अपा, म.पा., न.पा., जि.प… सर्वकाही लोकसभा निवडणुकांनंतरच…

Editorial
Spread the love

आमदारांच्या अपात्रते संबंधिचा निर्णय जून २०२४ पर्यंत लांबल्याची बातमी आली… अपा म्हणजे ‘अपात्रता निर्णय’… ‘हा निर्णय लांबणार’ हे सगळ्यांना माहिती आहे. जून म्हणजे लोकसभा निवडणूक झाल्यावर..
सर्वोच्च न्यायालय काय म्हणतेय… किंवा परमेश्वर काय सांगतोय… या कोणाचीही पर्वा न करता, रेटून निर्णय कसे करायचे, हे भाजपा सरकारने अनेक विषयांत दाखवून दिले. घटनेप्रमाणे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्यासाठी नेमल्या जाणाऱ्या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एक सदस्य असले पाहिजेत, अशी तरतूद आहे. घटना दुरूस्ती करून ही तरतूद बाजूला करण्याचा विधेयक येण्याच्या वाटेवर आहे. टाकण्यात आलेला आहे. कुठलीही गोष्ट रेटून करायची हा निर्णय करूनच सरकार चालवले जात आहे. लोकशाही, संकेत, घटना, विरोधीपक्ष, जनमत या सगळ्याला फाट्यावर मारून काम करून घ्यायचे. कारण निवडणुका जिंकायच्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत बाकी सगळे विषय दुय्यम आहेत… हे केंद्र सरकारने ठरवून टाकले आहे. राजकीय फोडाफोडी त्याचसाठी चालू आहे, ई.डी, सी. डी., बी. डी. त्याचसाठी आहे. कदाचित लोकसभेच्या बरोबरच विधानसभेच्या निवडणुका होतील. आणि त्या झाल्या नाहीत तर विधानसभा निवडणुका झाल्यावरच म.पा. न.पा. जि.प. या निवडणुका होतील. त्याआधी काही नाही.
अपात्र आमदारांसंबंधिचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात असला तरी, तो निर्णय जूनमध्ये होणार, यात फार धक्का बसावा, असे काही नाही. विधानसभेचे अध्यक्ष असलेले श्री. राहुल नार्वेकर हे स्वत: वकीलच आहेत. त्यामुळे त्यांनी वकिलीपद्धतीने स्पष्ट करून टाकलेले आहे की, ‘निर्णयाची ‘घाई’ करण्याची अिजबात गरज नाही, सर्व बाजू तपासून ‘लवकर’ निर्णय देईन’, घाई नाही… आणि लवकर देईन, असे दोन्ही शब्द त्यांचे आवडते आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मे २०२३ मध्ये आला. आता चार महिने होऊन गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असे म्हटले होते की, ‘विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंबंधातला निर्णय लवकरात लवकर करावा. (अॅज अर्ली अॅज पॅासिबल)’… म्हणजे नेमका किती काळ?… याची व्याख्या कुठेही केलेली नाही. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अनेकवेळा उत्तर दिले जाते… ‘हे काम कधी होणार..’ मंत्री सांगतात… ‘लवकरात लवकर’. उपप्रश्न विचारला जातो, ‘म्हणजे कधी?’ पुन्हा सांगितले जाते, ‘लवकरात लवकर’… सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट तारखेच्या आत सुनावणी कार्यक्रम सादर करायला आदेश दिल्यामुळे, आता हालचाल तरी सुरू झाली. तरी जून महिना येणार म्हणजे लोकसभा निवडणूक आटोपलेली असणार… भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाचे मुख्य धोरण असं आहे की, शक्यतो एकही पोट निवडणूक, किंवा अडचणीचे निर्णय लोकसभा निवडणुकीच्या आगोदर टाळायचे. गिरीष बापट यांच्या निधनामुळे रिकामी झालेली पुण्यातील लोकसभेची पोटनिवडणूक त्यामुळेच टाळली जात आहे.
मुंबई, पुणे, नागपूर महापालिका असो, अन्य पालिका असो, जिल्हा परिषदा असो, यापैकी कोणत्याही निवडणूका लोकसभा निवडणुका झाल्याशिवाय होणे शक्य नाही. अगदी त्याच चालीवर, आमदारांच्या अपात्रतेसंबंधी अध्यक्षांचा निर्णय जूनपर्यंतची याचसाठी लांबू शकतो… असे भाकित वृत्तपत्रांनीच वर्तवले आहे. तिथपर्यंत लोकसभा निवडणुका होऊन जातात. त्यापूर्वी निर्णय झाला आणि धरून चालू या… १७ आमदार अपात्र ठरले तर शिंदे सरकारला राजीनामा द्यावा लागेल. त्यातून नवीन प्रश्न िनर्माण होतील… ‘आघाडीचे सरकार फोडून शिंदे गटाला भाजपाने सोबत घेतले.’ ते धोरण म्हणून ठरवूनच केले. एक गोष्ट स्पष्ट होती… आणि आजही आहे… त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली एकट्या भाजपाच्या ताकतीवर महाराष्ट्रात भाजपाचे सरकार पुन्हा येणे शक्य नाही. केंद्रीय नेतृत्त्वाला याची पूर्ण कल्पना आलेली आहे. त्यांच्याकडे सगळी माहिती आहे. अधिकृतपणे आहे… त्यासाठी मोठी यंत्रणा आहे. फडणवीसांनी कितीही शड्डू ठोकले तरी, फडणवीस हे एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले तरी, ‘नेते’ होऊ शकत नाहीत. २०१४ साली ते मुख्यमंत्री नव्हते. तेव्हाच्या निवडणुकीत भाजपाला १२२ जागा मिळाल्या. त्यानंतर फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. भल्या मोठ्या जाहिराती… केंद्रीय सरकारची ताकद… मोदी-शहा यांच्या सभा… हे सगळं झाल्यावर महाराष्ट्रात भाजपा १२२ वरून १०५ आमदारांवर आला. १७ आमदार कमी झाले. २०१९ नंतर पंढरपूर पोट निवडणुकीचा आणि पिंपरी चिंचवड या निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश, निधन झालेल्या आमदाराच्या सहानुभूतीने मिळालेले यश होते. तरीही पिंपरी-चिंचवडमध्ये फुटीर उमेदवार आणि आघाडीचा उमेदवार यांना मिळालेली मते विजयी उमेदवारापेक्षा ३० हजारांनी जास्त आहेत. शिंदे सरकार अधिकारावर आल्यावर दोन पोट निवडणुका झाल्या. शिंदे यांच्या गटाने एकही निवडणूक लढवलेली नाही. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत मशाल घेवून उतरलेल्या शिवसेनेने मोठे यश मिळवले. ३२ वर्ष ज्या ‘कसबा’ मतदारसंघात भाजपाला निर्णायक यश मिळत होते… तिथे शिंदे आणि फडणवीस हे तीन-तीन दिवस थांबल्यानंतर, त्या मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला. कधी नव्हे ते नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपा विधानपरिषद निवडणुकीत पराभूत झाला. बाळाराम पाटील यांची रायगडची निवडणूकही, आघाडीला राजकीय आखणी नीट करता आली नाही, महणून गेली. भाजपाच्या मोठ्या सभा सध्या होत नाहीत. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या सभा दणक्यात होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या सभेला उत्तर देण्याकरिता शिंदे गटाने त्याच जागेवर सभा घेतली. ती सभा खेडची नव्हती… ठाण्यातून गेलेल्या शेकडो बसमधून माणसं खेडमध्ये ओतण्यात आली. त्यानंतर सभांच्या नादी सरकार लागलेले नाही. सामान्य माणसं काय बोलतात हे जर समजून घेतले तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील…
शिंदे गटाला जवळ केल्यानंतर भाजपाच्या ‘थिंकटँक’ आणखी एका तपशीलाचा शोध लागला की, या फोडाफोडीनंतरही महाराष्ट्रात बहुमत मिळवणे सोपे नाही. मग उपाय काय? मग खुद्द पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची व्याख्या करून ‘नॅशनल करप्ट पार्टी’असा तपशील जाहीर केला. सिंचन घोटाळ्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. त्यानंतर दादा गटाची फोडाफोडी लगेच झाली. या सगळ्याचे अर्थ महाराष्ट्राला नेमके कळतात…. दादा गट भाजपाकडे आल्यानंतर पंतप्रधानांनी ज्या पार्टीवर हल्ला केला होता… तो हल्ला थंड झाला… सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत जाहीरपणे मागणी केली की, ‘ज्या पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्ऱेस पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, त्याची चौकशी करा… राज्य सहकारी बँकेची चौकशी करा… सिंचन घोटाळ्याची चौकशी करा…’ या मागणीला उत्तर दिले गेले नाही. आणि दिले जाणारही नाही. भाजपाचा जो मतलब होता… तो साध्य झालेला आहे. सुरुवातीला त्यांचा प्रयत्न शरद पवार साहेबांचा पाठींबा मिळवण्याचा होता… त्यात अपयश आले. शिवाय शरद पवारसाहेब देशपातपातळीवरच्या िनर्णायक भाजपाविरोधी आघाडीसाठी हिंमतीने बाहेर पडले. त्यांना ई.डी. ची नोटीस देवून झाली. दिलेल्या मुदतीच्या दुसऱ्या दिवशी ते ई. डी. कार्यालयात निघाले तेव्हा मग दाणादाण उडाली. नोटीस मागे घेतली गेली. अजितदादा आणि त्यांचा गट तसं काही करू शकणार नाही, याची खात्री असल्यामुळे, त्या गटाला जवळ घेतले गेले. भाजपाला महाराष्ट्रात तरी आता अापलं जमून जाईल, असे वाटत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे… मोदी आणि केंद्रीय भाजपा यांना फक्त लोकसभा निवडणुकीत यश मिळते की नाही, एवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. २०१९ सारखे यश यावेळी देशात मिळणार नाही, याची भाजपाला खात्री पटल्यामुळे जिथे-िजथे फोडाफोडी शक्य आहे, ती करून बहुमताचा आकडा जमवायचा, हा प्रयत्न