‘गेल्या दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही…’ पुढच्या दहा हजार वर्षांत असा माणूस होणे नाही…..

Editorial
Spread the love

रविवार, दिनांक १३ अॅगस्ट रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची १२५ वी जयंती आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी सासवड तालुक्यात कोडित या छोट्या गावात जन्माला आलेल्या या माणसाने आपल्या ७१ वर्षांच्या आयुष्यात जीवनामधील असे एकही क्षेत्र ठेवले नाही की जे या माणसाने पादाक्रांत केले नाही. नुसतेच पादाक्रांत केले नाही तर, ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले तिथे त्याच माणसाचे नाव ठळळपणे सव्वाशे वर्षांनंतर घेतले जात आहे. ग. दि. माडगुळकरांच्या भाषेत सांगायचे तर
‘सर्वांगाने भोगी जीवन
तरीही ज्याच्या ऊरी विरक्ती
साधूत्वाचा गेला पूजक
खचली, कलली श्री शिवशक्ती’
अत्रेसाहेब गेले त्या दिवशी म्हणजे १३ जून १९६९ ला रात्री ११ वाजता माडगुळकरांनी त्यांच्या माहीमच्या घरी, दारात उभे राहून या ओळी सांगितल्या होत्या. १४ जून १९६९ च्या मराठा दैनिकात याच ओळी पहिल्या पानावर छापल्या गेल्या. आचार्य अत्रे यांचे नेमके वर्णन आण्णांनी या चार ओळींत केलेले आहे. जीवनाचा चौफेर आनंद उपभोगताना अत्रेसाहेबांच्या आध्यात्माची बैठक एवढी खोल होती की, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्यांच्या उशाशी तुकारामाची गाथा ठेवलेली होती.  अत्रेसाहेबांच्या सासवडवरूनच देहू- आळंदीची पालखी पंढरपूरकडे रवाना होते. लहानपणापासून अत्रेसाहेब ते पाहात होते. त्यामुळे ज्ञाानोबा आणि तुकोबा त्यांनी आत्मसाद केले होते. त्यांच्या एका नाटकातील गीतातच त्यांनी म्हटले आहे की,
‘देह देवाचे मंदिर…
ज्यात आत्मा परमेश्वर
‘तुका’ सांगे, मूढ जना….
देही देव का पहाना…’
या ठिकाणी तुका हा शब्द अत्रेसाहेबांनी मुद्दाम वापरला आहे. अभंग अत्रेसाहेबांचा… पण, ते म्हणाले की, तुकोबाचे नाव घातले की, सामान्य माणसं मनोभावे तो अभंग म्हणतील…
अत्रेसाहेब हे एकगुणी नव्हते. बहूगुणी होते. ‘अत्रे एक की दहा…’ असा प्रश्न पडेल… इतक्या विविध क्षेत्रात त्यांच्या कर्तृत्त्वाला मर्यादा नव्हत्या. महराष्ट्रात अशी व्यक्ती मला दाखवा की, ज्या व्यक्तीचा दहा क्षेत्रांत असलेला दबदबा एवढा दुसरा माणूस कोण आहे? कोणत्याही क्षेत्रात अत्रेसाहेबांनी जिथे पाऊल ठेवले तिथं सगळ्यात उंच आणि उंच अत्रेसाहेबच होते. व्यक्ती म्हणून उंचीमध्ये ते उंच होतेच… कोणत्याही सभेत शेवटचे भाषण त्यांचेच असायचे. आणि त्यांच्याकरिता माईक व्यवस्था करणाऱ्याला सहा ते आठ इंच माईक उंच करायला लागायचा… शारिरीक धिप्पाडपणा आणि उंची याचबरोबर ज्या विषयाला हात घालतील, त्या विषयाची खोली या कशातही अत्रेसाहेब कधीच कमी पडले नाहीत. एक भूगोलाचा शिक्षक… पुण्याची