भक्तांचे जीव, जागृत देव का वाचवत नाहीत ?

Analysis
Spread the love

काल राखी पौर्णिमेला वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावात जागृत तुळजा भवानी मंदिरावरील झेंडा बदलण्याच्या प्रयत्नात तीन निरपराध भक्तांचा विजेचा धक्का लावून मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत शेगावला गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दोन साडू भावांचा बाळापूर जवळ अपघाती मृत्यू झाला , अश्या देव,मंदिराशी संबंध असणाऱ्या असंख्य घटना नियमितपणे घडतात मात्र त्यातील एकाही घटनेत देवाने कुणाला वाचवले असे होत नाही,या घटनांत अनेकदा चिमुकली मुले सुद्धा असतात.
काही महिन्यांपूर्वी बाळापूर तालुक्यातील पारस मध्ये बाबूजी महाराज या जागृत संस्थानात सुद्धा वृक्ष कोसळून 7 भाविकाना मरण पत्करावे लागले.चार दिवसांपूर्वी वसई येथील स्वामी समर्थ यांची घरात पूजा करून त्याचे निर्माल्य समुद्रात विसर्जित करायला गेलेले बापलेक पाण्यात बुडाले,तिथेही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारे स्वामी हमखास गैरहजर होते. अश्या घटनांच्या बातम्यांची कात्रणे गोळा करायची झाल्यास वर्षभरात भलीमोठी वही भरून जाईल पण घटना काही थांबणार नाहीत.
अध्यात्म आणि कर्मवीपाक सिद्धांत मोठा गजब असतो,तो कोणत्याही घटनेचे आपल्या बाजूने सुंदर समर्थन करतो.लोकांना आधीच कथा,प्रवचन,कीर्तन,पोथ्या यातून सांगून ठेवलेले असते की सगळे काही त्याच्या (म्हणजे देवाच्या) हातात आहे,त्याने आधीच तुमचे नशीब लिहून ठेवलेले आहे,त्यानुसार जन्म कुठे होणार ? मृत्यू कुठे अन कसा होणार हे सगळे तोच ठरवत असतो.असे आपल्यावर ठसवले जाते.काहीही करून दोष देव,धर्म किंवा महाराज यांच्यावर जाणार नाही अशी व्यवस्था केली असते.वाईट झाले तर तुमचे कर्म जबाबदार अन चांगले झाले तर देव जबाबदार या चक्रात आपण हजारो वर्षे अडकले आहोत.
आपल्या देशात दर दोन कोसांवर जागृत देव,देवस्थाने आहेत, लोकांना मानसिक आजारामुळे त्याचे अनुभव सुद्धा येतात.या अनुभवांचे काहीच खरे नसते,आपल्या समाजात भक्तांना कशाचेही अनुभव येतात.बलात्कार अन खुनाच्या आरोपात शिक्षा भोगत असणाऱ्या आसाराम बापू अन गुरुमीत राम रहीम यांचेही लोकांना अनुभव आले आहेत,त्यांच्या संस्थान कडून प्रकाशित होणाऱ्या मासिकात आजवर हजारो भक्तांनी अनुभव कथन करून हे सगळे बदमाश कसे साक्षात देवाचे अवतार कसे आहेत हे सांगितले आहे,हातात बेड्या पडल्यावर या सगळ्यांची कथित दैवीशक्ती कुठे गायब झाली हे कुणी सांगत नाही तरीही श्रद्धा अतिशय घातक असते ,आजही आसाराम भक्त मोर्चे,प्रभातफेरी काढून बापू कसे निरपराध आहेत हे सांगत असतात.
देव कधीच कुणाच्या मदतीला येत नाही,ती एक प्रेरक निशाणी म्हणून आपल्या समोर असेल तर सगळे काही आपणच केले पाहिजे असे स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत.आपल्या संतांनीही देव कधी कोणाला भेटला नाही,भेटणार नाही हे सांगून ठेवले आहे,काही मानवीय मूल्ये आपल्यात निर्माण केली की आपणच कसे देव होतो हे संत तुकारामांनी अतिशय सोप्या शब्दात मांडून ठेवले आहे.पण लोकांच्या ते कितीही शिकले तरी लक्षात येत नाही. बरं आपला देव मदतीला येत नाही अन इतरांचा येतो असेही अजिबात नाही,मुस्लिमांचा अल्लाह,ख्रिश्चनांचा गॉड, आणि सगळ्या धर्मांचा जो कुणी देव असेल तो कधीही कुणाच्या मदतीला येत नाही,मदतीला आल्याचे आभास भक्त निर्माण करतात.आम्ही पत्रकार अनेकदा देव तारी त्याला कोण मारी अश्या बातम्या डोके गहाण ठेवून देत असतो. अपघातात एखादा वाचला तर देवाने वाचवले मग जे मेले त्यांनाही देवानेच मारले असावे ना,पण आपल्या देशात मरण कर्माने अन जीवदान भाग्याने मिळते असा वैचारिक गोंधळ तयार करण्यात आला आहे.
कोट्यवधी लोकांचा हा गोंधळ पुढे असंख्य पंथ, उपपंथ ,बाबा,स्वामी,बापू ,आचार्य यांनी एवढा वाढवून ठेवला आहे की घडलेल्या घटनांचा हजार प्रकारे अर्थ,अन्वयार्थ काढण्यात लोकांना गुंतवून ठेवले आहे,ही सगळी धार्मिक दुकानदारी ज्यांच्या लक्षात आली ते हकुच बाजूला झाले आहेत,त्यांनी विवेक अन विज्ञान यांची कास धरली आहे,ज्यांच्या डोक्यात अजून उजेड पडला नाही ते हजारो वर्षे पाप,पुण्याचे पाणी तोडत त्यातच गटांगळ्या खात आहेत,बहुजन समाज या अवस्थेत आल्यावर ज्यांची खरी कमाई सुरू होते ती सगळ्या धर्मातील पुरोहितशाही आपली मोठी मजा घेत आहे,बघा यातून बाहेर पडण्याची इच्छा असेल तर….

-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -9892162248

 848 Total Likes and Views

0 Comments

No Comment.