आहे. उद्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्र ठरले तर… मग शिंदे गटात केवढी चलबिचल होईल… सरकार जाईल… जरी भाजपाने अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचे गाजर दाखवले असले आणि त्यावर दादा विसंबून आहेत… ते अनेक आमदारांना सांगत आहेत, ‘बीजेपीवाले मला मुख्यमंत्री करणार आहेत…’ दादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यानिमित्ताने का होईना, पूर्ण होईल. ती एकदा पूर्ण होऊन जाऊदे… पण, एक दिवस असा येईल की, त्या दिवशी या सगळ्याचा असा काही पश्चाताप होईल की, अरे आपण कोणाला फसवले… कोणाशी कृतघ्न झालो… बाकी सगळ्यांचे सोडून द्या… शेवटी कुटुंबात एक दिवस असा येतो… कितीही मोठ्या सत्तेची पदे तुच्छ वाटतात आणि आपल्या घरातीलच माणसं दुरावल्याचं अंतरिक दु:ख सगळं आयुष्य अस्वस्थ करून टाकतात. परवाचा एक प्रसंग… सुप्रियाताईंना अजितदादा कुठेतरी समोर भेटले… तर सुप्रियाताईचे डोळे भरून आले. राजकारण राजकारणाच्या जागेवर असते. मानवी भावना शेवटी अस्वस्थ करतातच.
एका दिवसात माणसं आपल्या निष्ठेच्या भूमिका कशा बदलतात… हेच दादा भाजपाला मिळण्यापूर्वी २ महिने आगोदर विरोधी पक्षनेते असताना विधानसभेतच बोलले होते… ‘अकोला, वाशिम दंगली भाजपाने मुद्दाम घडवल्या आहेत… निवडणुकांसाठी घडवलेल्या आहेत…’ सत्ता माणसाला कुठून-कुठे नेते… पण, आताच्या राजकारणात निष्ठेच्या राजकारणाची कुणी अपेक्षाच करत नाही. त्यामुळे सत्तेसाठी हापापलेले कुठेही जाऊ शकतात. पण, ज्या दिवशी सत्ता जाईल त्यादिवशीची घालमेल कल्पनेच्या पलिकडची असेल… सत्ता आज आहे तर उद्या नाही…
तरीही जे भाजपाबरोबर नाहीत अशांना हैराण करण्याचे काम चालूच राहणार आहे. राेहित पवार हे आता नव्याने रडारवर आले आहेत. भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी उद्याच्या महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये रोहित पवार हे नक्की आहेत. हा तरुण आमदार माझ्या परिचयाचाही नाही. पण, मी त्याला फार लांबून पाहतोय… ते निवडून आल्या दिवसापासून, गेली पाच वर्षे विधानमंडळाच्या ग्रंथालयात मी जेव्हा-जेव्हा जातो, तेव्हा-तेव्हा मला एकच आमदार प्रामुख्याने ग्रंथालयात दिसतो… ते रोहित पवार. कोणतेतरी पुस्तक न्याहाळत असतात. ज्याला या व्यासंगाची सवय लागली तो तरुण पुढेच जाणार… शरद पवार यांच्या तारुण्यातील दिवस आठवतात.. एवढा प्रचंड संपर्क… पंतप्रधान नसतानाही या देशात ७५ व्या वाढदिवस एकाच नेत्याचा साजरा झाला… ज्या वाढदिवसाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, सात राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षाचे सगळे नेते हजर होते. हे एका दिवसात घडत नाही. शरद पवार साहेबांचा हा आवाका देशापुरताच मर्यादित नाही. ते शरद पवारसाहेब आज एकटे वाटत असले तरी महाराष्ट्र त्यांच्याबरोबर आहे. हे निवडणूकीनंतर दिसून येईल.
आणखीन एक मुद्दाम सांगून ठेवतो. महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक होईल, तेव्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आणि नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या नेत्यांसह काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षांचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही. मग कुणी काहीही म्हणो.. जी माणसं पवारसाहेबांना सोडून गेली त्यातल्या एकाने तर काय कारण सांगावे? ‘अहो, पवारसाहेबांनी मला गेली सहा महिने कसं वागवलं तुम्हाला काय सांगू….’ मी त्यांना शांतपणे म्हणालो, ‘सहा महिन्यांचे काय सांगता… गेली ३० वर्षांपूर्वी तुम्ही होतात कुठे आणि आज पोचलात कुठे? तुम्हाला काय द्यायचे शिल्लक ठेवले आहे पवारसाहेबांनी… आणि याच्यापुढे तुम्हाला अधिक काय मिळणार आहे… अमेरिकेचे अध्यक्षपद हवं आहे का?’
सत्तेची हाव शेवटी वाईटच असते… आणि सत्ताही वाईटच असते… आचार्य अत्रे यांचे ‘मी मंत्री झालो’ हे नाटक पहा…. शेवटच्या अंकात शेवटचं एकच वाक्य…
‘अरे, एवढी हाव करून मुख्यमंत्री झालो… पण, काय हाती राहिले… बदनामी…’
आणि नाटकाचा पडदा तिथेच पडतो….
महाराष्ट्रात आज आचार्य अत्रे यांच्या त्याच नाटकाचा प्रयोग सुरू आहे…
सध्या एवढेच