वाह्यात शाळेतील विद्यार्थ्यांना कशी शिस्त लावतो… ती कॅम्प एज्युकेशन सोसायटी… उत्तम भूगोल शिक्षक… शिक्षकाचे झाले कवी…. कवीचे झाले विडंबन कवी. आणि असे विडंबन की, त्यांच्या ‘झेंडूची फुले’ या एका कवितासंग्रहाची उंची गेल्या ७५ वर्षांत कोणालाही गाठता आलेली नाही. झेंडूच्या फुलाच्या देठात एक खोबरं असतं… आम्ही मुले लहान असताना त्या देठातील ते खोबरं खायचो… ते कधीच खवट लागायचं नाही… अत्रेसाहेबांच्या ‘झेंडूची फुलं’ कविता संग्रहाला आता ८० वर्षे लोटली… तरीही त्यातील प्रत्येक कवितेतील फूल आतल्या खोबऱ्यासकट कसे अजूनही ताजे आहे… कवी झाले… विडंबनकार झाले… मग पुण्यातील वक्ता… मग पुण्याच्या नगरपरिषदेचा नगरसेवक… पुण्यातील त्यावेळच्या भांबुर्डाचे ‘शिवाजीनगर’ करणारे अत्रेच… पुण्याच्या ‘रे’ मार्केटचे ‘फुले मार्केट’ करणारे अत्रेच… पुण्यात ‘पी. एम. टी.’ बससेवा सुरू करणारे अत्रेच… पुण्याचे रस्ते डांबरी करणारे अत्रेच… पुण्यानेच त्यांना घडवले… आणि काही प्रमाणात बिघडवलेही… हे त्यांचेच वाक्य आहे. नगरसेवक असताना, काँग्रेसचा तुफानी प्रचार करणारे अत्रेच… काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेसला तेवढ्याच आवेषाने झोडपणारे अत्रेच… क्रांतीसिंह नाना पाटील यांच्यावर ‘नवयुग’चा विशेष अंक काढून त्यांना ‘क्रांतीसिंह’ ही पदवी देणारेही अत्रेच… सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ म्हटले जाते… ही पदवी देणारेही अत्रेच… पुण्यातून मुंबईला आल्यावर ‘नवयुग’ साप्ताहिक सुरू करून पत्रकार आणि संपादक होणारे अत्रेच… मग नाट्यसृष्टीत प्रवेश करून… ‘साष्टांग नमस्कार’… ‘घराबाहेर’… ‘उद्याचा संसार’… ‘पाणीग्रहण’… ‘जग काय म्हणेल..’ ही गाजलेली सामाजिक नाटके संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापूर्वीची… आजही हाऊसफुल होणारी. महान नाटककार अत्रेच… नंतर चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर त्यांनी निर्माण केलेल्या ‘शामची आई’ या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळवणारे अत्रेच… त्या चित्रपटाच्या स्पर्धेत प्रख्यात दिग्दर्शक िबमल रॅाय यांचा ‘दो बिघा जमीन…’ आणि सोहराब मोदी यांचा ‘झाँसी की रानी’ हे दोन चित्रपट असताना आणि सात परिक्षकांत एकही मराठी परीक्षक नसताना, ‘शामची आई’ चित्रपटाला सुवर्णपदक मिळवून देणारे अत्रेच… दुसऱ्याच वर्षी ‘महात्मा फुले’ चित्रपटाला राष्ट्रपतींचा ‘रजत’  पुरस्कार मिळवणारे अत्रेच… त्यानंतर महाराष्ट्राला समजलेले किमान ५० वर्षे ज्यांच्या तोडीचा वक्ता झाला नाही… आणि आजही एवढा मोठा वक्ता नाही… ते महाराष्ट्रातील कायमचे लोकप्रिय वक्ते अत्रेच… असा वक्ताही पुन्हा होणे नाही… आणखी एक मोठा पैलू म्हणजे जो दुर्लक्षित झाला. प्रस्तावनाकार म्हणूनही अत्रेच… ‘बी’. कवी (मुरलीधर नारायण