… महाराष्ट्र विधान परिषदेत फार दिग्गज आमदार झाले… आपापल्या परिने ते खूप मोठे होते… पण, यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे आणि नंतर शरद पवार यांच्यामुळे ज्या दोन आमदारांना विधान परिषदेत राज्यपालांच्या मार्फत पाठवले गेले त्यात ग. दि. माडगुळकर पहिले आणि ना. धो. महानोर हे दुसरे… महानोर यांचे आमदार पद त्याची तर गंमतच आहे…  महनोर यांचा ‘वही’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला… यशवंतराव चव्हाणसाहेबांनी तो वाचला… शरद पवार मुख्यमंत्री होते… त्यांच्याकडे तो पाठवून दिला… आणि विनंती केली की,… ‘जर शक्य असेल तर आणि माझा शब्द मानला जाणार असेल तर या कवीला विधान परिषदेवर घ्या… ’ ते साल १९७८… पु. लो. द.चे सरकार आलेले… ३८ व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री… महानोर हे ३६ वर्षांचे… १९८४ साली आमदारकीची मुदत संपली. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री नव्हते…. वसंतदादा मुख्यमंत्री होते… दादांमार्फत महानोर यांना पुन्हा एक संधी मिळाली. या विधानमंडळात शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केले जाते… भाषणं झोडली जातात… पण, महानोरांनी शेती, पाणी, शेतकऱ्याच्या अडचणी, मार्केट, त्याच्या मालाला भाव न मिळणे, शेतकऱ्याची होणारी कोंडी, या सगळ्या विषयाचे राजकारण न करता… शेतकऱ्याचे बिघडलेले अर्थशास्त्र तळमळून सांगितले… वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याला मंत्रालयाचे दरवाजे पहिल्यांदा खुले झाले. महानोर आमदार झाल्यावर आख्खी शेती… कोरडवाहू असेल… बागायती असेल… त्या शेतीचे प्रश्न दोन हातांवर उचलून त्यांनी सभागृहात जणू समोर ठेवले. त्यामुळे आज एक महाकवी गेलाच… पण विधान भवनाच्या वेशीवर शेतकऱ्याची दु:ख ठळकपणे आणि खणखणीतपणे मांडणारा शेतीचा कैवारीही गेला.त्यांना मिळालेले मान-सन्मान… त्याची यादी खूप मोठी आहे. पण आयुष्यातील शेवटचा सन्मान आणि सत्कार आचार्य अत्रे जीवन गौरव पुरस्काराने झाला… याचा गेली वर्षभर त्यांना फार मोठा आनंद होता… त्या पुरस्काराने त्यांच्या खचलेल्या मनाला थोडी उभारी आल्यासारखी वाटली.
शेतीवर लिहिणारे साहित्यिक खूप झाले. पण, स्वत:ला शेतात गाडून घेणारा हा एकमेव साहित्यिक. पांढरा पायजमा आणि पांढरा शर्ट या त्यांच्या वेषात कधीच बदल झाला नाही. घरात…. समारंभात… विधानमंडळात… किंवा शेतात… महानोर यांना वेगळ्या पोशाखात कोणी कधीच पाहिले नाही. पळसखेड येथे त्यांनी वडिलोपार्जित शेती फुलवली. कॉलेजचे पहिल्या वर्षीचे शिक्षण तसेच टाकून ते शेतीवर आले… कोरडवाहू शेती…. आजूबाजूच्या डोंगरातून वाहणारे धबधबे… त्या धबधब्यांना गोलाकार बांध घालून महानोरांनी शेतात येणारे पाणी कसे आडवायचे… याचा एक महान प्रयोगच केला… जखीणवाडी गावाला पोपटराव पवार यांचाही हाच प्रयोग खूप यशस्वी झाला होता. महानोरांनी पाणी नसल्याची तक्रार कधी केली नाही. असलेल्या पाण्यातच फार युक्तीने आणि मेहनतीने वापर करून त्यांनी शेती फुलवली. स्वत: शेतात राबणारा हा कवी… अनेक ग्रामीण कवींमध्ये असे प्रत्यक्ष शेतात राबणारे कवी फारच कमी असतील…
