यंदा नागपंचमी केव्हा?

Hi Special News
Spread the love

        श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी.  हिंदू धर्मात नागांच्या पूजेचा हा पवित्र सण खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख-शांती राहते, असे म्हटले जाते. अनेक जण नागपंचमीच्या दिवशी उपवासही करतात. या दिवशी गरजूंना दान करणे खूप शुभ मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. यावेळी नागपंचमीचा सण २१ ऑगस्ट, सोमवारी साजरा केला जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी पंचमी तिथी २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.२१ वाजता सुरू होईल आणि पंचमी तिथी २२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता समाप्त होईल. नागपंचमीच्या पूजेची वेळ पहाटे ५.५३ ते ८.३० अशी असेल.

       नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असल्यामुळे नागपंचमी हा सण व्रत आणि उत्सव अशा दोन्ही स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी लाकडी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढून किंवा मातीचे नाग आणून त्यांची पूजा केली जाते. लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याची पूजा करतात. ब्राह्मणाला भोजन घालून स्वतः एकभुक्त राहतात. हे व्रत केल्यामुळे घरात सापांचे भय राहात नाही, अशी परंपरागत श्रद्धा आहे.
    नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी भगवान शंकराची, नागाची पूजा करतात आणि रुद्राभिषेक करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे संपतात, असे म्हटले जाते. तसेच जर कुंडलीत राहु आणि केतूपासून काही दोष असेल तर या दिवशी नागांची पूजा केल्याने राहु आणि केतू ग्रहांचे अशुभ परिणाम देखील दूर होतात, अशी देखील श्रद्धा आहे. पूर्वी गारुडी ह्या दिवशी नाग घेऊन  घरोघरी फिरत. नव्या व्यवस्थेत नाग फिरवायला मनाई आहे. सापांबद्दल खूप गैरसमज आहेत.  लोकांनी ते समजून घ्यायला हवेत. नाग दुध पीत नाही.  तो शेतकऱ्यांचा मित्र आहे एवढे समजून घेतले तरी पुरे.

 34 Total Likes and Views

0 Comments

No Comment.