गुप्ते) यांच्या ‘फुलांची ओंजळ’ या अवघ्या ४६ कवितांच्या काव्यसंग्रहाला ७६ पानांची प्रस्तावना लिहणारा हा एकमेव प्रस्तावनाकार… अमर शेख यांच्या ‘कलश’ या काव्यसंग्रहाला २५ पानांची प्रस्तावना लिहिणारा हा प्रस्तावनाकार…. आणि मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असो… स्वागताध्यक्ष असो… विधानसभेत आमदार असो… आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्याचे सेनानी असोत… तिथेही आचार्य अत्रे यांच्या तोडीचा वक्ताही नाही… आणि नेताही नाही… संयुक्त महाराष्ट्रासाठी ‘नवयुग’ आग ओकत होता… पण ते साप्ताहिक होते… शिवाजी पार्क येथील सभेत सेनापती बापट यांनी अत्रेसाहेबांना अाज्ञाा केली की, ‘आपले साप्ताहिक अपुरे पडत आहे…. दैनिक काढा…’ ही गोष्ट मे १९५६ सालची…. त्याच सभेत उभे राहून अत्रेसाहेब घोषणा करतात… ‘सहा महिन्यांत दैनिक सुरू करीन…. आणि त्याचे नाव ‘मराठा’ असेल….’ आणि बरोबर सहा महिन्यांत १५ नोव्हेंबर १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे हत्यार म्हणून ‘मराठा’ सुरू होतो. अत्रेसाहेबांची आठ कॉलमची शिर्षके, त्यांचे अग्रलेख… यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांना घाम फुटेल एवढ्या प्रखर शब्दांत आगीच्या गोळ्यांचा वर्षाव अत्रेसाहेबांच्या शब्दांतून होत होता. त्यांच्या भाषणांतून होत होता… या पाच वर्षांच्या लढ्यात अत्रेसाहेब तहान-भूक विसरले.. आपण नाटककार होतो… चित्रपटकार होतो… कवी होतो… साहित्यिक होतो…. हे सगळं विसरून गेले… मला फक्त आणि फक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करायची आहे… मराठी माणसांची मुंबई महाराष्ट्रापासून मी तोडू देणार नाही. या एकाच निर्धाराने दोन हातांत दोन दांडपट्टे घेवून एखाद्या लढवय्याने लढावे, तसा लेखणीचा दांडपट्टा करून अत्रेसाहेब पाच वर्षे लढत राहिले. म्हणूनच धगधगणाऱ्या निखाऱ्यासारखे शब्द त्यांच्या लेखणीतून बाहेर पडू लागले. शिवाजी पार्क येथील सभांतून अग्नीवर्षाव होवू लागला. संयुक्त महाराष्ट्राचा जो-जो विरोधक तो-तो महाराष्ट्राचा शत्रू. एवढी पराकोटीची महाराष्ट्रनिष्ठा…. त्यांच्या त्या पाच वर्षांतील शब्दाशब्दांत व्यक्त होत होती. त्या काळात साहित्य निर्मितीच्या वाट्याला ते गेले नाहीत.  महाराष्ट्राच्या शत्रूंना त्यांनी क्षमा केली नाही. मोरारजी देसाईंनी १०५ माणसं गोळीबारात मारली. म्हणून मोरारजी यांना ‘नरराक्षस’ या शब्दांत त्यांनी झोडपून काढले. विनोबांनी सहज म्हटले की, ‘मुंबई महाराष्ट्रात राहिली काय आिण न राहिली काय….’ त्या एका वाक्यावर संतापून अत्रेसाहेबांच्या लेखणीतून अग्रलेख आला…. ‘विनोबा की, वानरोबा…’ आपल्या आध्यात्म गुरुलाही त्यांनी झोडपायला कमी केले नाही… जो-जो संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने उभा राहिला, त्याला डोक्यावर घेवून नाचायलाही साहेबांनी कमी केले नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या ध्यासाने ते पछाडलेले होते. ‘मुंबईला कोणी हात लावेल तर हात कलम करू,’ ही त्यांची प्रखर भाषा होती… मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक नानू निछा पटेल यांनी महापालिकेत भाषण करताना आरोप केला की, ‘उद्या संयुक्त महाराष्ट्र झाला तर मराठी लोक गुजराती स्त्रियांवर बलात्कार करतील…’ या भाषणाला मोठी प्रसिद्धी मिळाली… चार दिवसांच्या आत दैनिक मराठामध्ये अत्रेसाहेबांनी बाॅम्ब फोडला…. याच नानू निछाने त्यांच्या घरातील मराठी मोलकरणीवर बलात्कार केल्याचे प्रकरण पहिल्या पानावर साहेबांनी छापले. उद्देश असा होता की, महाराष्ट्र विरोधकांना जरब बसावी. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शत्रूंना झोडपायला शब्द बाकी ठेवले नाहीत…  आिण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी जे- जे कोणी लढत होते त्यांना डाेक्यावर घेवून नाचायला साहेबांना सगळ्यात मोठा आनंद व्हायचा… साध्या साध्या कार्यकर्त्यांना त्यांनी प्रचंड मोठे केले.  अहिल्या  रांगणेकर या त्यावेळच्या महिला कार्यकर्त्या. त्या सत्याग्रहात उतरल्या. अत्रेसाहेबांनी मराठात आठ कॉलम शिर्षक देवून अहिल्या रांगणेकर यांना अमर करून टाकले… ते शिर्षक होते,
‘रणरागिणी अहिल्या
समरांगणा निघाली…’
अर्थमंत्री  चिंतामणराव देशमुख यांनी पंडित नेहरू यांच्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देवून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला मोठे बळ दिले अत्रेसाहेबांच्या मराठात आठ कॉलम शिर्षक आले…
‘चिंतामणी.. देशाचा कंठमणी झाला…’
१९५७ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त सहा आमदार निवडून आले. त्यात कराड मतदारसंघात यशवंतराव चव्हाण यांनी समितीचे उमेदवार केशवराव पवार यांचा १००० मतांनी पराभव केला. यशवंतराव विजयी झाल्यामुळे संयुक्त महराष्ट्र समितीला थोडासा धक्का बसला… आचार्य अत्रे यांच्या मराठातील एका शिर्षकाने एका दिवसात वातावरण बदलले… ते शिर्षक होते,
‘तानाजी पडला… तरी
संयुक्त महाराष्ट्राचा सिंहगड
समिती जिंकणारच…’
शब्दासाठी अत्रेसाहेब कधी अडले नाहीत…. त्यांच्या मनात निर्मळपणा होता… याची जनतेला खात्री होती. त्यामुळे त्यांची टीकाही व्यक्तिगत द्वेषातून नव्हती. तर संयुक्त महराष्ट्राच्या लढ्यासाठी होती. श्री. स. का. पाटील यांनी म्हटले होते की, ‘सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही….’ अत्रेसाहेब गरजले…. ‘अरे सदोबा, सूर्य-चंद्र तुझ्या बापाचे नोकर आहेत का?’ एक गंमत अशी की, आचार्य अत्रे यांचा जन्म १३ अॅागस्ट… स्वातंत्र्य मिळाले १५ अागस्टला… स. का. पाटील यांचा जन्म १४ अॅागस्टचा… आचार्य अत्रेसाहेब सभेत सांगायचे….
