१३ कोटीच्या महाराष्ट्रात बेरोजगारीने तरुण बेजार आहेत.
तरुणांची गंमत चाललीय. रोजगार नाही. नोकरी नाही. वय वाढतेय. बाहेर-घरी बोंबाबोंब. पैसा नाही. लग्न होत नाही. भविष्य हरवले.
अशा भयंकरतेत ही पिढी अडकलीय. अडकित्ता अवघड आहे.
हाकलाहाकलीतून ही पिढी जातेय. पिढीत मुले-मुली दोन्ही आहेत. तरुण होणे अपराध झालेय. तलाठी (पटवारी) भरतीवरुन हे आक्रंदन अधिक स्पष्ट झाले.
महसूल विभागाच्या साडे चार हजार तलाठी पदांसाठी साडे दहा लाख तरुणांनी अर्ज केला. त्यातही बहुतांश उच्चशिक्षित आहेत. सर्वाधिक अर्ज पुणे येथून म्हणजे १ लाख १५ हजार आहेत. नागपुरातून ५८ हजार अर्ज आहेत.
आवेदन फी मुलांकडून १ अब्ज ४ कोटी १७ लाख शासनाने गोळा केली.
१७ आगस्टपासून परीक्षा सुरू झाल्या. १४ सप्टेंबर पर्यंत चालणार आहेत.
टाटा समूहाची टीसीएस परीक्षा संचालित करतेय.
परीक्षा केंद्रावर तरुणतरुणींचे लोंढे येतायेत. केंद्रावरील धांदली आटोक्यात नाहीत. कधी पेपर फुटीची वार्ता तर कधी सर्व्हर डाॅऊन ची त्रेधा ! शासन दारावर हे असे !
मुलांचे कसे व्हायचे ? हीही परीक्षा वाहून जाते की काय .. !
मागे म्हाडाच्या ५६५ रिक्त पदांच्या भरतीसाठी डिसेंबर २०२१ मध्ये परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेच्या काही तास आधी गैरप्रकार उघडकीस आल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये टीसीएस च्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेतली. तिथेही गैरप्रकार झाला. तपास सुरू आहे. निकाल अद्याप नाही.
सरकार पातळीवर वेगवेगळ्या विभागात १० लाखाच्या वर रिक्त जागा भरायचे कानावर आहे. चालढकल चालू आहे. तत्परता दिसत नाही. सरळसेवा भरतीला काट देतात. कंत्राटीचा घोष देतात. का असे ? मौन असतात.
धसका .. धक्का नसल्याने मौन असावेत. पण अती होतेय. झालेय.
तरुणांचा देश .. किती सांगायचे ! किती मस्का ! तेच तरुण आज .. त्रस्त .. पस्त .. आक्रोशित आहेत. छेड फार होतेय. झालीय म्हणाना.
ती महागात पडेल हे नक्की !
० रणजित मेश्राम
46 Total Likes and Views