चंदा मामा दूर से…नाही. नजदीक से. सारे काही व्यवस्थित पार पडले तर २३-२४ ऑगस्टला भारताचे यान चंद्रावर उतरलेले असेल. भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ मोहिमेबद्दल एक मोठी अपडेट इस्रोकडून आली आहे. चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून १४ जुलै रोजी करण्यात आले होते. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. आज चांद्रयान मोहिमेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. चांद्रयान-३च्या प्रॉपल्शन मॉड्यूलपासून लँडर विक्रम वेगळे झाले आहे. आता लँडर विक्रम चंद्रावर लँड होण्यासाठी एकटेच प्रवास करेल.
भारतीय अंतराळ संशोधनाचे पितामह विक्रम साराभाई यांच्या नावाने लँडरचे नाव विक्रम ठेवण्यात आले आहे. प्रॉपल्शन मॉड्यूलने लँडर विक्रमला त्याच्या योग्य ठिकाणी पोहोचवले.जेव्हा प्रॉपल्शन मॉड्यूलपासून लँडर विक्रम वेगळे झाले त्यानंतर इस्रोने ट्विट करून ही माहिती दिली.
भारताच्या या मोहिमेवर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर चंद्राच्या भूमीवर उतरणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. चंद्राच्या भूमीवर अवघड अशी सॉफ्ट लँडिंग करण्याचे कौशल्य मिळवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल. चांद्रयान-२ मोहिमेत सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले होते. या आधी विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंगच्या वेळी ब्रेकिंग प्रणालीत झालेल्या गडबडीमुळे चंद्राच्या भूमीवर आदळले होते. इस्रोने २००८ साली चांद्रयान-१ मोहिम सुरु केली होती. गेल्या पंधरा वर्षातील भारताची ही तिसरी चंद्र मोहिम आहे.गेल्या १ महिना ३ दिवसांपासून प्रॉपल्शन मॉड्यूलच्या पाठीवर लँडर विक्रम होता. लँडरला यशस्वीपणे चंद्राच्या दिशेने सोडल्यानंतर आता प्रॉपल्शन मॉड्यूल अंतराळात गायब होईल. दुसरीकडे लँडर विक्रम चंद्राच्या जमीनीकडे रवाना झाले आहे. आता सर्वांना प्रतिक्षा असेल ती २३ आणि २४ ऑगस्टची, जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले जाईल.
31 Total Likes and Views