बावनकुळे म्हणाले, ‘पत्रकारांना चहा पाजा’ मतदार म्हणतील, ‘तुम्हालाच पाणी पाजतो…’

अहमदनगर येथील भाजपा शिबिरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक सल्ला दिलाय…. तो सल्ला नगरचे त्यांचे खासदार सुजय विखे-पाटील यांना आहे.
‘येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपाविरोधात एकही बातमी छापून येता कामा नये.. त्यासाठी पत्रकारांना ढाब्यावर नेवून चहा पाजा… चहा पाजाचा अर्थ समजतोय ना…’ बावनकुळे यांचा हा सल्ला विखे यांना समजलाच असेल… कारण ते त्यात तरबेज आहेतच… पण, असे ‘चहा पिणारे’ पत्रकार महाराष्ट्रात नाहीत. त्यांची तशी प्रतिमा नाही…’ असे थेट उत्तर शरद पवारसाहेबांनी देवून टाकले आहे. खरं म्हणजे, बावनकुळे यांना फार गांभीर्याने घ्यावे, असे काही ते मोठे नेते नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात बावनकुळे होते… आणि त्यावेळी बावनकुळे फडणवीसांना ‘देव’ समजत होते. त्या फडणवीस यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत याच बावनकुळे यांचे तिकीट कापले होते. त्यामुळे बावनकुळे यांचे पक्षातील स्थान फडणवीसांच्या लेखी काय आहे, ते तेव्हा स्पष्ट झाले. त्यांना पक्षाचे अध्यक्ष केल्यानंतर आता त्यांनी पत्रकारांची मापं काढायला सुरुवात केली. आणि सल्ले द्यायला सुरुवात केली. या सल्ल्यांतून पत्रकारांची मापं निघण्याऐवजी भाजपाचे नेते मनातून किती हादरलेले आहेत, हेच स्पष्ट झाले. लोकशाहीत बातमी आपल्याच बाजूने यायला हवी, असा अग्रह धरणारे आणि त्यासाठी ‘चहा पाजायचा’ म्हणजे काय, हे समजलं ना…, असे आपल्याच खासदाराला बजावणारे त्यांची किती घालमेल झाली आहे, हे समजून येते. महाराष्ट्रातील पत्रकारांना गृहीत धरू नका. पण बावनकुळेच एकटे घाबरले आहेत, असे नव्हे देशपातळीवरील भाजपाचे सगळेच नेते घाबरलेले आहेत. आणि महाराष्ट्राला जास्त घाबरलेले आहेत. देशात काय व्हायचे ते होईल.. बावनकुळे साहेबांना हे स्पष्ट सांगायला हवं… ‘तुम्ही चहा पाजा… आणखीन काही पाजा… सगळे प्रयोग करून बघा… हा महाराष्ट्र आहे, एवढं लक्षात ठेवा…’ चहा पाजू इच्छिणाऱ्यांना महाराष्ट्र पाणी पाजेल… तुमचं जेवढं वय नाही… तेवढे वर्ष पत्रकारितेत आहे. तुम्हाला एवढंच सांगून ठेवतो…
सांगती जे बेईमानी… तो धर्म आमुचा नव्हे..
नाचती हुजरे जिथे… ते सोहळे आमुचे नव्हे…
निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या लक्षात येईल…
चहा पाजणाऱ्यांना महाराष्ट्राच्या मतदारांनी पाणी पाजलं आहे..📞9892033458

मधुकर भावे

 49 Total Likes and Views

0 Comments

No Comment.