‘मी १३ अॅागस्टला जन्माला आलो…
१५ अॅागस्ला स्वातंत्र्य मिळाले…. दोन चांगल्या गोष्टीच्या मध्ये एक वाईट गोष्ट घडते… म्हणून १४ अॅागस्टला सदोबा पाटील जन्माला आला… ’ खिल्ली उडवावी तर साहेबांनीच…. पण त्यातही दुष्टपणा नव्हता…. मनाच्या मोकळेपणातूनच ते बोलत होते आणि लोकही त्याच भावनेने ते स्वीकारत होते… कोणाचीही स्तुती करताना साहेब इतक्या सहजपणे म्हणायचे, ‘ग. दी. मांचे गीत रामायण ऐकल्यावर साहेब लगेच म्हणाले…. ‘असा कवी दहा हजार वर्षांत झाला नाही… ’ पण हे केवळ ग. दी. मा. यांच्याकरिता नाही… अफाट स्तुती हा त्यांचा एक मनाच्या मोकळेपणाचा गुणविशेष होता. खंडाळ्यात एक भजीवाला होता…. साहेबांचा खंडाळ्याला बंगला होता… तिथं जाता-येता गाडी थांबवून ते गरम गरम भजी खायचे… त्या भजीवाल्यावर साहेबांनी लिहिले…. काय लिहिले…. ‘लाखो रुपयांची भजी रोज विकतो… असा भजीवाला दहा हजार वर्षांत झाला नाही….’ खंडाळ्याच्या घाटात कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यासाखे साहेबांचे मन नितळ होते… त्यांनी ज्यांना दुखावले तेही मनातून सुखावले होते.. कारण अत्रेसाहेबांनी टीका करणे यात त्यालाही मोठेपणाही वाटायचा… मधू लिमये यांच्यावर त्यांनी एकदा अग्रलेख लिहिला…. शिर्षक होते, ‘अधू मेंदूचा मधू…’ मधू लिमये ‘मराठा’त आले… साहेबांना भेटले…. आणि म्हणाले ‘मला तुम्ही आज अमर केले. मी अग्रलेखाचा विषय होणे हाच माझा सन्मान…’
प्रख्यात कादंबरीकार ना. सी. फडके यांचा  आणि साहेबांचा उभा वाद…. पुढे पुण्यातील संभाजी पार्कमध्ये अत्रेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली ना. सी. फडके यांचा सत्कार झाला… तिथे साहेबांनी त्यांची एवढी स्तुती केली की, फडके म्हणाले, ‘याच साहेबांनी माझ्यावर अग्रलेख लिहिला होता… त्याचे नाव होते ‘फडक्यांच्या चिंध्या…’ आणि आज त्यांनी माझ्यावर सोनेरी शाली पांघरल्या….’
चांगल्याला चांगले म्हणणारा… असा पत्रकार झाला नाही… समाज घातक शक्तींना झोडपणाराही असा पत्रकार झालेला नाही. धमक्यांची पर्वा न करता अत्रेसाहेब लिहीत रािहले, बोलत राहिले… सरकार चुकेल तिथे सरकारला झोडपत राहिले… मिस्सा कायद्याखाली तुरुंगातही गेले… पण त्यांनी आपले शब्दस्वातंत्र्य कधीही गहाण ठेवले नाही.  आज अत्रेसाहेब हवे होते, ते त्यामुळेच… आज अत्रेसाहेब असते तर पेटलेल्या मणिपुरमध्ये ‘मराठा’चा प्रतिनिधी कधीच पोहोचला असता.  चीन असो नाहीतर पाकिस्तानचे आक्रमण असो… मराठाचा प्रतिनिधी सगळ्यात आगोदर अत्रेसाहेबांनी पाठवला. त्यांच्यएवढा मर्द पत्रकार बघितला नाही. पुण्यात त्यांच्यावर संघ स्वयंसेवकांनी हल्ला केला होता… हल्ला झाल्यानंतर शर्ट फाटला होता… तरीही एक तास त्यांनी भाषण केले. त्यानंतर ‘नवयुग’चा अग्रलेख होता… ‘मला मारणारे मेले… मी जिवंत आहे…’ अत्रेसाहेब, महाराष्ट्रासाठी तुम्ही कायमचेच जिवंत आहेत… तुम्ही नसतात तर मुंबईसह महाराष्ट्र कसे झाले असते…? आणि या महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र राज्य’ हे नावसुद्धा तुमच्या शेवटच्या दणक्यामुळेच मिळालेले आहे.
साहेब, तुमच्यामुळे माझ्यासारख्या एका छोट्या पत्रकाराच्या आयुष्याचे तर सोने झाले. माझ्यासाठीसुद्धा तुमचेच शब्द वापरून पुन्हा पुन्हा म्हणतो…. ‘दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही… पुढच्या दहा हजार वर्षांत असा माणूस होणार नाही….’ पुढचा जन्म असेल तर पुन्हा मला ‘मराठा’त घ्या…

📞

 9892033458

 127 Total Likes and Views

0 Comments

No Comment.