१९८० पासून महानोरांशी संबंध असे काही जुळून आले…. तेव्हा ते आमदार होतेच.. शरद पवारसाहेबांनी जळगाव-नागपूर पदयात्रा करून शेतकरी दिंडी काढली. बॅ. अंतुले हे तेव्हा मुख्यमंत्री होते.  या दिंडीत ४०० किलोमीटर सतत चालणाऱ्या  कार्यकर्त्या-नेत्यांमध्ये महानोर हे शेवटपर्यंत होते. एवढेच नव्हे तर त्यावेळच्या महाराष्ट्र जनता पक्षाचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील हे तेव्हा ६० वर्षांचे होते. ४०० िकलोमीटर बापू चालले. मध्ये एका ठिकाणी रात्री विश्रांती असताना बापूंना भेटायला गेलो… तर त्यांच्या सुजलेल्या पायांना ना. धो. महानोर हे तेल चोळून देत होते.  महानोरांचेही पाय सुजले होते… पण आपल्या पायाचे दु:ख विसरून ते दिंडीत एवढे समरस झाले की, आजपर्यंत त्या दिंडीत झालेले त्यांचे शेतकरी मित्र त्यांनी शेवटपर्यंत जपले.
महानोर गेल्याची बातमी आली आणि १६ सप्टेंबर २०१५ ची आठवण झाली. १७ सप्टेंबर २०१५ ला बीड जिल्यातील माजलगाव येथे माजी मंत्री स्व. सुंदररावजी सोळंके यांचा जयंती दिन होता… त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण श्री. शरद पवारसाहेबांच्या हस्ते होते. मी प्रमुख पाहुणा होतो.  सुंदररावांची आणि माझी खूप छान मैत्री होती… ते बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यापासून होती… १९६२ ते १९६७ बीड जिल्हा परिषद अध्यक्ष…. १९६७ ते १९८० उपमंत्री, मंत्री, आणि उपमुख्यमंत्री… सुंदररावांचाही असा एक विक्रम की, ते ना एकही दिवस जिल्हा परिषदेचे नुसते सदस्य होते… ना कधी नुसते आमदार होते… जिल्हा परिषदेत निवडून आले…. आणि लगेच अध्यक्ष झाले. विधान सभेत १९६७ साली निवडून आले आणि लगेच उपमंत्री, मंत्री झाले. त्यांच्या कार्यक्रमाला जाताना पवारसाहेबांच्या सोबत गेलो… दुपारी ३ वाजता औरंगाबाद येथे उतरलो… कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता… पवारसाहेब म्हणाले, ‘संध्याकाळपर्यंत औरंगाबादला बसून काय करणार? चल, पळसखेडला महानोर यांच्याकडे जाऊ….’ आणि संध्याकाळी आम्ही पळसखेडला पोहोचलो. ३ तास छान गप्पा… जेवण… आिण परतीचा प्रवास त्या तीन तासांत शेतीबद्दल महानोर पवारसाहेबांजवळ
‘धो. धो.’ बोलले. पवारसाहेब घरी आल्याची बातमी बघता बघता कळली. आणि संध्याकाळी मोठी गर्दी झाली. त्यातील एकही माणूस महानोरांच्या कुटंुबीयांनी जेवल्याशिवाय परत पाठवला नाही. घर मोकळे…. ढाकळे… फर्निचर नाही… सजावट नाही… शेतकऱ्याचे घर… शेतकऱ्याचा पाहुणचार …. पण तसा आनंद राष्ट्रपती भवनातही येणार नाही… असे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व…
कवी म्हणून महानोर फार मोठेच.. पण, ‘जैत रे जैत’ या चित्रपटात नऊ च्या नऊ गीते महानोरांनी एका दिवसात लिहून काढली. एखाद्या चित्रपटातील गीतांसाठी हा झपाटा ना शकील बदायुनीला जमला… ना साहिर लुधियानीला…
