देवपूजेस पुष्पे कशी असावीत ?

Hi Special News
Spread the love

शिळी नसलेली, भोके न पडलेली, प्रोक्षण केलेली, जंतुरहित असून आपल्या बागेत उत्पन्न झालेली पुष्पे मुख्य आहेत. अशा पुष्पांनी देवाची भक्तीने पूजा करावी. किड्यांनी भक्षिलेली,गळलेली, शिळी झालेली, आपोआप पडलेली व मलादिकाने खराब झालेली पुष्पे देवपूजेस घेऊ नयेत. न फुललेल्या कळ्या व न पिकलेली व किडे असलेली फळे यांनी देवपूजा करू नये. पुष्पे न मिळाल्यास पत्रांनी, पत्रे न मिळाल्यास फळांनी व फळे न मिळाल्यास दूर्वादि तृणे, गुल्म (वल्लीच्या तंतूचे गुच्छ) व ओषधि यांनी पूजा करावी. समिधा, पुष्पे व दर्भादि पदार्थ ब्राह्मणाने स्वतः आणावेत. पतीताकडून आणलेल्या व विकत घेतलेल्या पुष्पादिकांनी पूजा करणारा अधोयोनीस जातो. लक्ष पुष्पांनी पूजा करणे असण्यास विकत घेतलेल्या पुष्पांनीही करावी. “न्यायाने संपादिलेल्या द्रव्याने विकत घेतलेल्या पुष्पादिकांनी पूजा करणारास दोष नाही; व माळ्याच्या येथील पुष्पांसही शिळेपणाचा दोष नाही” असे वचन असल्यामुळे माळ्याकडून विकत आणलेल्या पुष्पांनी पूजा करितात. नित्य पूजेकरिता दुसर्याच्या बागांतून अथवा इतर स्थलांहून पुष्पे, पत्रे इत्यादि आणली असता चोरीचा दोष नाही. पूजेसाठी पुष्पे, पत्रे इत्यादिकांची याचना करू नये. समिधा, पुष्पे, दर्भ इत्यादि पूजासाहित्य नेत असता त्यास कोणी नमस्कार करू नये. व त्यानेही कोणास नमस्कार करू नये. कारण, तसे केले असता जवळ असलेले पूजासाहित्य निर्माल्य होते. देवास वाहिलेले, केवळ डाव्या हातात घेतलेले, नेसलेल्या वस्त्रांत घेतलेले व पाण्यात घालून धुतलेले पुष्प निर्माल्य होय. शिळे फूल व पाणी वर्ज्य करावे. तुलसीपत्रे व तीर्थोदके ही पर्युषित म्हणजे शिळी असली तरी वर्ज्य नाहीत. जाईचे फूल एक प्रहरपर्यंत व कण्हेरीचे फूल एक अहोरात्रपर्यंत शिळे होत नाही. तुळसी, बिल्वपत्रे, कुंदपुष्पे, दवणा, अगस्तीची (हतग्याची) फुले व कळ्या शिळ्या होत नाहीत.
बिल्वादि पत्रे व पुष्पे किती दिवसपर्यंत शिळी होत नाहीत; त्या दिवसांची संख्या प्रत्येकापुढे दिली आहे. बिल्व ३० आघाडा ३ जाई १ तुलसी ६ शमी ६ शतावरी ११ केतकी ४ भृङ्गराजः ९ दूर्वा ८ मन्दार १ पद्मं १ नागकेसर २ दर्भा ३० अगस्त्य ३ तिल १ मल्लिका ४ सोनचाफा ९ व कण्हेर ८, इतक्या दिवसांनंतर ही फुले शिळी होतात.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

 116 Total Likes and Views

0 Comments

No Comment.