व्वा…. नितीनभाऊ, काय नेमके बोललात

Editorial
Spread the love

श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या परंपरेतील भाजपाचे प्रतिनिधी सध्याचे शेवटचे नितीन गडकरी हेच आहेत, असे म्हणावे लागेल. किंबहुना त्या काळातील भाजपाच्या नेत्यांचा राजकीय मोकळेपणा, राजकारणात मित्रत्व, लोकशाही संस्थांचा आदर आणि विरोधकांना शत्रू न मानता मोकळ्या मनाने त्या त्या पक्षाशी वागणारे त्यावेळचे सत्तेमधील नेते अशी या पक्षाची अनेक वर्षाची प्रतिमा. ‘जनसंघ ते भाजपा’ ही वाटचाल खडतर… संघर्षाची… पण चारित्र्याची. अलिकडच्या भाजपाची त्या नेत्यांची, त्या वातावरणाची आणि त्या चारित्र्याची, तुलना अजिबात करता येणार नाही. २०१४ ला भाजपा सत्तेमध्ये आल्यापासून बरेच काही बिघडले आहे. आणि त्याचे परिणाम देशाला भोगावे लागत आहेत. त्यापूर्वी केंद्रीय सत्तेमध्ये भाजपा पंतप्रधान म्हणून वाजपेयींच्या रूपात पहिल्याप्रथम आला. त्या आगोदर अनेक वर्षे म्हणजे भाजपाची स्थापना झाल्यापासून ही घोषणा भाजपा अधिवेशनात दिली जायची… ‘प्रधानमंत्री की आगली बारी……. अटलबिहारी…’ तसा इितहास पाहिला तर १९५७ साली श्री. अटलबिहारी वाजपेयी लोकसभेमध्ये पहिल्यांदा बलारामपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्या शेजारी येवून बसले ते जनसंघाचे एकमेव दुसरे खासदार रत्नागिरीचे प्रेमजीभाई आशर. १९५७ साली जनसंघाचे दोनच खासदार होते… अमेरिकेचे राष्ट्रपती आयसेन हॉवर जेव्हा भारतात डिसेंबर १९५९ मध्ये पहिल्याप्रथम आले त्यांची संसदेतील मध्यवर्ती सभागृहात खासदारांशी भेट करून देण्यात आली. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी ती भेट करून दिली. प्रत्येक खासदाराची ओळख करून दिली. श्री. अटलबिहारी वाजपेयी यांची ओळख करून देताना पंडितजी सहजपणे बोलून गेले होते की, … ‘ही इज मिस्टर वाजपेयी… फ्युचर प्राइम मिनिस्टर अॅाफ इंडिया…’ नेहरूंना लांबचे दिसत होते आणि जे दिसते ते सांगण्याचा मोकळेपणाही त्यांच्याजवळ होता. नेहरू यांचे १९५९ सालचे शब्द ३० वर्षांनी खरे झाले. वाजपेयी पंतप्रधान झाले… पण, लोकशाहीची सगळी पथ्ये पाळून… त्यांनी सर्वांचे प्रेम मिळवले. त्यांचे सरकार एका मताने पडले तेव्हाही, सरकार पाडणाऱ्या कोणाबद्दलही त्यांच्याकडून अवमानकारक एकही शब्द उच्चारला गेला नाही. किंवा आधी चार दिवस कोणाही खासदारांच्या मागे ई.डी, बी. डी., सी.डी, सी. बी. आय… या यंत्रणांचा ससेमारा लागला नाही. लोकशाहीतील यश आणि अपयश समतोल वृत्तीने स्वीकारण्याची एक उदार मनोवृत्ती वाजपेयींजवळ होती. वाजपेयींच्या नंतरचा भाजप फार वेगळा भाजपा आहे. त्याचे पक्षाचे स्वरूत पार बदलून गेले आहे. ते व्यक्तीवाचक झालेले आहे. लोकशाहीतून मिळालेल्या बहुमताला नकळत दहशतीचे स्वरूप दिले गेलेले आहे. ज्याचा अनुभव आज देश करीत आहे. या सगळ्या भाजपाच्या आजच्या नेत्यांमध्ये स्तुतीपाठकांची स्पर्धा आहे. पक्ष आिण सरकारमधील ज्या गोष्टी पटत नाहीत, ते स्पष्ट बोलण्याची हिम्मत कोणाजवळही राहिलेली नाही. मला आठवते की, १९६६ साली कालितकच्या जनसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यावेळचे