जाता जाता सांगतो… महानोरांचा जीव ज्या दोन-तीन लोकांमधये गुंतला होता… त्यात त्यांच्या धर्मपत्नी सुलोचनाबाई होत्या… त्या गेल्यानंतरच ते खचले… आपल्या पत्नीवर त्यांनी हृदयाला भिडेल असे छान पुस्तकही काढले… पण त्यांच्याशी बोलताना यशवंतराव चव्हाणसाहेब, शरद पवारसाहेब आणि भालचंद्र नेमाडे यांची नावे पाच-दहा वेळा तरी आली नाहीत… अशी चर्चा मला आठवत नाही…  त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आनंद फारच वेगळा होता… विधान परिषदेतील दोन महान साहित्यिक आण्णा म्हणजे ग.दि. मा… कमी बोलायचेे… आणि ना. धो. महानोर धो. धो. बोलायचे… आता तो धबधबा थांबला… पुनहा एकदा रान दुष्काळी होईल का? अशी चिंता वाटू लागली. असा रानकवी पुन्हा होणार नाही… आणि असा मानकरी कवी पुन्हा होणार नाही.
शेवटचा मुद्दा : महानोर यांना श्री. भवरलाल जैन यांनी आपल्या कुटुंबीयांतील सदस्यासारखे जपले. हे ऋणानुबंध कसे तयार होतात याचे मानसशास्त्रीय उत्तर मिळत नाही… भवरलालभाऊ गेल्यावर त्यांचे सुपूत्र आणि त्यांच्याच शिस्तीत व्यावसाय सांभाळून घराण्याची प्रतिष्ठा वाढवणारे श्री. अशोकभाऊ जैन यांनीही त्याच आति्मयतेने… ममतेने आणि जिव्हाळ्याने महानोर यांना सांभाळले. गतवर्षी १३ अॅागस्टला आचार्य अत्रे पुरस्कार जेव्हा द्यायचे ठरले तेव्हा महानोरांची तब्बेत थोडीशी ठीक नव्हती. अशोकभाऊ म्हणाले… ‘मुंबईला कशाला कार्यक्रम ठेवता…. जळगावलाच करूया…’ आणि तो कार्यक्रम इतका देखणा झाला की, आचार्य अत्रे पुरस्काराच्या या पूर्वीच्या सगळ्या कार्यक्रमांना झाकळून टाकेल, इतका भव्य-दिव्य कार्यक्रम अशोकभाऊंनी मनापासून केला. उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी कार्यक्रम संपल्यावर खऱ्या अर्थाचे सुरूची भोजन… आजही त्याची चव आठवत आहे… आणखी एक गोष्ट आठवते… उपस्थित रसिकांपैकी प्रत्येकजण जेवल्याशिवाय अशोकभाऊ जेवायला बसले नाहीत… सर्वांचे जेवण झाल्यावर ते जेवायला बसले.  यजमानाचे अगत्य काय असते, याचाही अनुभव त्या दिवशी आला…
असे हे महानोर आणि त्यांना जपणारे अशोकभाऊ… महाराष्ट्रातील कला आणि साहित्यिक जगताला नितीन देसाई आणि महानोर यांच्या जाण्याचे दु:ख वाटतच राहिल… पण, आज सगळ्यात धक्का बसेल आणि ज्यांना अापले अश्रू दाखवताही येणार नाहीत, असे अशोकभाऊ जैन असतील… एवढा त्यांचा महानोर यांच्यावर जीव होता.
अशोक हांडे यांनी पी. सावळाराम, माणिक वर्मा, स्नेहल भाटकर, लतादीदी अशा व्यक्तीमत्त्वांवर संगीतगाथा साकार केली.. महानोर हा विषयही त्याच ताकतीचा आहे… अशोकराव… बघा जमतंय का…? आर्थिकदृष्ट्या असे कार्यक्रम अवघड असतात… रसिक प्रतिसाद कमी देतात.. पण, एकदा तरी महानोरांची कविता तुमच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रासमोर यायला हवी.  ‘आम्ही ठाकरं ठाकरं’ हे गीत तुमच्या ‘मराठी बाणा’ यात आहेच… ते महानोर यांचेच आहे.

सध्या एवढेच…

📞

 9892033458

 125 Total Likes and Views

0 Comments

No Comment.