पक्षाचे अध्यक्ष पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या भाषणापूर्वी अनेक नेत्यांनी काही पक्षांतर्गत चुकीच्या गोष्टींवर टीका केली होती. पंडित उपाध्याय यांनी त्या टीकेचे स्वागत केले. ‘मराठा’तर्फे मी ते अधिवेशन कव्हर करायला गेलो होतो आणि मुंबई जनसंघाचे अध्यक्ष डॉ. वसंतकुमार पंडित यांच्या अग्रहामुळे, आचार्य अत्रेसाहेबांनी मला कालिकतला मुद्दाम पाठवले होते. ते नेते आणि तो काळ… ते चारित्र्य आज आता कुठे दिसत नाही. काळाचा महिमा असेल किंवा हाती मिळालेल्या अफाट सत्तेचा गरिमा असेल… पण, जे घडते आहे आणि ज्याचा उदो-उदो चालू आहे, हे सगळे अंगावर उतणारे आहे. त्यामुळे भाजपामधील निष्ठावंत मूळ जुन्या नेत्यांची अस्वस्थाता जाणणारा एकच नेता आज आहे… आजच्या भाजपामध्ये दिसतो आहे, त्यांचे नाव नितीन गडकरी.
त्यामुळे त्यांचे स्पष्ट बोलणे पक्षामधील दिल्लीतील नेत्यांना आवडणारे नसेल, पण जुन्या निष्ठावंत नेत्यांना मनातून सुखावणारे आहे. कारण आजच्या या ‘टोळी’ विरोधात धडाडीने बोलणारा एकतरी मायेचा लाल पक्षात आहे… सत्तेत आहे… पण सत्तेची पर्वा न करता, लोकशाही जीवनपद्धतीचा आग्रह धरून निवेदने करणारा, जे मनात आहे ते बोलणारा, अकारण कोणाचाही उदो-उदो न करणारा आणि भाजपाच्या आजच्या स्थितीचे नेमके वर्णन करणारा हा एकच मोठा नेता दिसतो आहे. संसदेतील अविश्वास ठरावावर पंतप्रधानांच्या दीड तासाच्या भाषणानंतर भाजपा सदस्यांकडून जोरदार बाके वाजवण्यात आली. पण, गडकरी स्वस्थ बसलेले दिसून आले. हे अनेकांचे निरिक्षण वाचकांच्या पत्रव्यवहार वृत्तपत्रांनी छापले आहे. हळूहळू आवाजात बोलणारे भाजपाचे तालुका-जिल्हा पातळीवर अनेक आहेत.. ठाण्यातही आहेत… मुंबईतही आहेत… मोकळेपणा ठेवून वागणारेही आहेत…
उत्तर प्रदेशसारख्या राज्याचे राज्यपाल असताना श्री. रामभाऊ नाईक यांनी त्यावेळचे उत्तर प्रदेशचे समाजवादी पक्षाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी जावून अभिनंदन केले होते. पंतप्रधान काय म्हणतील, गृहमंत्री अमित शहा काय म्हणतील, नड्डा काय म्हणतील या कशाची पर्वा न करता मनाचा मोकळेपणा रामभाऊंनी दाखवला. निवृत्त झाल्यावर आजही आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते. कार्यक्रम संपला, विषय संपला… पण, आचार्य अत्रे यांची १२५ वी जयंती महाराष्ट्र सरकारने राज्य पातळीवर वर्षभर का साजरी करू नये, असा प्रश्न त्यांच्या मनात आला. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तातडीने त्यांनी फोन केला.. आणि कार्यक्रमाची कल्पना दिली. सुधीर मुनगंटीवार आज जरी या सत्तच्या साठमारी राजकारणात गुंतले असले तरी, मुळात ते गडकरी परंपरेतीलच भाजपाचे नेते आहेत. आज लोकं विसरून गेले असतील… २०१४ साली भाजपा सत्तेवर येणार असे जेव्हा निवडणूक निकालानंतर दिसू लागले तेव्हा… भाजपामधील ३५-४० आमदारांना घेवून दिल्लीतील नेत्यांना भेटून ‘नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा…’ ही मागणी सुधीरभाऊंनीच केली होती. ही आठवण सांगण्याचा उद्देश एवढाच की, सुधीरभाऊ हे नितीनभाऊंच्या परंपरेतील आहेत.
तर… नितीन गडकरी यांनी आपली बिनधास्त मते, हातचे राखून न ठेवता नेहमीच स्पष्टपणे मांडलेली आहेत. त्याची किंमत चुकलेली आहे. भाजपाची राष्ट्रीय पातळीवरच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची जी ‘कोअर कमिटी’ आहे, ती फार महत्त्वाची आहे. गडकरी त्याचे पूर्वी सदस्य होते. आता त्यांना त्यातून वगळण्यात आले आहे. त्यांच्याकडे ‘सार्वजनिक रस्तेे वाहतूक’ हे मोठे खाते असले तरी त्याखेरिज महत्त्वाचे ‘पोर्ट-ट्रस्ट’सारखे खाते काढून घेण्यात आले. आणखी एक-दोन खाती त्यांच्याकडून काढली. त्यांना त्याचे कधीच दु:ख झाले नाही. मंत्री विमानाने येणार म्हटले की, त्या त्या गावात भाजपाचे कार्यकर्ते पुष्पहार, गुच्छ घेवून स्वागताची स्पर्धा असते. गडकरी यांनी स्पष्ट सांगितलेले आहे, मुंबई असो… दिल्ली असो… नागपूर असो… किंवा देशात कुठेही जाओ… कोणत्याही कार्यकर्त्याने विमानतळावर येण्याची गरज नाही… पुष्पगुच्छ आणण्याची अजिबात गरज नाही. कोणी चुकून आणला तर त्याचे पुष्पगुच्छ ते घेत नाहीत. असे हे नितीनभाऊ आगळे-वेगळे आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात असताना त्यांनी परवा नागपूरातील भाषणात धम्माल उडवून दिली… त्यांच्या भाषणाची एक खासियत आहे, गंभीर विषय ते हसत हसत मांडत असतात. त्यामुळे त्या विषयाचे गांभीर्य कमी होत नसले तरी शब्दाची बोच जाणवत नाही. परवाच्या भाषणात त्यांनी सहज सांगून टाकले की, ‘आमचा भाजपा पक्ष देशभर पसरलेला आहे… खूप गर्दी आहे… पण हे सगळं नवे गिऱ्हाईक दिसते आहे. आमचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आता दिसेनासे झालेले आहेत.’ भाजपाचे बदललेले स्वरूप इतक्या नेमक्या शब्दांत कोणालाही मांडता आले नाही. आणि केंद्रातील मंत्र्यांनी म्हणजे आमच्या नितीनभाऊंनी अगदी बिनधास्तपणे मांडले. किती किती खरं बोलून गेले… आजच्या राजकारणात सत्तेसाठी घुसखोरांची जी गर्दी झालेली आहे… त्यामुळे राजकीय पक्षाचे तत्त्वज्ञाान… आपण ज्या पक्षात पूर्वी काम करत होतो त्या पक्षाच्या निष्ठा… हे सगळे शब्द वाळवी लागल्यासारखे झाले आहेत. त्यामुळे भाजपामध्ये होणारी गर्दी ही आधीच्या निष्ठांवर पाणी सोडून आपल्याला सत्ता मिळत नसेल तर ‘नि.स.टा’ या वळणावर येवून पोहोचली. त्यामुळे जत्रेत जशी एखाद्या मोठ्या दुकानावर गर्दी होते, तशी आता भाजपामध्ये झालेली गर्दी हे अस्सल सोने नव्हे… सोन्याचा मुलामा दिलेले सत्तेसाठी हापापलेले आहेत… त्यांना उद्या सत्ता मिळाली नाही तर त्यांची कशी तडफड होईल, हे ही गडकरी यांना पूर्ण माहिती झालेले आहे. त्यामुळे त्यांनी छान उपमा दिली आणि गिऱ्हाईक हा शब्दही नेमका वापरला. भाजपामध्ये घुसखोरी केलेल्यांची यापेक्षा आणखी कोणत्याही प्रभावी शब्दाने संभावना होणारच नाही. त्यामुळे सुरुवातीचा जनसंघ आणि नंतरचा भाजपा म्हणजे रामभाऊ म्हाळगी असतील… राम कापसे असतील… राम नाईक असतील… उत्तमराव पाटील असतील.. हशू अडवाणी असतील… वामनराव परब, मधु देवळेकर, वसंतराव पंडीत, मुकुंदराव आगासकर, सुमतीबाई सुकेळीकर, प्रभाकर पटवर्धन ही अशी निष्ठावंत माणसं ‘गिऱ्हाईक’ या शब्दात कधीच बसली नाहीत.. मुकुंदराव आगासकर आणि सुमतीबाई सुकेळीकर यांनी अनेक निवडणुका लढवल्या. पराभव पत्करले.. पण, मला राज्यसभा द्या… किंवा विधान परिषदेवर घ्या, असे त्यांनी कधीही म्हटले नाही. आता तो त्यावेळच्या त्यांच्या पक्षाचा निष्ठेचा काळ. कधीच संपला. घुसलेले… पुढे-पुढे करणारे… कटात सामील होणारे… अनेक प्रकारचे लोक सत्तेच्या भोवती जमतातच. तशी भाजपाची अवस्था झालेली आहे. गडकरींचे हे विश्लेषण अगदी नेमके आहे.
महाराष्ट्रातसुद्धा गंमत बघा… ‘माझ्या रक्तात काँग्रेस आहे’ असे म्हणणारे विखे-पाटील आज भाजपामध्ये महसूलमंत्री आहेत. एकूणच मंत्रिमंडळाचा चेहरा आता ‘दादा गट’ सामील झाल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवालाच वाटू लागला आहे. भाजपाचे मूळचे कार्यकर्ते मागे पडले. आणि नवीन गिऱ्हाइके मोठी दिसू लागली. हा सत्तेचा महिमा आहे. त्यामुळे ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ हे आता उलटे झाले आहे. त्यामुळे गडकरी यांचा शब्द आताच्या भाजपाला अगदी चपखल बसलेला आहे. ‘तत्त्वज्ञाान’ आणि ‘निष्ठा’ गेल्या चुलीत… सगळ्यात महत्त्वाची सत्ता… हे बोलण्याचे धारिष्ठ्य गडकरी दाखवत आहेत… काँग्रेसवाले आणि अन्य विरोधातील नेते जे तडाकून बोलायला पाहिजे होते, त्यांच्याजवळ शब्द असतील पण, मनात कुठेतरी भिती आहे. गडकरी हे बिनधास्त आहेत… पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळाले नाही, तरी त्यांना पर्वा नाही. तसे म्हटले तर मूळ भाजपाच्या तत्त्वावर, भूमिकेवर आणि लोकशाहीचा सन्मान करणारा, विरोधी पक्षांचा आदर करणारा विकास कामांत राजकारण न आणणारा, भाजपामध्ये आता एकमेव जे आहेत ते नितिनभाऊ आहेत… थोडं लांबचं बोलतो… पण बोलून टाकतो… भाजपाविरोधात एकत्रित झालेल्या ‘इंडिया’च्या विरोधी गटाला केंद्रीय सत्ता दृष्टीपथात आली… तर केंद्रीय नेतेपदाचा वाद न करता त्यांनी पहिली विनंती नितीन गडकरी यांना करावी… ‘नितिनभाऊ, आम्ही तुम्हाला पंतप्रधान करतो…’ त्यांनी ‘हो’ म्हणावे की ‘नाही’ म्हणावे… हा त्यांचा प्रश्न… त्यांच्या मनाच्या मोकळेपणाएवढाच ‘इंडिया’च्या नेत्यांनी मोकळेपणा दाखवला तर राजकारणात ‘नेहले पे दहेला’ कसा होतो ते बघा…
सध्या एवढेच

टीप : नितीनभाऊ आणि माझा स्नेह ४० वर्षांचा आहे. ‘मंतरलेले दिवस’ या माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन २५ वर्षांपूर्वी नितीनभाऊंच्या हस्तेच रवींद्र नाट्यमंदिर येथे झाले होते. 📞9892033458

 137 Total Likes and Views

0 Comments

No Comment.